पू. (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांची त्यांचे कुटुंबीय, सनातनचे सद्गुरु आणि साधक यांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये

गुरुदेवांवर श्रद्धा असलेले पू. (ह.भ.प.)सखाराम बांद्रे महाराज ! – सद्गुरु सत्यवान कदम

सद्गुरु सत्यवान कदम

पू. (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त आहेत. त्यांची गुरुदेवांवर पुष्कळ श्रद्धा आहे. त्यांचे शिक्षण ४ थी पर्यंत झालेले असूनही त्यांनी ‘लिखाणात काना, मात्रा यांच्या चुका झाल्या असल्यास सुधाराव्यात. माझी मराठी शुद्ध नाही, तरी सांभाळून घ्या’, असे म्हटले आहे. यातून त्यांचा भाव व्यक्त होतो.

पू. (ह.भ.प.) सखाराम रामजी बांद्रे महाराज यांचे कुटुंबीय

आसंदीवर बसलेले पू. (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांच्यासमवेत १. भाऊ श्री. शिवराम बांद्रे, २. वहिनी सौ. वनिता शिवराम बांद्रे, ३. पुतण्या श्री. दीपक बांद्रे, ४. सून सौ. धनश्री बांद्रे

पू. (ह.भ.प.) बांद्रे यांच्यामुळे गुरुसेवा करता येते ! – श्री. शिवराम बांद्रे (भाऊ)

माझ्या जीवनात पूज्य सखाराम बांद्रे महाराज यांच्यासारखे भाऊ आणि संत नसते, तर मी आज कुठल्या कुठे असतो, हे मला सातत्याने आठवते. ते देवासारखे माझ्या मागे खंबीरपणे उभे आहेत. त्यांनी मोठे बंधू म्हणून आमच्या कुटुंबाची काळजी घेतली. कष्ट करून आणि विठ्ठलभक्तीने त्यांनी हे पद गाठले आहे, हे आमच्या कुटुंबाचे भाग्य आहे. ते स्वतःचे सर्व स्वतः करतात. कोणाकडूनही अपेक्षा ठेवत नाही. ‘देव, देश आणि धर्म यांच्यासाठी कार्य करत रहा’, अशी त्यांनी आम्हाला शिकवण दिली आहे. ते घरी आलेल्या कोणालाही रिकाम्या हाती पाठवत नाहीत. ते या वयातही आम्हाला धीर देतात. त्यांच्यामुळे मला गुरुदेवांच्या चरणी सेवा करता आली. (श्री. शिवराम बांद्रे यांचा भाव या वेळी जागृत झाला.)

काका संतपदी विराजमान झाल्याविषयी धन्य वाटले ! – श्री. दीपक शिवराम बांद्रे (पुतण्या)

मी लहानपणापासून त्यांच्या सहवासात आहे. पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे यांच्याकडे गेल्यावर मंदिराप्रमाणे सात्त्विकता जाणवते. मला नेहमी वाटायचे की, ते केवळ माझे काका नसून ते महाराज आहेत. आज ते संतपदी विराजमान झाल्याविषयी मला धन्य वाटले.

त्यांच्यासारखी तळमळ आमच्यात यावी ! – सनातनचे साधक श्री. महेंद्र चाळके

गुरुदेवांनी आमची साधना वाढावी; म्हणून आम्हाला पूज्य (ह.भ.प.) सखाराम रामजी बांद्रे महाराज संत म्हणून दिले आहेत. ते सनातन पंचांगांच्या वितरणाची सेवा तळमळीने करतात. ते दैनिक ‘सनातन प्रभात’चे सर्व अंक शब्द न शब्द वाचून त्याप्रमाणे कृती करतात. त्यांनी नुकतेच मकरसंक्रांतीच्या निमित्ताने श्री लक्ष्मी आणि श्री गणपती यांच्या सनातन-निर्मित चित्रांचे वितरण केले. ‘त्यांच्यासारखी तळमळ आमच्यात यावी’,  अशी प्रार्थना आहे.

ज्या ज्या ठिकाणी धर्मकार्य चालू असते, तेथे पू. बांद्रे महाराज पोचतात ! – सनातनचे साधक श्री. ज्ञानदेव पाटील, चिपळूण

पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज हे ज्या ज्या ठिकाणी धर्मकार्य चालू असते, तेथे पोचतात. हिंदु राष्ट्र जागृती सभांच्या वेळी ते झोकून देऊन सेवा करतात. पूजनीय महाराज मैदानातील कष्टाच्या सेवाही भावपूर्ण करतात. त्यांचे वाचन प्रचंड आहे. त्यांच्यातील अभ्यासूवृत्ती, विचारण्याची वृत्ती, तळमळ आणि जिज्ञासू वृत्ती ओळखून गुरुदेवानी त्यांना या पदी विराजमान केले आहे. त्यांच्यामुळे चैतन्यमय असा आजचा दिवस आम्हाला पहायला मिळाला.

वैशिष्ट्यपूर्ण क्षणचित्र : सोहळा सुरू होण्यापूर्वी सभागृहाच्या शेजारी काही लहान मुले मोठ्या आवाजात गाणी लावून खेळत होती; पण सोहळा चालू झाल्यानंतर त्यांचा आवाज कमी झाला.

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक