सेवामुक्त करण्यात आलेल्या परिचारिकांना पुन्हा सेवेत घेण्याच्या मागणीसाठी परिचारिकांचे निषेध आंदोलन

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील जळीत प्रकरण

 भंडारा – काही दिवसांपूर्वी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेल्या जळीत प्रकरणाच्या संदर्भात चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर ७ लोकांना दोषी ठरवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. यात घटनेच्या रात्री कर्तव्यावर असलेल्या २  परिचारिकांचा काहीही दोष नसतांना त्यांना सेवामुक्त करण्यात आले आहे. ही सेवामुक्तीची कारवाई मागे घेण्यात यावी, या मागणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात २५ जानेवारी या दिवशी रुग्णालयातील परिचारिकांनी शासनाचा निषेध करत आंदोलन केले.

परिचारिका जोती भारसकर घटनेच्या दिवशी उपस्थित नव्हत्या. त्यांना रुग्णालयात आग लागल्याची माहिती मिळताच त्या रुग्णालयात येऊन ७ बालकांना वाचवण्यात साहाय्य केले. असे असतांना त्यांनाही निलंबित करण्यात आले असून त्यांचीही निलंबनाची कार्यवाही रहित करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. लवकरात लवकर परिचारिकांना सेवामुक्त करण्याचा आदेश मागे न घेतल्यास पुढे राज्यव्यापी तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी परिचारिका आणि एन्.आर्.एच्.एम्.च्या संघटना यांनी दिली आहे.