‘ऑफलाईन’ परीक्षेला विरोध करणार्या ‘एन्.एस्.यू.आय.’च्या विद्यार्थी सदस्यांना जी.व्ही.एम्. महाविद्यालयाच्या प्राचार्यांची चेतावणी !
फोंडा, १८ जानेवारी (वार्ता.) – ‘एन्.एस्.यू.आय.’ या विद्यार्थी संघटनेच्या नेतृत्वाखाली फर्मागुडी येथील ‘जी.व्ही.एम्.’च्या काही विद्यार्थ्यांनी ‘ऑफलाईन’ परीक्षेला विरोध करण्यासाठी १८ जानेवारी या दिवशी जी.व्ही.एम्. महाविद्यालयाच्या बाहेर आंदोलन केले. आंदोलनामुळे येथे काही काळ परिस्थिती हाताबाहेर जाणार असल्याची चिन्हे दिसू लागल्यानंतर घटनास्थळी पोलिसांना पाचारण करण्यात आले. या वेळी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी ‘ऑफलाईन’ परीक्षेला बसा अन्यथा घरी चला. परीक्षेला बसू इच्छिणार्या विद्यार्थ्यांना अडथळा आणू नका’, अशी चेतावणी महाविद्यालयाच्या बाहेर आंदोलन करणार्या विद्यार्थ्यांना दिली. त्यानंतर महाविद्यालयाच्या बाहेर असलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश करून ‘ऑफलाईन’ परीक्षा दिली.
प्राप्त माहितीनुसार जी.व्ही.एम्. महाविद्यालयाची ‘ऑफलाईन’ परीक्षा ४ जानेवारीला होणार होती; मात्र याला काही विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी वेळ देण्याची मागणी करून ‘ऑफलाईन’ परीक्षा घेण्यास वेळ मागितला. विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून गोवा विद्यापिठाने ‘ऑफलाईन’ परीक्षा पुढे ढकलून ती १८ जानेवारी या दिवशी ठेवली; मात्र काही विद्यार्थ्यांनी १८ जानेवारी या दिवशी सकाळी अचानकपणे महाविद्यालयासमोर ‘ऑफलाईन’ परीक्षेला विरोध दर्शवून ही परीक्षा ‘ऑनलाईन’ पद्धतीने घेण्याची मागणी केली.