पणजी, ८ जानेवारी (वार्ता.) – यंदाच्या ५१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपटामध्ये ‘विशेष गोवन विभाग’ : कोकणी आणि मराठी फिचर, नॉन फिचर फिल्म’ या विभागात गोमंतकात निर्माण केलेले चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. या विभागासाठी गोमंतकीय चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक यांच्याकडून अर्ज मागवण्यात आले होते. त्यानुसार एकूण ९ अर्ज आले आहेत. या अर्जांची छाननी होणार असून त्यानंतर महोत्सवात प्रदर्शित चित्रपटांची सूची घोषित केली जाईल, अशी माहिती गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘५१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सिद्धता चालू आहे. आयनॉक्सच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मल्टिप्लेक्समध्ये ४ पडदे आणि १ सहस्र २५० आसनव्यवस्था आहे. हे मल्टिप्लेक्स भारतातील तिसर्या क्रमांकाचे सर्वोत्कृष्ट मल्टिप्लेक्स आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध असून सुसज्ज अशी आसनव्यवस्था आहे. आयनॉक्स मल्टिप्लेक्सचे उद्घाटन ११ जानेवारीला सायंकाळी ६.३० वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येईल.’’
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पर्धेसाठी १५ चित्रपट घोषित
पणजी – आशियातील सर्वांत लक्षणीय चित्रपट महोत्सव असलेल्या ५१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (आंचिमसाठी) १५ सुप्रसिद्ध चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. हे चित्रपट १६ ते २४ जानेवारी या कालावधीत होणार्या ५१ व्या आंचिममध्ये ‘सुवर्ण मयुर’ पुरस्काराच्या स्पर्धेत असतील. अर्जेटिनी चित्रपट निर्माते पाब्लो सीझर येत्या आंचिममधील ज्युरी पथकाचे मुख्य असतील. त्याचसमवेत श्रीलंकेचे प्रसन्ना विठनागे, ऑस्ट्रियाचे अबू बक्र शॉकी, भारताचे प्रियदर्शन आणि बांगलादेशचे रुबियत हुसेन हे चित्रपट निर्माते ज्युरी सदस्य असतील.