शासनाने सिद्ध केलेल्या कोरोनाविषयीच्या नियमांचे पालन मंत्री, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून होत नसेल, तर सामान्य जनतेकडून नियम पाळण्याची अपेक्षा कशी करता येईल ? नियम न पाळल्याविषयी जशी सामान्यांवर कारवाई होते, तशी कारवाई संबंधितांवर केली जाणार का ?
नाशिक – येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप बनकर यांच्या मुलाच्या झालेल्या विवाह सोहळ्याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मंत्री, आमदार आणि वरिष्ठ अधिकारी यांनीच कोरोनाचे नियम धाब्यावर बसवले. शासनाने कोरोना काळात लागू केलेल्या नियमानुसार विवाह सोहळ्याला ५० व्यक्तींची उपस्थिती आवश्यक असतांना या विवाह सोहळ्यात १ सहस्रांहून अधिक लोकांची उपस्थिती होती.
या सोहळ्यात पालकमंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, आमदार सरोज अहिरे, नितीन पवार, माणिकराव कोकाटे यांच्यासह विविध पक्षांतील राजकीय पुढारी, तसेच वरिष्ठ अधिकार्यांचीही उपस्थिती होती. गर्दीमुळे कोणत्याही प्रकारचे सामाजिक अंतर पाळण्यात आले नाही.
आधी पत्रकारांशी बोलतांना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते की, कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. सद्य:स्थितीत काळजी घेणे हा एकमेव उपाय असून शासनही त्यादृष्टीने काळजी घेत आहे. कोरोनाकाळात १०० ते २०० लोकांच्या उपस्थितीतच विवाह सोहळे पार पडत आहेत. यानंतर केवळ अर्ध्या घंट्यांच्या अंतराने अजित पवार हे सहस्रो लोकांची गर्दी असणार्या विवाह सोहळ्यास उपस्थित होते.
कोरोनाच्या नियमावलीनुसार या सोहळ्यासाठी गंगापूर पोलीस ठाण्यात ५० व्यक्तींच्याच उपस्थितीची अधिकृत अनुमती घेण्यात आली होती, असे वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितले. असे असतांना ‘सोहळ्याला १ सहस्रांहून अधिक जणांची उपस्थिती दिसून आल्याने पोलीस कोणती कारवाई करणार ?’ असा प्रश्न विचारला असता पोलिसांनी यावर भाष्य करणे टाळले. |