बेंगळुरूमधील मुसलमानबहुल भागांतील रस्त्यांना मुसलमानांची नावे नकोत !

भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांचे पालिका आयुक्तांना पत्र

भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या आणि बेंगळुरू महानगरपालिकेचे आयुक्त एन्. मंजुनाथ प्रसाद

बेंगळुरू (कर्नाटक) – मुसलमानबहुल भागांतील रस्त्यांचे नामकरण मुसलमानांच्या नावे होणे, ही द्विराष्ट्र सिद्धांताची विचारसरणी आहे. ‘मुस्लिम लीग’ने हिंदू आणि मुसलमान यांच्यासाठी जशी वेगवेगळी मतदान सूची मागितली होती, तशी ही विचारसरणी आहे. हा धोकादायक विचार असून त्याचा निषेध झाला पाहिजे, अशा आशयाचे पत्र येथील भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी बेंगळुरू महानगरपालिकेचे आयुक्त एन्. मंजुनाथ प्रसाद यांना लिहिले आहे.

या पत्रात सूर्या यांनी पुढे म्हटले की, मुसलमान महापुरुष आणि देशभक्त यांची संख्या अल्प नाही. त्यांचीही नावे रस्त्यांना दिली पाहिजेत; मात्र त्यामागे द्विराष्ट्राची विचारसरणी नको, असे म्हणत त्यांनी पालिकेकडून अशा प्रकारचे नामकरण करण्याच्या धोरणाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली.