आर्थिक अपहाराचे आरोप पुराव्यानिशी सिद्ध करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करीन ! – खासदार संजय राऊत, शिवसेना

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत

मुंबई – ‘हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’ आणि ‘पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँके’तील यांमधील आर्थिक घोटाळ्यामध्ये माझ्या कुटुंबियांचे नाव विनाकारण गोवण्यात आले आहे. मी आव्हान देतो की, पुराव्यानिशी ते सिद्ध करा, नाहीतर कायदेशीर कारवाईला सिद्ध रहा, अशी चेतावणी शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ‘ट्वीट’द्वारे दिली आहे.

या ‘ट्वीट’मध्ये कुणाचेही नाव न घेता संजय राऊत यांनी ‘समजनेवाले को इशारा काफी है’, असे नमूद केले आहे. ‘हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’ आणि ‘पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँके’तील आर्थिक अपहाराप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून संजय राऊत यांच्या पत्नी सौ. वर्षा राऊत यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. या प्रकरणी विरोधी पक्षाच्या नेत्याकडून करण्यात येत असलेल्या टीकेविषयी संजय राऊत यांनी ही चेतावणी दिली आहे.