वेंगुर्ला तालुक्यातील वजराट गावच्या श्री सातेरीदेवीचा आज जत्रोत्सव

वजराट गावच्या श्री सातेरीदेवीचा जत्रोत्सव

श्री सातेरीदेवी

इतिहास

वेंगुर्ला तालुक्यातील वजराट गावच्या श्री सातेरीदेवीचा जत्रोत्सव २६ डिसेंबर २०२० या दिवशी साजरा होत आहे. वजराट गावचा मूळ पुरुष परब, मये (गोवा) येथील आहे. तो सांगेलीला त्याचे मामा राऊळ यांच्याकडे असायचा. राऊळ हे तेथील श्री देव गिरेश्‍वराचे मानकरी होते. मामा वयोवृद्ध झाल्यावर त्यांचा भाचा परब देवांची पूजाअर्चा करू लागला. नंतर मामाच्या निधनानंतर गावरहाटी त्याने पुढे चालवली; मात्र यामुळे गाव जागृत होऊन गावच्या लोकांनी परब याच्या विरोधात पावले उचलली आणि परब यांना नामशेष करण्याचे ठरवले.

गावाचे नाव वजराट होणे

परब हा भक्त असल्याने श्री गिरेश्‍वराने दृष्टांंत दिला आणि ‘तू येथून जा. मी तुझ्याबरोबर येतो’, असे सांगितले. त्यानुसार परब सहकुटुंंब ‘आमील’ घेऊन तेथून निघाला. दृष्टांतात देवाने येथून निघाल्यावर ज्या ठिकाणी दिवस उजाडेल त्या ठिकाणी तू थांबायचे, असे सांगितले होते. त्यानुसार परब ज्या ठिकाणी थांबला ते गाव वजराट होते. त्याने मागे पाहिले, तर देव मागे नव्हता. देव दिसेना म्हणून तो देवाचा शोध घेऊ लागला. त्याच वेळी एक गाय एका मंदिराच्या ठिकाणी पान्हा सोडतांना तेथील ब्राह्मणाला दिसली. ते पाहून ब्राह्मणाने तेथील पालापाचोळा बाजूला करून पाहिले असता भूमीत लिंग असून त्यातून रक्त येतांना त्याला दिसले. ते पहात असतांना देव शोधत परबही तेथे पोचला. या वेळी दोघेही देव आपलाच म्हणू लागले. या वेळी परब याने सांगितले, ‘जर गायीचे दूध टाकून रक्त थांबले, तर देव तुमचा; मात्र माझ्याकडचे ‘आमील’ टाकून रक्त थांबले, तर तो माझा देव गिरेश्‍वर.’ आश्‍चर्य म्हणजे ‘आमील’ टाकल्यावर रक्त थांबले. त्यामुळे देव परब यांचा झाला. त्याच वेळी श्री सातेरीदेवी वज्रासुराचा वध करून विश्रांतीसाठी तेथे थांबली आणि तेव्हापासून श्री देव गिरेश्‍वर आणि श्री सातेरीदेवी मिळून वजराट गावची गावरहाटी सिद्ध (तयार) झाली अन् गावाला वजराट हे नाव पडले, अशी या देवस्थानची आख्यायिका परब जाणकार मंडळींकडून सांगितली जाते. साधारणत: ३०० वर्षांपूर्वीचे मंदिर असावे, अशी मंदिराची रचना आहे, असे येथील डचकालीन वास्तू पाहून लक्षात येते.

श्री सातेरीदेवीचे मंदिर

मंदिरात साजरे केले जाणारे उत्सव  

श्री गिरेश्‍वराचा जत्रोत्सव त्रिपुरारी पौर्णिमेच्या दुसर्‍या दिवशी केला जातो आणि याच दिवशी श्री सातेरीदेवीच्या जत्रोत्सवाचा दिवस ठरवला जातो. गुढीपाडवा, आषाढी एकादशी, गौरी गणपति या सणांच्या वेळी देवीला ओवाळणे, नवरात्रोत्सव, दसरा आणि इतर सर्व सण देवळात साजरे केले जातात. देवीकडे कौल लावून प्रसाद घेतले जातात.

जत्रोत्सवाचा दिवस

जत्रेच्या दिवशी देवतांची पूजा केली जाते. तरंग सजवले जातात. या दिवशी गावातील आणि आजूबाजूच्या गावातील लोक, तसेच पाहुणे मंडळी येतात. देवीची ओटी मोठ्या भक्तीभावाने भरतात. इतर देवळांमध्ये शिवपिंडीवर अभिषेक करण्यासाठी ब्राह्मण पुजारी लागतात; परंतु येथे शिवपिंडीवर परबांनी केलेला अभिषेक चालतो. या दिवशी रात्री १२ वाजता पालखी काढली जाते. दशावतारी नाट्यप्रयोगाने जत्रेची सांगता होते. नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते. देव आणि देेवी हाकेला पावतात, अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. अशा श्री सातेरीदेवीच्या जत्रोत्सवाला भाविकांनी येऊन देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानचे मानकरी यांनी केले आहे.

१७ मे २००९ या दिवशी येथील श्री देव गिरेश्‍वर देवालयाचा जीर्णोद्धार करून कलशारोहण सोहळा करण्यात आला. तेव्हापासून प्रतिवर्षी १७ मे या दिवशी वर्धापनदिन साजरा केला जातो. सर्व परब गावकरी मंडळी आणि ग्रामस्थ मिळून उत्सव साजरा करतात.

संकलक : श्री. संदीप आळवे, कामळेवीर, सिंधुदुर्ग.

जत्रोत्सवाच्या कालावधीत कोरोनाविषयीचे नियम पाळण्याचे आवाहन

​यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर जत्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे जत्रोत्सवाच्या दिवशी भाविकांनी गर्दी न करता कोरोनाविषयीचे नियम पाळून दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.