कितीही कठोर कायदे केले, तरी गुन्हेगारी नष्ट करता येत नाही. यासाठी गुन्हेगारांना कठोर शासन देण्यासह धर्मशिक्षण आणि नैतिकता यांचेही धड द्यायला हवेत. तसे केल्यासच गुन्हेगारीवर आळा घालता येईल.
नागपूर – ‘ऑरेंज सिटी’ म्हणून ओळखले जाणार्या नागपूर शहरात गेल्या काही वर्षांत गुन्हेगारी वाढली आहे. या कारणास्तव नागपूरला ‘गुन्हेगारी शहर’(क्राईम सिटी) म्हणूनही संबोधले जात आहे. राष्ट्रीय पातळीवर पाहिले असता गुन्ह्यांमध्ये नागपूरचा दुसरा क्रमांक लागतो. ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’ने या संदर्भात अहवाल प्रसिद्ध केला आहे.
या अहवालानुसार वर्ष २०१९ मध्ये प्रति १ लाख लोकसंख्येमागे हत्येच्या प्रकरणात नागपूर दुसर्या क्रमांकावर आहे. या सूचीत बिहारची राजधानी पाटणा प्रथम क्रमांकावर आहे. पाटणा येथे प्रति १ लाख लोकसंख्येमागे ४.७ टक्के हत्या झाल्या आहेत, तर नागपूर येथे प्रति १ लाख लोकसंख्येमागे ३.६ टक्के हत्या झाल्या आहेत. विशेष म्हणजे महानगर असलेल्या देहली येथे हे प्रमाण ३.१ टक्के, राजस्थानातील जयपूरमध्ये ३.० टक्के, उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये २.६ टक्के एवढे आहे. यामध्ये देशातील पहिल्या २० शहरांमध्ये मुंबई आणि पुणे या शहरांचाही समावेश आहे. पुणे तेराव्या, तर मुंबई सतराव्या स्थानावर आहे. पुणे येथे प्रति १ लाख लोकसंख्येमागे १.५ टक्के हत्यांची प्रकरणे समोर आली आहेत, तर महानगरी मुंबईत हे प्रमाण ०.९ टक्के एवढे आहे.