गेली ७२ वर्षे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करणारे गाव ‘बेल्लद बागेवाडी’

बेळगाव – येथील हुक्केरी तालुक्यातील ‘बेल्लद बागेवाडी’ या गावात वर्ष १९४८ ते १९७७ पर्यंत केवळ एका प्रभागातील निवडणूक वगळता गत ७२ वर्षांपासून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करून गावाने राज्यात ओळख निर्माण केली आहे. माजी मंत्री आणि सलग आठव्यांदा निवडून आलेले आमदार उमेश कत्ती, तसेच माजी खासदार अन् जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान अध्यक्ष रमेश कत्ती यांचे हे गाव आहे. यंदाच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व ३३ जागा बिनविरोध झाल्या आहेत. माजी खासदार रमेश कत्ती आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत बिनविरोध निवड झालेल्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

‘बेल्लद बागेवाडी’ ग्रामपंचायतीने ७२ वर्षांपासून निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा राखली आहे. राज्यात हा आदर्श आहे. बिनविरोध निवडणुकीमुळे गावाच्या विकासाला गती मिळणार आहे. भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रयत्नांमुळे यंदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. – रमेश कत्ती, अध्यक्ष, जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक