नगर – हमी भाव मिळत असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात मका पेरतात. शेतकर्यांनी पिकवलेला मका हमी भावाने खरेदी करण्यासाठी राज्य सरकारकडून खरेदी केंद्रे चालू केली जातात; मात्र राज्य सरकारने चालू केलेली हमी भाव मका खरेदी केंद्रे बंद करण्यात आली आहेत. यावरून कर्जत तालुक्यातील शेतकर्यांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. बंद केंद्राच्या समोरच शेतकर्यांनी मका भरलेली वाहने आणून उभी केली असून खरेदी चालू झाल्याविना हटणार नसल्याची चेतावणी दिली आहे.
भाजपच्या वतीने अनेकदा आंदोलनाची चेतावणी दिल्यानंतर कर्जत तालुक्यात दोन सरकारी मका खरेदी केंद्रे चालू केली गेली. परंतु तीही कागदोपत्रीच राहिली. ‘कर्जत-जामखेडच्या लोकप्रतिनिधींचे शेतकर्यांच्या मूळ समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे’, असे भाजपचे पदाधिकारी सचिन पोटरे यांनी सांगितले.
यावर राज्य सरकारने ठरवून दिलेली मका खरेदीची मर्यादा पूर्ण झाल्यामुळे केंद्र बंद करण्यात आली आहेत. पुढील मंजुरी आल्यानंतर ती पुन्हा चालू केली जातील, असे तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी सांगितले.