वर्ष २०१५ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या अपूर्व भावसोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर साधकाला आलेल्या अनुभूती

१. प.पू. चिदंबर स्वामी महाराज यांच्या समाधी स्थळी आलेल्या अनुभूती

१ अ. सासर्‍यांच्या इच्छेप्रमाणे सहकुटुंब मुरगोडक्षेत्री दर्शनाला गेल्यावर आनंदाचे भरते येणे : ‘माझे सासरे कर्नाटक राज्यातील सौंदत्ती तालुक्यातील मुरगोडवासी अवतारी संत प.पू. चिदंबर स्वामी महाराज यांचे भक्त आहेत. त्यांच्या मनोकामनेप्रमाणे १०.५.२०१५ या दिवशी ते आणि आम्ही दोन्ही जावई सहकुटुंब मुरगोडक्षेत्री दर्शनाला गेलो. तेथे आम्हाला पुष्कळ चैतन्य जाणवले. त्या वेळी मला वाटले, ‘संतांची समाधी असल्यामुळे मला चैतन्य जाणवत आहे.’ मठात प्रवेश करताच मला आनंदाचे भरते आले. आजूबाजूला रुक्ष वातावरण असले, तरी मठात शीतलता होती.

श्री. दिवाकर (दीपक) छत्रे

१ आ. दुपारच्या वेळी मठाच्या प्रदक्षिणा मार्गातील लाद्या तापल्या असल्या, तरी प्रदक्षिणा घालता येणे : तेथे मठातील सर्व पवित्र स्थाने आणि देवता यांना एकत्रितपणे प्रदक्षिणा घालण्याची पद्धत आहे. दुपारची वेळ असल्यामुळे मठाच्या आवारातील लाद्या तापल्या होत्या, तरी मी शांतपणे ११ प्रदक्षिणा घालू शकलो. प्रदक्षिणा घालून होईपर्यंत मला परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांविना दुसरे काहीही दिसत नव्हते. माझे संपूर्ण शरीर हलके होऊन संथ लयीने प्रदक्षिणा पूर्ण झाल्या.

१ इ. प.पू. चिदंबर स्वामींच्या उत्तराधिकार्‍यांचे दर्शन घेतल्यावर त्यांनी ‘हिंदु राष्ट्र येईल’, असा आशीर्वाद देणे : दुपारी महाप्रसादानंतर मी प.पू. चिदंबर स्वामींचे वंशज आणि सध्याचे उत्तराधिकारी दीक्षित यांच्याकडे ‘हिंदु राष्ट्र येण्यासाठी सनातन संस्थेच्या कार्याला यश येऊ दे’, असा आशीर्वाद मागितला. त्यांनीही उत्स्फूर्तपणे ‘हिंदु राष्ट्र येईल’, असा आशीर्वाद दिला. ‘जेथे जातो तेथे परम पूज्य माझे सांगाती’, अशी अनुभूती घेऊन मी परतीच्या प्रवासाला निघालो.

२. शिवरात्रीच्या दिवशी ‘रामनाथी येथील सनातनचा आश्रम विश्‍वव्यापक कसा आहे ?’, याची अनुभूती येणे आणि १०.५.२०१५ या दिवशी रामनाथी आश्रमात झालेल्या सोहळ्याचे वृत्त वाचल्यावर अनुभूतीचा उलगडा होणे

वर्ष २०१५ मध्ये शिवरात्रीच्या वेळी आश्रमाच्या वास्तूकडे पाहून मी शरण जाऊन मानस नमस्कार केला. त्या क्षणी  आकाशवाणी व्हावी, अशा धीरगंभीर आवाजात मला ऐकू आले, ‘तुला प्रत्यक्षात दिसणारा हा रामनाथी आश्रम एवढाच मर्यादित नाही. हे आकाश म्हणजे ज्याचे छत आहे, भूमी ज्याच्या फरश्या आहेत, सर्व बाजूंना दिसणारी क्षितिजे ज्याच्या भिंती आहेत, अशा या आश्रमात मोजकेच साधक नसून चराचर यात रहाते.’ हे ऐकतांना मी रोमांचित होत होतो. परमात्म्याला शरण जाऊन भारावलेल्या स्थितीत सेवेसाठी गेलो. बरेच दिवस या अनुभूतीतील चैतन्याची आठवण होऊन मी पुनःपुन्हा रोमांचित होत होतो. ‘आपण या व्यापक रूपापुढे किती छोटे आहोत ?’, याची जाणीव मला होत होती.

परमात्म्याने दिलेल्या या अनुभूतीचा उलगडा मला ११.५.२०१५ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मधील सोहळ्याचे वृत्त वाचून झाला. ‘भगवंता, मी तुझा कसा उतराई  होऊ ? आम्हा सर्व साधकांकडून गुरूंना अपेक्षित अशी साधना होऊन परात्पर गुरुरूपी श्रीकृष्णाच्या चरणी सर्वांना ठाव मिळू दे’, अशी परात्पर गुरुदेवांना प्रार्थना केली.

‘हे सर्वात्मका ! हे सर्वज्ञा ! हे जगतपालका !, तुझ्या चरणी कळकळीची प्रार्थना करतो, ‘आम्हा सर्व साधकांच्या मन आणि बुद्धी यांवरील तामसिक शक्तीचे आवरण दूर होऊन परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे आम्ही टिकून आहोत’, अशी जाणीव आम्हाला सदोदित राहू दे आणि त्यांना अपेक्षित अशी साधना आम्हा सर्वांकडून होऊ दे.’

– श्री. दिवाकर (दीपक) छत्रे, रायंगिणी, बांदोडा, गोवा.

(टीप –‘दिवाकर’ हे प.पू. दास महाराज यांनी केलेले नामकरण आहे.)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक