मुंबई – सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) धाडीमुळे चर्चेत असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी अभिनेत्री कंगना रणावत यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव सभागृहाच्या बाहेर विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे दिला.
या वेळी सरनाईक म्हणाले की, माझ्या घरात पाकिस्तानी क्रेडिट कार्ड मिळाले, असे ट्वीट कंगना यांनी केले होते. त्यात कोणतेही तथ्य नव्हते; मात्र कंगना यांनी केलेल्या ट्वीटवरून प्रसिद्धीमाध्यमांनी वृत्त प्रसारित केले. त्यामुळे माझी अपकीर्ती झाली आहे. माझ्या घरावरील धाडीतही तसे काही आढळले नाही. माझी अपकिर्ती करण्याचे कटकारस्थान आहे, त्यामुळे हक्कभंगाच्या प्रस्तावाला संमती द्यावी.
टॉप्स समूहातील कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी चालू आहे.
पूर्वेश सरनाईक यांना ईडीकडून समन्स
रुग्णाईत असल्याचे कारण सांगत चौकशीला जाणे टाळले !
मुंबई – टॉप्स समूहातील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून अन्वेषण चालू आहे. या अन्वेषणाअंतर्गत शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा पूर्वेश सरनाईक यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची चौकशी करण्यात आली आहे; मात्र पूर्वेश सरनाईक यांनी रुग्णाईत असल्याचे कारण सांगत चौकशीला उपस्थित रहाण्याचे टाळले.