१. यज्ञ चालू झाल्यावर मन अस्थिर होणे आणि नंतर यज्ञातील चैतन्यामुळे घंटाभरात मनाची अस्थिरता न्यून होणे
‘रामनाथी आश्रमात राजमातंगी यज्ञ चालू झाल्यावर मला पोटात दुखणे आणि पाठ दुखणे, असे त्रास होऊ लागले. माझे मन पुष्कळ अस्थिर झाले. ‘मला यज्ञाचा लाभ होऊ नये’, यासाठी मोठ्या वाईट शक्ती असे त्रास निर्माण करत आहेत’, याची मला जाणीव झाली. मी नामजप करतांना यज्ञातील चैतन्यामुळे घंटाभरात माझ्या मनाची अस्थिरता न्यून होऊ लागली.
२. यज्ञाच्या वेळी भावजागृती होऊन चतुर्भुज देवीचे दर्शन होणे आणि संतांचे यज्ञस्थळी आगमन झाल्यावर वातावरणात गारवा जाणवणे
त्यानंतर माझी पुष्कळ भावजागृती होत होती. नंतर माझ्या मनात विचार आला, ‘राजमातंगीदेवी कशी दिसत असेल ?’ त्या वेळी मला डोळ्यांसमोर चतुर्भुज देवी दिसली. तिची कांती पोपटी रंगाची होती. तिला चार हात असून दोन हातांत आयुधे, एका हातात कमळ आणि एक हात आशीर्वाद देणारा होता. देवीच्या मुकुटाच्या टोकावर काहीतरी गोल चमकतांना दिसत होते. त्याचा पांढरा शुभ्र असा प्रकाश होता आणि ते पुष्कळ तेजस्वी होते. तेव्हा मनात विचार आला, ‘हे काय असेल ? असे मी कधी कोणत्या देवतेच्या मुकुटावर पाहिले नाही.’ ‘मला जे दिसत आहे, ते खरे असेल का ?’, अशी जिज्ञासा माझ्यात निर्माण झाली. (नंतर मला देवीचे चित्र बघायला मिळाले. त्यात देवीचा रंग पोपटी होता. तिने मुकुटावर चंद्र धारण केला होता.) त्या वेळी ‘मला देवीच्या मुकुटावर मध्यभागी दिसणारा पांढरा प्रकाश, म्हणजे चंद्र आहे’, हे लक्षात आले. देवीने दर्शन दिले आणि त्याची प्रचीतीही दिली; म्हणून मला कृतज्ञता वाटत होती. त्यानंतर मला आतून शांत वाटायला लागले. संतांचे यज्ञस्थळी आगमन झाल्यावर मला वातावरणात गारवा जाणवला आणि पुष्कळ भाव जागृत होत होता.
‘परात्पर गुरु डॉक्टर, तुम्ही साक्षात् विष्णुरूप आहात. तुमच्या कृपेमुळे साक्षात् देवताही यज्ञाला उपस्थित असतात. तुमच्या कृपेमुळेच मला हे अनुभवता आले. तुमच्या चरणी आम्ही सर्व साधक कोटीशः कृतज्ञ आहोत.’
– श्री. सुमित सरोदे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.५.२०१८)
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |