मुंबई – अमराठी लोकांचा आम्ही द्वेष करतो, ही चुकीची समजूत आहे. महाराष्ट्रात रहाणार्या अमराठी लोकांनी मराठी माणसे, मराठी भाषा आणि मराठी संस्कृती यांचा आदर केला, तर त्यांना आमचा विरोध होणार नाही, असे वक्तव्य मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले आहे.
या वेळी नितीन सरदेसाई म्हणाले, ‘‘अमराठी जेव्हा अनादराची वर्तणूक करतात, तेव्हा आम्ही विरोधाची भूमिका घेतो. केवळ विरोधाला विरोध किंवा अमराठीला विरोध अशी ठोकळेबाज भूमिका आमच्या पक्षाची नाही. मनसेच्या मराठीपणाचा अर्थ हा अतिशय व्यापक आहे. ‘महाराष्ट्रातील भूमीपुत्रांना त्यांचा हक्क मिळवून देणे’, ही आमची प्राथमिकता आहे. राज्यातील नोकर्यांमध्ये मराठी लोकांना प्राधान्य, मराठी भाषेचा अधिकाधिक वापर आणि मराठी संस्कृतीचे पालन असा मनसेच्या मराठीपणाचा अर्थ आहे. मनसेच्या मराठीपणाचा व्यापक अर्थ कुणाच्या लक्षात आला नसेल, तर यावर नक्कीच चर्चा केली जाऊ शकते. अमराठी नागरिकांना मारहाण किंवा तत्सम प्रकारांविषयी मनसेचे नाव घेतले जात असेल, तर हे सूत्रही चुकीचे आहे. यावरही चर्चा करण्यास मनसे सिद्ध आहे.’’
काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘मनसेची अमराठी लोकांच्या विरोधाची भूमिका आम्हाला मान्य नाही. ही भूमिका सोडली, तर मनसेसमवेत चर्चा होऊ शकते’, या अर्थाचे विधान केले होते. त्यावर नितीन सरदेसाई यांनी वरील भूमिका मांडली.