महामंडळात कर्मचार्यांसाठीची सक्तीची डिजिटल बायोमेट्रीक उपस्थिती रहित करण्याचीही मागणी
पणजी, ४ डिसेंबर (वार्ता.) – सरकारी कर्मचार्यांसाठी ‘दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना’ पुन्हा चालू करावी. राज्यात कोरोनाचा संसर्ग अल्प झालेला नसून तो वाढतच आहे. त्यामुळे सरकारी कार्यालये आणि महामंडळांचे कर्मचारी यांना सक्तीची करण्यात आलेली डिजिटल बायोमेट्रीक उपस्थिती रहित करावी, अशी मागणी ‘गोवा फॉरवर्ड’चे निमंत्रक जॉन नाझारेथ यांनी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत केली.
जॉन नाझारेथ पुढे म्हणाले, ‘‘म्हापसा येथील एका सरकारी कार्यालयात डिजिटल बायोमेट्रीक उपस्थितीमुळे कर्मचार्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे लक्षात आले आहे. सरकारी कर्मचार्यांना सरकारी रुग्णालयांतील देयकांवर वैद्यकीय खर्चाची परतफेड मिळते; मात्र ‘दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजने’चे ‘कार्ड’ असल्यास आपत्कालीन परिस्थितीत सरकारी कर्मचार्यांना या योजनेखालील रुग्णालयांमध्ये उपचार घेणे शक्य होईल. गेल्या वर्षीपासून सरकारी कर्मचार्यांसाठी ही योजना रहित करण्यात आली होती.’’