सूक्ष्मातून प.पू. भक्तराज महाराज यांनी संत आणि श्रीकृष्ण यांचे पाद्यपूजन करवून बगलामुखी याग करवून घेणे 

१. पहाटे एक भयावह स्वप्न पडून झोपेतून रडत उठल्यामुळे मन दिवसभर अस्वस्थ असणे

‘७.१०.२०१८ या दिवशी मला सौ. राधाताई (सौ. राधा मल्लिक) यांच्याकडून रामनाथी आश्रमात श्री बगलामुखीदेवी आणि चामुंडादेवी याग असल्याचे समजले. मी रात्री प्रार्थना करून झोपले. पहाटे मला एक भयावह स्वप्न पडले आणि मी रडतच उठले. मला असा अनुभव प्रथमच आला. त्यामुळे माझे मन भावनिक झाले. त्यानंतर माझ्या मनातील मायेचे विचार पुष्कळ वाढले आणि योग्य विचार करणे मला अतिशय कठीण झाले. त्याविषयी राधाताईशी बोलून घेतल्यावर त्यांनी नामजप करण्याविषयी मार्गदर्शन केले; पण माझा नामजप एकाग्रतेने होत नव्हता.

सौ. भारती बागवे

२. बगलामुखीदेवीचा नामजप करतांना सूक्ष्मातून प.पू. भक्तराज महाराज येणे आणि त्यांनी बगलामुखी यज्ञ करवून घेणे 

२ अ. प.पू. भक्तराज महाराज यांच्यापाठोपाठ परात्पर गुरु डॉ. आठवले, चामुंडा स्वामी, नंतर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या दोघी कुंकवाने मळवट भरून येणे अन् प.पू. भक्तराज महाराज यांनी त्या सर्वांची पाद्यपूजा करण्यास सांगणे : त्यानंतर मी सेवा करतांना अकस्मात् ‘बगलामुखीदेवीचा नामजप करावा आणि स्तोत्र ऐकावे’ ही सूचना वाचली. मी सकाळ-संध्याकाळ स्तोत्र ऐकत श्री बगलामुखीदेवीचा नामजप करू लागले. २ – ३ दिवसांनी सकाळी ६ वाजता मी नामजप करतांना प.पू. भक्तराज महाराज सूक्ष्मातून माझ्यासमोर येऊन बसले. ‘पुष्कळ दिवसांनी आज प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) आले आहेत’, हे पाहून माझे मन आनंदी झाले. मी त्यांची पाद्यपूजा केली. तोपर्यंत परात्पर गुरु डॉ. आठवले आले आणि ते प.पू. बाबांच्या बाजूला आसनस्थ झाले. प.पू. बाबा मला म्हणाले, ‘आता गुरुपूजन करून घ्या.’ गुरुदेवांच्या चरणांची पूजा होताच श्री चामुंडास्वामी (अमेरिकेतील एक संत) यांनी खोलीत प्रवेश केला आणि प.पू. बाबांच्या चरणांना वंदन करून आसनस्थ झाले. प.पू. बाबांनी मला चामुंडास्वामींची पाद्यपूजा करण्यास सांगितली. त्यांची पाद्यपूजा होईपर्यंत श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ दोघीही लाल रंगाच्या साड्या नेसून अन् कपाळावर कुंकवाचा मळवट भरून आल्या. त्या दोघी उत्तरेला मुख करून आसनस्थ झाल्या. प.पू. बाबांनी मला या दोघी देवींचीही पाद्यपूजा करण्यास सांगितली.

२ आ. याग चालू करतांना सर्वांनी यागाची पूजा करताच देवी पार्वती दुर्गादेवीच्या रूपात प्रकट होणे : दोघी देवींची पाद्यपूजा झाल्यावर प.पू. बाबांनी पुरोहितांना ‘आता बगलामुखी याग चालू करा’, असेे सांगितले. यागाची पूजा केल्यावर पार्वतीस्वरूप श्री दुर्गादेवी प्रकट झाली. ती गुरुदेव आणि श्री चामुंडास्वामी यांच्यामध्ये आसनस्थ झाली. देवी पार्वतीची पाद्यपूजा केल्यावर तिने आशीर्वाद दिला.

२ इ. परात्पर गुरुदेवांनी पिवळी साडी देणे आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी मळवट भरून त्यावर कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीदेवीसारखे मोठे कुंकू लावणे, त्या वेळी सर्व साक्षीभावाने पहाणे : त्यानंतर गुरुदेवांनी मला पिवळ्या रंगाची साडी दिली. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकूंनी ती माझ्या खांद्यावर ठेवली. त्यानंतर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी हळदीने माझा मळवट भरला अन् त्यावर कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीदेवीसारखे मोठे कुंकू लावले. मी हे सर्व साक्षीभावाने पहात होते. मी एकदम शांत होते. जणूकाही तिथे माझे अस्तित्वच नव्हते.

त्यानंतर मला चांगले वाटू लागले. माझ्या मनात चांगले विचार येऊ लागले आणि एकाग्रतेने नामजप होऊ लागला.

३. इतर अनुभूती

अ. मला दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये श्री बगलामुखीदेवी आणि श्री चामुंडादेवी यागांविषयी वाचायला मिळाले. त्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ अगदी मला दिसल्याप्रमाणे लाल रंगाच्या साडीत अन् मळवट भरून आल्या होत्या.

आ. २ दिवसांनी माझी एक मैत्रीण पिवळ्या रंगाची एक साडी घेऊन आली आणि तिने मला विचारले, ‘‘तुला ही साडी पाहिजे का ?’’ तिच्या हातातील साडी पाहिल्यावर गुरुदेवांनी यागाच्या वेळी सूक्ष्मातून मला दिलेल्या साडीची आठवण झाली; म्हणून मी कृतज्ञताभावाने ती साडी स्वीकारली.

४. कृतज्ञता

‘हे गुरुदेवा, केवळ तुमच्या कृपेने हा जीव जिवंत आहे. ‘माझा प्रत्येक श्‍वास तुमच्यासाठी चंदनासारखा झिजू दे’, ही तुमच्या चरणी प्रार्थना आहे. गुरुदेवा, ‘माझी भक्ती अपूर्ण आहे, तरीही केवळ तुमच्या कृपेने मला ईश्‍वराला अनुभवता आले’, यासाठी कृतज्ञतेला शब्दच नाहीत.’

– सौ. भारती बागवे, कॅनडा (१६.१०.२०१९)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक