रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांची प्रक्रिया राबवतांना जाणवलेली सूत्रे

‘डिसेंबर २०१८ मध्ये मला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी मला सांगितले, ‘‘काकू, अजून साधनेचे प्रयत्न वाढायला पाहिजेत. त्यासाठी तुम्ही सौ. सुप्रिया माथूर (प्रक्रियेतील साधकांचा आढावा घेणारी साधिका) यांच्या आढाव्याला बसा.’’ मी त्यांना ‘हो’, असे म्हणाले; परंतु मला मनातून भीती वाटत होती, ‘मला प्रक्रियेचे लिखाण जमेल का ? मला चुका लक्षात येणे, चुका सांगणे, त्यांचे विश्‍लेषण लिहिणे, तसेच स्वभावदोषांची व्याप्ती काढणे, हे सगळे जमेल का ?’ काही वेळाने माझे मन सकारात्मक होऊन माझ्याकडून परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली अन् मी मनोमन प्रार्थना केली, ‘तुम्ही मला प्रक्रियेसाठी निवडले आहे. आता तुम्हीच ती माझ्याकडून राबवून घ्या आणि त्यातून मला शिकता येऊ दे.’ ही प्रकिया राबवतांना मला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

१. साधकांच्या अंतर्मनाचा ठाव घेऊन सत्य वदवून घेणे

व्यष्टी आढाव्याला बसतांना मनाचे युद्ध चालू होते. एकेका साधकाचा आढावा ऐकतांना सौ. सुप्रियाताई (आढावा घेणारी साधिका) साधकाच्या मनात प्रवेश करायच्या. त्यातून साधकांच्या तोंडून खरे तेच बोलले जायचे. साधक काहीही लपवू शकत नव्हते.

श्रीमती रजनी नगरकर

२. साधकांना अंतर्मुख करणे

सौ. सुप्रियाताई अगदी शांतपणे त्या साधकांना प्रश्‍न विचारून त्यांच्या अंतर्मनाचा ठाव घेतात. त्या बोलत असतांना ‘त्या बोलत नसून त्यांच्या माध्यमातून देवच बोलतो’, असे जाणवते. त्या दृष्टीकोन देतांना त्या साधकालाच नाही, तर आढाव्यात बसलेल्या सर्व साधकांना एकाच वेळी मार्गदर्शन करतात. त्या वेळी आढाव्यातील प्रत्येक जण अंतर्मुख होतो आणि ‘अशी चूक स्वतःकडून होते का ?’, हे पहातो.

३. आढावा देतांना ‘प्रतिमा जपणे’ या अहंच्या पैलूमुळे त्रास होणे

आढावा देतांना साधकांना ‘कसे सांगू ? काय सांगू ?’, असे होते. चुका सांगतांना वेदना होत असतात; कारण ‘आपले भांडे फुटणार’, या भावाने ते भयभीत झालेले असतात. ‘प्रतिमा जपणे’ हा अहंचा पैलूच त्रास देत असतो. त्याच वेळी अपेक्षांचा डोंगरही कोसळतो; कारण या स्वभावदोषांचे दुष्परिणाम आणि त्यांच्या अनुषंगाने उद्भवणारे इतर स्वभावदोष समोर येतात. ‘मला कळते’, ‘मला ठाऊक आहे’, या चिखलयुक्त गाळात आपण अडकलेलो असतो. या प्रक्रियेतून आपल्याला ‘ऐकून घेणे, मनाला न गोंजारता देवाच्या सान्निध्यात ठेवणे, मनाचा सातत्याने आढावा घेणे’, ही सवय लावून घ्यावी लागते. या प्रसंगांना सामोरे जातांना मला पुष्कळ जड जात होते.

४. स्वतःची चूक सांगितल्यावर अनेक दृष्टीकोन मिळून नकारात्मकतेत जाणे

प्रक्रियेचा आढावा घेणार्‍या सौ. सुप्रियाताई आणि कु. स्वाती गायकवाड या दोघीही साधकांना चुकीच्या मुळापर्यंत नेण्याचा प्रयत्न करतात. एकदा माझ्याकडून घडलेल्या चुकीसाठी मला कु. स्वातीताई आणि अन्य साधक यांनी अनेक दृष्टीकोन दिले. त्यामुळे मला पुष्कळ भंडावल्यासारखे झाले. मला वाटले, ‘अरे, मी माझी चूक मांडत असतांना हे साधक मला अजून का सांगत आहेत ?’ त्या दिवशी मी सारणीत लिहिले, ‘मला प्रक्रियाच नको’ आणि मी एकदम नकारात्मकतेत गेले.

५. समष्टीत जाऊन आपली चूक सगळ्यांसमोर सांगणे

प्रक्रियेतील आणखी एक भाग म्हणजे समष्टीत जाऊन आपली चूक सगळ्यांसमोर सांगणे. हाही स्वभावदोषांविरुद्ध लढण्याचा एक प्रकार देवाने शिकवला. आपला मूळ स्वभाव चूक लपवण्याकडे असतो; पण समष्टीत चूक सांगितल्याने पापक्षालन होते. ती चूक सगळ्यांमध्ये सांगितल्याने मनाला हलकेपणा जाणवतो. ‘प्रतिमा जपणे’ या अहंच्या पैलूला ठेच बसून आपले मूळ रूप सर्वांसमोर येते. ती चूक परत करतांना मन कचरते.

६. फळ्यावर चूक लिहिणे

आपल्याकडून झालेली चूक फळ्यावर लिहिल्याने ती चूक अनेकजण वाचतात. चूक लिहितांना आपण जड मनाने, म्हणजे मनाशी युद्ध करूनच ती लिहितो. चूक फलकावर लिहिली, तर अनेक साधक ती वाचतात. देवाजवळ मनाने जाण्याचे एक साधन म्हणजे फळा आहे; कारण साधक हे गुरूंचीच अनेक रूपे आहेत. त्यामुळे अनेक डोळ्यांतून देव ती चूक वाचत असतो.

ही प्रक्रिया मोक्षप्राप्तीपर्यंत अविरत चालूच रहाणार असल्याने ती मनापासून राबवली पाहिजे. ही प्रक्रिया केवळ ‘सनातन’च्या आश्रमातच शिकवली जाते. साधकांकडून ही प्रक्रिया राबवून घेणार्‍या आणि त्यांची साधनेत प्रगती करवून घेणार्‍या परात्पर गुरु डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करते.’

– श्रीमती रजनी नगरकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.६.२०१९)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक