मुरगाव बंदरातील कोळसा प्रदूषणावर देखरेख ठेवण्याचा मुख्यमंत्र्यांचा ‘गोवा प्रदूषण मंडळा’ला आदेश

पणजी, २६ नोव्हेंबर (वार्ता.) – मुरगाव पोर्ट ट्रस्टमध्ये किती प्रमाणात कोळसा हाताळला जातो आणि यामुळे किती प्रमाणात प्रदूषण होते, याविषयी माहिती गोळा करण्याचा आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिला आहे.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘कोळसा प्रदूषणाविषयी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल आल्यानंतर मुरगाव पोर्ट ट्रस्टमध्ये कोळसा हातळणीमध्ये प्रथम ५० टक्के घट करण्यात येणार आहे. मुरगाव पोर्ट ट्रस्टसाठी कोळशाव्यतिरिक्त अन्य पर्याय शासन शोधत आहे.’’

कोळसा वाहतूक वाढवण्यास काँग्रेसनेच अनुमती दिली ! – आमदार चर्चिल आलेमाव यांचा पुराव्यासह आरोप

मडगाव – मागील काँग्रेस शासनाचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी मुरगाव पोर्ट ट्रस्ट मध्ये कोळसा हाताळणीत वाढ करण्यास मान्यता दिली होती. ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी २६ नोव्हेंबर या दिवशी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पुराव्यासह दिली.

१५६ कोटी रुपये ‘सेस’ भरण्याच्या ‘जे.एस्.डब्ल्यू.’ला दिलेल्या नोटिसीला न्यायालयाची स्थगिती

पणजी – गोवा शासनाने ‘जे.एस्.डब्ल्यू.’ या आस्थापनाला कोळसा वाहतुकीशी निगडित १५६ कोटी रुपये ‘सेस’ची थकबाकी भरण्याची नोटीस नुकतीच बजावली होती. शासनाच्या या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यासंबंधीची पुढील सुनावणी पुढील मासात होणार आहे.