सिंधुदुर्ग – पोलीस कर्मचार्याच्या बंद घराचे कुलुप तोडून चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला असून ही चोरी अन्य एका पोलीस कर्मचार्याच्या मुलानेच केल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी या मुलाला अटक करून न्यायालयात उपस्थित केले असता मुलाला २ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. या घटनेत संशयित मुलाने तब्बल ४ लाख ६७ सहस्र ४२४ रुपये किमतीच्या दागिन्यांची चोरी केली.
याविषयी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस वसाहतीत पोलीस कर्मचारी सुबोध साभाजी माळगांवकर वास्तव्यास असतात. त्यांचे घर अलीकडे बंद होते. १४ ते २१ नोव्हेबर या कालावधीत संशयित ओंकार राजू माळगे (वय २२ वर्षे) (रहाणार पोलीस वसाहत, सिंधुदुर्गनगरी; मूळ कोल्हापूरचा) याने माळगांवकर यांच्या हरवलेल्या चावीचा वापर करून त्यांच्या घराचे कुलुप उघडून घरात प्रवेश केला. या वेळी त्याने सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याच्या अंगठ्या, सोन्याच्या बांगड्या, अन्य दागिने, चांदीचे साहित्य, असे मिळून एकूण ४ लाख ६७ सहस्र ४२४ रुपयांच्या साहित्याची चोरी केली. हा प्रकार २२ नोव्हेंबरला माळगांवकर घरी आल्यावर उघड झाला. माळगांवकर यांनी त्याच दिवशी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली. त्यानंतर या प्रकरणाचे अन्वेषण करतांना पोलीस वसाहतीत रहाणार्या ओंकार राजू माळगे याच्यावर पोलिसांना संशय आला. त्यामुळे त्याला २३ नोव्हेंबरला अटक करून गुन्हा नोंद करण्यात आला.