विमान, रेल्वे यांनी महाराष्ट्रात येणार्‍यांना कोरोनाची चाचणी सक्तीची

मुंबई – देहली, राजस्थान, गुजरात, गोवा या चार राज्यांमधून महाराष्ट्रात विमान, रेल्वे यांद्वारे येणार्‍यांना कोरोनाची चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. या प्रवाशांचा कोरोनाचा आर्.टी.पी.सी.आर्. अहवाल हा ‘निगेटिव्ह’ असणे आवश्यक आहे, असा आदेश महाराष्ट्र सरकारने काढला आहे. बसने येणार्‍या प्रवाशांची महाराष्ट्राच्या सीमांवर तपासणी करण्यात येणार आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेऊन सरकारने हा आदेश काढला आहे. यासंबंधीची नियमावलीही घोषित केली आहे. महाराष्ट्रात येणार्‍या प्रवाशांमुळेही कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो हे लक्षात घेऊन हा आदेश काढण्यात आला आहे.

विमानाने महाराष्ट्रात येणार्‍या प्रवाशांचा आर्.टी.पी.सी.आर्. तपासणी अहवाल ७२ घंटे आधीचा असावा. हा अहवाल ज्या प्रवाशांसोबत नसेल, त्यांना विमानतळावर आल्यानंतर तपासणी करावी लागेल. विमानतळांनी यासंदर्भातील तपासणी केंद्र उभारले पाहिजे. या चाचणीचे शुल्क प्रवाशांकडून घेण्यात येईल. आर्.टी.पी.सी.आर्. तपासणी अहवाल ‘निगेटिव्ह’ असणार्‍या प्रवाशांनीच रेल्वेने प्रवास करावा, तसेच हा अहवाल सोबत आणावा. या प्रवाशांनी आर्.टी.पी.सी.आर्.ही चाचणी मागील ९६ घंट्यांमध्ये केलेली असावी, असे या आदेशात म्हटले आहे.

रस्ते मार्गाने प्रवासी येत असल्यास राज्याच्या सर्व सीमांवर या प्रवाशांची तपासणी करण्यात येणार आहे. प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली, तर त्यांना राज्याच्या सीमेवरूनच परत पाठवले जाणार आहे.