बंगालमध्ये भाजप महिला नेत्याच्या वाहन ताफ्यावर आक्रमण

बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा !

कोलकाता (बंगाल) – पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात हेरिया – मेधखली मार्गावर भाजपच्या नेत्या आणि माजी आय.पी.एस्. अधिकारी भारती घोष यांचा वाहनताफा तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अडवून आक्रमण केले, असा आरोप घोष यांनी केला आहे. ‘मेधखलीमध्ये होणार्‍या एका कार्यक्रमात आपण सहभागी होऊ नये, यासाठी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माझा रस्ता रोखला’, असा आरोप भारती घोष यांनी केला आहे.

घोष पूर्वी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या जवळच्या मानल्या जात होत्या. दुसरीकडे तृणमूल काँग्रेसकडून हा आरोप फेटाळण्यात आला आहे. ‘हे आक्रमण २ स्थानिक गटांमध्ये झाले असून तृणमूलशी त्याचा संबंधी नाही’, असा खुलासा तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आला आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी उपस्थित झाले आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.