सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) – झाराप येथील गंगाराम रेडकर यांच्या मालकीची बोलेरो पिकअप वाहन क्र. एम्एच् ७ पी २६११ ही बालाजी मार्बल, कुडाळ येथून अज्ञात चोरट्याने चोरली होती. याविषयी कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे अन्वेषण करण्यासाठी पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली नेमण्यात आलेल्या पथकाने सखोल चौकशी करून एका संशयिताकडे चोरीचे वाहन असल्याची माहिती मिळवली. त्यानुसार अन्वेषण पथकाने कोल्हापूर आणि परिसरात चोरीची बोलेरो पिकअप अन् चोरटे यांचा शोध चालू केला. पोलीस मागावर असल्याचे समजल्यानंतर आरोपीने वाहनासह पळ काढला आणि वाहन रत्नागिरी जिल्ह्यातील पाली या गावी बेवारस सोडून तेथून पलायन केले. ही गोष्ट अन्वेषण पथकास कळताच पथकाने पाली, रत्नागिरी येथून चोरीस गेलेले वाहन हस्तगत केले.
पोलिसांनी केलेल्या अन्वेषणाविषयी फिर्यादी श्री. रेडकर यांनी समाधान व्यक्त केले, तसेच वाहनचोरीच्या गुन्ह्यात सहभागी आरोपींविरुद्ध बाहेरील जिल्ह्यामध्ये वाहन चोरीचे गुन्हे प्रविष्ट असून हे सराईत चोरटे आहेत. त्यांच्याकडून जिल्ह्यातील यापूर्वी चोरीस गेलेल्या वाहनांचे इतर गुन्हेही उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अन्वेषण करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनी दिली.