सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना सज्जनगडावर प.प. श्रीधरस्वामी आणि समर्थ रामदासस्वामी यांचे आशीर्वाद मिळणे !

१. सज्जनगडावरील श्रीधरकुटीत गेल्यावर धर्मसंस्थापनेसाठी प.प. श्रीधरस्वामींचे आशीर्वाद मिळणे आणि ‘मी माझ्या पादुका परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दिल्या आहेत’, असे त्यांनी का सांगितले, याचा उलगडा होणे

१ अ. सज्जनगडावरील ‘श्रीधरकुटीत’ जाऊन तेथील प.प. श्रीधरस्वामीजींच्या पादुकांच्या समोर डोके टेकवून नमस्कार करत असतांना मस्तकाखाली बोटाच्या पेराएवढ्या पादुका दिसणे आणि तेव्हा ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे साक्षात् भगवान श्रीविष्णूचे अवतार असून धर्मसंस्थापनेचे कार्य पुढे चालवत आहेत; म्हणून मी माझ्या पादुका त्यांना दिल्या आहेत’, असे प.प. श्रीधरस्वामींनी सूक्ष्मातून सांगणे : ‘१४.१.२०२० या दिवशी आम्ही सातारा जिल्ह्यातील सज्जनगडावर गेलो होतो. सायंकाळच्या आरतीसाठी आम्ही तेथील श्रीधरकुटीत गेलो. तेथे आम्ही सनातनने प्रकाशित केलेले ‘सनातन पंचांग’ अर्पण केले. तेथील पुजार्‍यांनी ते प.प. श्रीधरस्वामी यांच्या पादुकांवर ठेवले आणि आरती केली. आरती केल्यावर पुजार्‍यांनी मला थांबवले आणि सनातनच्या कार्याची माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी मला प.प. श्रीधरस्वामींच्या पादुकांवरील वस्त्र प्रसादस्वरूप दिले. आरती झाल्यानंतर मी बाहेरील प.प. श्रीधरस्वामीजींच्या पादुकांच्या समोर डोके टेकवून नमस्कार करत होते, तेव्हा माझ्या मस्तकाखाली बोटाच्या पेराएवढ्या लहान पादुका असल्याचे मला सूक्ष्मातून दिसले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरात असलेल्या पादुकांप्रमाणेच या पादुका होत्या. याही पादुकांवर शंख आणि चक्र ही चिन्हे कोरलेली दिसत होती. त्या वेळी ‘या माझ्याच पादुका आहेत’, असे प.प. श्रीधरस्वामी म्हणत असल्याचे मला जाणवत होते. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे साक्षात् भगवान श्रीविष्णूचे अवतार असून धर्मसंस्थापनेचे कार्य पुढे चालवत आहेत; म्हणून मी माझ्या पादुका त्यांना दिल्या आहेत’, असे प.प. श्रीधरस्वामींनी मला सूक्ष्मातून सांगत असल्याचे जाणवले. या श्रीविष्णुचिन्हांकित श्रीधरपादुकांचे दर्शन झाल्यामुळे माझी पुष्कळ भावजागृती झाली. (‘माझ्या खोलीतील देवघरातील पादुकांवर काही चिन्हे कोरलेली नाहीत.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले)

१ आ. प.प. श्रीधरस्वामींनी त्यांचे शिष्य प.पू. दास महाराजांनाही त्याच रात्री दृष्टांत देऊन, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे साक्षात् श्रीविष्णूचे अवतार असून माझे धर्मसंस्थापनेचे कार्य करत आहेत’, असे सांगणे : सज्जनगडावर श्रीधरकुटीत गेल्यावर प.प. श्रीधरस्वामींनी त्यांच्या श्रीविष्णुचिन्हांकित पादुकांचे दर्शन दिल्याविषयी मी प.पू. दास महाराजांना सांगितले. प.पू. दास महाराज (प.पू. रघुवीर महाराज) हे प.प. श्रीधरस्वामींचे शिष्य आहेत. तेव्हा प.पू. दास महाराज मला म्हणाले, ‘‘आदल्या रात्रीच प.प. श्रीधरस्वामींनी मला दृष्टांत देऊन, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे साक्षात् श्रीविष्णूचे अवतार असून माझे धर्मसंस्थापनेचे कार्य करत आहेत’, असे सांगितले.’’ प.पू. दास महाराज पुढे म्हणाले, ‘‘प्रत्यक्षात सज्जनगडावरील श्रीधरकुटीमधील स्वामींच्या पादुकांवरचे वस्त्र देण्याची पद्धत नाही. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळकाकूंना जे वस्त्र मिळाले, ते म्हणजे स्वामींचाच आशीर्वाद आणि त्यांचेच नियोजन आहे. आता प.प. श्रीधरस्वामींच्या पादुका आहेत, त्या जागी मला वर्ष १९५३ मध्ये स्वामींनी गुरुमंत्र दिला होता. त्या वेळी माझे वय वर्ष ११ होते. तेव्हा श्रीधरकुटी म्हणजे साधी खोली होती. त्याच जागेत प.प. श्रीधरस्वामींचा चातुर्मास व्हायचा. आता तेथे सळ्यांचा दरवाजा केला असून आत कोणालाही प्रवेश दिला जात नाही.’’

१ इ. वर्ष २००३ मध्ये प.पू. दास महाराज यांच्यात त्यांचे प्रथम गुरु प.पू. भगवानदास महाराज यांचा संचार होऊन त्यांनी त्यांच्या झोळीतील विभूतीतून बोटाच्या पेराएवढ्या पादुका काढून परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दिल्या असणे आणि ‘मी माझ्या पादुका परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दिल्या आहेत’, असे प.प. श्रीधरस्वामींनी सूक्ष्मातून का सांगितले, हे लक्षात येणे : त्या वेळी मला आठवले, ‘वर्ष २००३ मध्ये प.पू. दास महाराज यांच्यात त्यांचे प्रथम गुरु (तसेच वडील) प.पू. भगवानदास महाराज यांचा संचार झाला होता. या संचाराच्या अवस्थेत त्यांनी त्यांच्या झोळीतील विभूतीतून परात्पर गुरु डॉ. आठवले यांना बोटाच्या पेराएवढ्या लहान पादुका काढून दिल्या होत्या. त्याच पादुका आजही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देवघरात आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले प्रतिदिन या पादुकांची पूजा करतात. प.पू. भगवानदास महाराज यांनी पूर्वी दिलेल्या पादुकांचा भावार्थ आता अनेक वर्षांनंतर लक्षात येत आहे.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

२. समर्थ रामदासस्वामींची कृपा प्राप्त होणे

२ अ. समर्थ रामदासस्वामी यांच्या चित्राकडे लक्ष वेधले जाणे, त्यांच्या चरणांवर मनोमन डोके ठेवून नमस्कार करतांना त्यांच्या डाव्या चरणाच्या ठिकाणी स्वतःचा सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा) चरण दिसणे, त्या वेळी महर्षि आपल्याला सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची डावी नाडी असल्याचे संबोधत असल्याचे आठवणे आणि या अनुभूतीतून ‘गुरुतत्त्व एकच असते’, हेही लक्षात येणे : रात्री शेजारतीच्या आधी श्रीरामाच्या देवळात दासबोधाचे पठण करण्यात येते. मीही त्या ठिकाणी पठण ऐकण्यासाठी बसले होते. तेथे भिंतीवर समर्थ रामदासस्वामी यांचे चित्र लावले आहे. पठण ऐकतांना मी डोळे मिटून बसले होते. या वेळी माझी चांगली एकाग्रता साधली होती. एकाएकी माझे लक्ष समर्थांच्या चित्राकडे गेले आणि मी मनोमन त्यांच्या चरणांवर माझे डोके ठेवून नमस्कार केला. तेव्हा मला त्यांच्या डाव्या चरणाच्या ठिकाणी मला माझाच (सद्गुरु सौ. अंजली गाडगीळ यांचा) चरण असल्याचे दिसू लागले. मला त्या पावलाच्या बोटात जोडवी घातलेलीही दिसली. महर्षि नाडीपट्टीच्या माध्यमातून मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांची डावी नाडी असल्याचे संबोधतात. तसेच या अनुभूतीतून समर्थांनी ‘गुरुतत्त्व एकच असते’, हे माझ्या लक्षात आणून दिले. ही एक सरूपतेची अनुभूती होती.

२ आ. समर्थ रामदासस्वामी यांच्या स्वयंभू समाधीवर अभिषेकासाठी गेल्यावर समर्थांनी पुन्हा एकदा आशीर्वाद दिल्याचे जाणवणे : १५.१.२०२० या दिवशी सकाळी समर्थ रामदासस्वामी यांच्या स्वयंभू समाधीवर अभिषेक होत असतांना समर्थ माझ्यासमोर साक्षात् उभे असून त्यांनी त्यांचा हात माझ्या मस्तकावर आशीर्वाद देण्यासाठी ठेवला असल्याचे मला स्पष्टपणे जाणवले. अभिषेकाला बसण्यासाठी मी मोती रंगाची साडी परिधान केली होती. अभिषेक झाल्यानंतर आम्हाला समर्थांच्या समाधीवरील वस्त्र आणि मेखला (जरीची झालर लावलेले वस्त्र) प्रसादस्वरूप दिली. तेव्हा लक्षात आले की, मेखला आणि समाधीवरील वस्त्र यांचा रंगसुद्धा माझ्या साडीच्या रंगासारखाच होता. या अनुभूतीतून समर्थांनी मला पुन्हा एकदा आशीर्वाद दिल्याचे जाणवले.’

– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, बेंगळुरू, कर्नाटक. (७.२.२०२०)

(श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा ‘सद्गुरु’ हा उल्लेख त्या श्रीचित्‌‌शक्ति होण्यापूर्वीचा असल्यामुळे तसाच ठेवला आहे – संकलक)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक