दळणवळण बंदीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय
- शेतकर्यांच्या खात्यात २ सहस्र रुपये जमा करणार
- आरोग्य कर्मचार्यांना ५० लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण
- गरिबांना जूनपर्यंत प्रतिमास ५ किलो तांदूळ विनामूल्य देणार
नवी देहली – कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात दळणवळण बंदी करण्यात आली आहे. या बंदीचा गरीबांना फटका बसू नये, यासाठी केंद्र सरकारकडून ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने’च्या अंतर्गत १ लाख ७० सहस्र कोटी रुपयांच्या ‘पॅकेज’ देण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी केली. दळणवळण बंदीच्या काळात सरकार कुणालाही उपाशी झोपू झोपावे लागू नये, यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणा
१. ‘पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजने’च्या अंतर्गत ८० कोटी गरीब लोकांना जून मासापर्यंत प्रतिमास ५ किलो गहू किंवा तांदूळ आणि १ किलो डाळ विनामूल्य देण्यात येईल. गरिबांना देण्यात येणारे हे गहू आणि तांदूळ नियमित रेशनच्या व्यतिरिक्त असेल.
२. कोरोनाच्या विरोधात ‘आशा’ सेविका, परिचारिका आणि आरोग्य विभागात काम करणरे सर्व कर्मचारी यांना ५० लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण देण्यात येणार आहे. याचा लाभ देशभरातील २० लाख आरोग्य कर्मचार्यांना मिळणार आहे.
३. ‘किसान सन्मान योजने’च्या अंतर्गत एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शेतकर्यांच्या खात्यात २ सहस्र रुपये जमा केले जातील. याचा लाभ ८ कोटी ७० लाख शेतकर्यांना होणार आहे.
४. ‘मनरेगा’ योजनेच्या कर्मचार्यांना अतिरिक्त २ सहस्र रुपये देण्यात येणार असून त्याचा लाभ ५ कोटी कुटुंबांना होईल. ज्येष्ठ नागरिक, विधवा, तसेच दिव्यांग (विकलांग) यांना ३ मास अतिरिक्त १ सहस्र रुपये ‘थेट लाभ हस्तांतरण’चा (‘डीबीटी’चा) लाभ मिळेल.
५. १५ सहस्र रुपयांपेक्षा अल्प वेतन असलेल्या कर्मचार्यांच्या ‘भविष्य निर्वाह निधी’ खात्यात सरकार ३ मासांसाठी २४ टक्के रक्कम घालणार आहे.
आता औषधे घरपोच मिळणार
दळणवळण बंदीमुळे नागरिकांना दैनंदिन अत्यावश्यक सेवा-सुविधा मिळण्यात अडचण येऊ नये, यासाठी केंद्र सरकारने औषध आस्थापनांना नागरिकांना घरपोच औषधे पुरवण्यासाठी अनुमती दिली आहे. याविषयीची अधिसूचना लवकरच राजपत्रात प्रसिद्ध केली जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.