कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत २२ सहस्र ६५ जणांचा मृत्यू

  • २०० हून अधिक देश प्रभावित

  • २४ घंट्यांत २ सहस्र ५५० जणांनी प्राण गमावले

  • १ लाख १७ सहस्र ६०७ बरे झाले

नवी देहली – कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत २२ सहस्र ६५ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ घंट्यांमध्ये अनुमाने २ सहस्र ५५० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४ लाख ८८ सहस्र २६२ झाली असून उपचार करून बरे झालेल्यांची संख्या १ लाख १७ सहस्र ६०७ इतकी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव २०० हून अधिक देशांत झाल्यानंतर अनेक देशांनी दळणवळण बंदी केली आहे.

१. इटलीतील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ७४ सहस्र ३८६ इतकी झाली आहे. तेथील मृतांची एकूण संख्या ७ सहस्र ५०३ झाली आहे. आजमितीस ही संख्या जगभरात सर्वाधिक आहे.

२. स्पेनमध्ये ५६ सहस्र १८८ जणांना या विषाणूची लागण झाली असून तेथे आतापर्यंत ४ सहस्र ८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. स्पेनच्या उपपंतप्रधान कारमेल कॅल्वो यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कॅल्वो यांची चाचणी केल्यावर त्याचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला असून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

३. अमेरिकेत ६८ सहस्र ५९४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांपैकी १ सहस्र ३६ जणांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. अमेरिकेत कोरोनाचे एका दिवसात २७८ हून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत.

४. इराणमध्ये बाधित रुग्णांची संख्या २९ सहस्र ४०६, तर मृतांची संख्या २ सहस्र २३४ इतकी आहे.

५. फ्रान्समध्ये मृतांची संख्या १ सहस्र ३३१, ब्रिटनमध्ये मृतांची संख्या ४६५, दक्षिण कोरियामध्ये १३१ जणांचा मृत्यू झाला आहे.