२५ ते ३१ मार्चपर्यंत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्याचा व्यापार्‍यांचा निर्णय

नवी मुंबई, २४ मार्च (वार्ता.) – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जीवनावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला असला, तरी २५ ते ३१ मार्चपर्यंत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय व्यापार्‍यांनी घेतला आहे; मात्र बाजार समिती बंद ठेवण्याविषयी कोणताही अधिकृत निर्णय झालेला नसून भाजीपाला, अन्न-धान्य या जीवनावश्यक वस्तू असून त्यांचा पुरवठा चालू ठेवण्यासाठी उपाययोजना करत असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव अनिल चव्हाण यांनी दिली.

१. वाशीतील मुंबई कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या वतीने मुंबई आणि उपनगर यांमध्ये कांदा-बटाटा, फळे, भाजीपाला, मसाले आणि अन्न-धान्य यांचा पुरवठा होतो. प्रत्येक बाजारात प्रतिदिन सरासरी १० सहस्र लोकांची ये-जा असते. या लोकांमधून कोरोनाची लागण बाजार घटकांना झाली, तर त्याचे उत्तरदायित्व कोण घेणार ?, असा प्रश्‍न व्यापार्‍यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे ३१ मार्चपर्यंत सर्व बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय पाचही बाजारातील संचालक आणि व्यापारी यांनी मिळून घेतला आहे.

२. पूर्वसूचना किंवा मुदत न देता या सर्व बाजारपेठा बंद केल्या, तर मुंबईतील कोट्यवधी जनतेचे हाल होण्याची शक्यता आहे. शासनाने आरंभीपासून जीवनावश्यक वस्तू पुरवठा चालू रहाणार असल्याचे आश्‍वासन दिल्याने नागरिकांनी स्थानिक दुकानांतून किराणा भरून ठेवला नाही. त्यातच मासअखेर असल्याने या मासाचा किराणा संपत आला आहे. अशा स्थितीत व्यापार्‍यांनी अचानक असा निर्णय घेतल्याने शहरातील परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता आहे.

३. शेतकर्‍यांचा माल व्यवस्थितपणे बाजारात आणून तो विकण्याची व्यवस्था बाजार समिती करणार असल्याचे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अनिल चव्हाण यांनी दिली.