ईश्वरी नियोजनाचे अनुपमेय दर्शन देणारी पंढरीची वारी

१. ईश्वरी नियोजनाची प्रचीती

पंढरीच्या वारीचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचे नियोजन ! कोणतेही विज्ञापन, निमंत्रण आणि मानधन यांविना देश-विदेशातून लाखो हिंदू अन् भक्त एकाच वेळी, एकाच लयीत आणि एकाच देवतेच्या कृपेसाठी एकत्र येतात. संतांच्या संकल्पाने आणि कृपेने चालणारा हा सोहळा मानवी बुद्धीच्या पलीकडचे ईश्वरी नियोजन स्पष्ट करतो.

२. अभेद्य शिस्त, अपार श्रम आणि परम भक्ती यांचा त्रिवेणी संगम

शेकडो किलोमीटरची पायी वारी करतांना ऊन, पाऊस, वादळ किंवा शारीरिक व्याधी यांची तमा न बाळगता वारकरी अखंड चालत रहातात. चोपदारांच्या एका चेतावणीवर लाखो वारकर्‍यांचे पाऊल थांबते आणि चालतेही ! ही शिस्त जगातील कोणत्याही व्यवस्थापन संस्थेला अचंबित करणारी आहे. वारीमध्ये कुणाची हरवलेली मौल्यवान वस्तूही प्रामाणिकपणे मूळ मालकापर्यंत पोचवली जाते, हा वारकरी संस्कारांचा परमोच्च बिंदू आहे.

३. परंपरा, आत्मसन्मान आणि विज्ञानाला पडलेले कोडे

अकलूज किंवा वाखरी येथील अश्व आणि मेंढ्या यांचे रिंगण हा केवळ एक सोहळा नसून पूर्वजांचा गौरवशाली वारसा आत्मसन्मानाने पुढे नेण्याचा मार्ग आहे. आधुनिक विज्ञानानेही वारीपूर्वी आणि वारीनंतर वारकर्‍यांच्या आरोग्याची पडताळणी केली. त्यामध्ये असे लक्षात आले की, विठ्ठलाच्या अखंड नामजपामुळे वारकर्‍यांची कार्यक्षमता आणि प्रतिकारशक्ती यांच्यात पुष्कळ वाढ झाल्याचे लक्षात आले.

– श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती. (२०.७.२०२६)

श्री. सुनील घनवट

वारीवर होणारे छुपे आणि वैचारिक आघात

साम्यवादी विचारसरणीचा आणि ‘अर्बन (शहरी) नक्षलवाद्यां’चा छुपा शिरकाव : सद्यःस्थितीत वारीमध्ये साम्यवादी विचारसरणीच्या आणि हिंदु धर्मविरोधी मंडळींनी वेगळ्या पद्धतीने प्रवेश मिळवला आहे. ‘समता दिंडी’ किंवा तत्सम नावांचा आडोसा घेऊन अनेक हिंदु धर्मविरोधी वक्त्यांना वारीच्या व्यासपिठांवर आमंत्रित केले जाते. तेथे वारकर्‍यांच्या मनात हिंदु धर्माविषयी संभ्रम निर्माण करणारी वक्तव्ये केली जातात. अशा समाजविघातक घटकांना वारीपासून दूर ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

– श्री. सुनील घनवट

शेकडो वर्षांची वारीची पवित्र हिंदु परंपरा आज काही समाजकंटक आणि विघातक शक्तींच्या निशाण्यावर आहे. वारीच्या पवित्र वातावरणात आधुनिक काळात पुढील गंभीर आव्हाने निर्माण झाली आहेत.

१. धार्मिक कट्टरता आणि भ्रामक प्रचार ! : वारीच्या पवित्र कालखंडात बहुसंख्य हिंदु वारकर्‍यांच्या मार्गावर जाणीवपूर्वक ‘अल्ला देवे, अल्ला दिलावे’, अशा प्रकारच्या अभंगांची मोडतोड करून किंवा मागच्या वर्षीप्रमाणे ‘अल्ला की सिवा कोई मामूद नही हैं ।’ (अल्लाविना उपासनेस योग्य दुसरे कोणतेही दैवत नाही.) यांसारखे फलक लावून वारकर्‍यांची दिशाभूल केली जाते. हिंदु संत परंपरा आणि वारी यांना अन्य रंगात रंगवण्याचा हा जाणीवपूर्वक केलेला कट आहे. लाखो वैष्णवांच्या वारी मार्गावरच असे प्रकार का घडतात ? याचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करून अशा घटकांवर कडक कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे.

२. वारी मार्गावरील संघटित धर्मांतराचे जाळे : हिंदूंच्या अथांग जनसमुदायाचा अपलाभ घेण्यासाठी धर्मांतर करणार्‍या टोळ्या वारी मार्गावर सक्रीय झाल्या आहेत. दिंडीच्या ठिकाणी येऊन वारकर्‍यांना ख्रिस्ती धर्माचे महत्त्व सांगणे, त्यांच्यात अंधश्रद्धा पसरवणे आणि त्यांना धर्मांतरासाठी प्रवृत्त करणे, असे अयोग्य प्रकार वाढले आहेत. अशा वेळी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे ‘मऊ मेणाहुनी आम्ही विष्णूचे दास । कठीण वज्रास भेदूं तैसे ।।’, हे वचन लक्षात ठेवून धर्मावर आघात करणार्‍यांना त्याच भाषेत उत्तर देणे आवश्यक आहे.

३. रुग्णालयांसारख्या शासकीय यंत्रणांचा गैरवापर : यंदाच्या वारीमध्ये अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला. पुण्यातील ‘ससून’ या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी भरती झालेल्या निष्पाप वारकर्‍यांना हेरून तिथे धर्मांतराची पत्रके वाटण्यात आली आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे आमीष दाखवण्यात आले. जरी या प्रकरणी तात्काळ कारवाई झाली असली, तरी शासकीय रुग्णालयात अशा समाजकंटकांना प्रवेश देणारा आणि या संपूर्ण प्रकरणाच्या मागे असणारा ‘मास्टरमाईंड’ (मुख्य सूत्रधार) कोण आहे ? याचा शोध घेऊन प्रशासनाने मुळासकट कारवाई केली पाहिजे.

धर्मरक्षणाचा गौरवशाली इतिहास आणि भविष्याची दिशा

वारकरी संप्रदाय हा केवळ शांतीप्रिय नाही, तर आवश्यकतेच्या वेळी धर्मासाठी ठामपणे उभा रहाणारा जागृत संप्रदाय आहे.

१. कायद्यातील हिंदुद्वेषी कलमांना विरोध : तत्कालीन काँग्रेस सरकारने अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली हिंदूंच्या धार्मिक श्रद्धांवर प्रतिबंध आणणारा कायदा आणण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सोलापूर जिल्ह्यातील वाखरी येथे पालखी थांबवून वारकर्‍यांनी लक्षावधी स्वाक्षर्‍यांचे निवेदन सरकारला दिले. परिणामी सरकारला नमून हिंदुद्वेषी १४ कलमे रहित करावी लागली होती.

२. विठ्ठलमूर्तीच्या अस्तित्वाचा लढा : पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर पुरातत्त्व विभागाकडून वारंवार केल्या जाणार्‍या हानीकारक रासायनिक वज्रलेपनाच्या विरोधात वारकरी संघटना आणि मंदिर महासंघ यांनी दिवाणी न्यायालयात धाव घेऊन तात्काळ स्थगिती आदेश मिळवला होता.

३. संतपरंपरेचा अवमान करणार्‍यांना चोख उत्तर : वारकर्‍यांना ‘घुसखोर’ संबोधून हिंदु समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करणारे राजकीय नेते आणि प्रवक्ते यांच्या विरोधात वारकर्‍यांनी आवाज उठवून प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडले.

४. वारकरी महाअधिवेशन – हिंदु राष्ट्र निर्मितीचा महामार्ग : वारी म्हणजे जगातील सर्वांत मोठे संघटित हिंदूसंघटन आहे. संत आणि साधू यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित होणार्‍या ‘वारकरी महाअधिवेशना’च्या माध्यमातून हिंदु समाज अन् वारकरी यांना योग्य दिशा मिळत आहे.

काळाची पावले आणि उपाययोजना

आज कीर्तन आणि सांप्रदायिक विचार यांपुरते मर्यादित न रहाता प्रत्येक दिंडी अन् कीर्तने यांतून हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व, धर्मावर होणारे वैचारिक आणि व्यावहारिक आघात, धर्मांतराचे संकट अन् या सर्वांवर मात करण्यासाठी आवश्यक असणार्‍या ‘हिंदु राष्ट्रा’ची संकल्पना मांडली गेली पाहिजे.

संतांच्या कृपेने शेकडो वर्षे चाललेली वारी, म्हणजे राष्ट्रहित, आत्मकल्याण आणि धर्मरक्षण यांचा पवित्र त्रिवेणी संगम आहे. शासकीय धोरणे धर्मविरोधी झाल्यावर वारीची संघटित शक्ती सरकारलाही नमण्यास भाग पाडते. भविष्यात हीच वारी संपूर्ण विश्वात सनातन धर्माचा ध्वज उंच फडकवणारी आणि आदर्श राष्ट्ररचना करणारी मुख्य आधारशिला ठरेल, यात शंका नाही.

– श्री. सुनील घनवट