वाशी येथे ‘जनसंवाद-विकास’ उपक्रमात नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर

दशरथ भगत

वाशी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या वतीने वाशी येथील कर्नाटक भवन येथे विविध सामाजिक आणि जनहिताच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नवी मुंबईचे उपमहापौर दशरथ भगत आणि नगरसेवक निशांत भगत यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले, तसेच नागरिकांशी संवाद साधत प्रभागातील विकासकामे, उपलब्ध नागरी सुविधा आणि आगामी नियोजन यांची सविस्तर माहिती देण्यात आली.

कार्यक्रमात बोलताना दशरथ भगत म्हणाले की, नागरिकांच्या नागरी समस्या सोडविण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्नशील आहोत. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून प्रत्येक प्रश्न मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न राहील. निशांत भगत यांनी सांगितले की, लोकप्रतिनिधी आणि शासकीय यंत्रणेचा प्रभावी वापर करून नागरिकांनी आपल्या समस्या मांडाव्यात. संवादातून आणि समन्वयातून प्रत्येक प्रश्नावर योग्य तो मार्ग काढणे शक्य होते. म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ औपचारिक कार्यक्रम न घेता नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याचा निर्णय आम्ही घेतला, असे निशांत भगत यांनी सांगितले.

या वेळी प्रभागातील विकास आराखड्याबाबतही माहिती देण्यात आली. मैदाने जतन करणे, अधिकाधिक जॉगिंग ट्रॅक विकसित करणे, नियोजनबद्ध पद्धतीने दर्जेदार रस्त्यांची उभारणी करणे, वीजपुरवठ्यासंदर्भातील नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्याने सोडविणे, तसेच परिसरातील मूलभूत सुविधांमध्ये सातत्याने सुधारणा करण्यासाठी करण्यात येणार्‍या प्रयत्नांची माहिती नागरिकांना देण्यात आली.

याशिवाय महानगरपालिका, राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा जुईनगर व परिसरातील नागरिकांना जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी विशेष प्रयत्न सुरू असल्याचेही या वेळी सांगण्यात आले.

नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्थानिक पोलीस प्रशासनाशी सातत्याने समन्वय ठेवून आवश्यक उपाययोजना केल्या जात असून, कायदा व सुव्यवस्था तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याचेही भगत यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाला उपस्थित नागरिकांनी विविध नागरी प्रश्न, सूचना आणि अपेक्षा लोकप्रतिनिधींसमोर मांडल्या. या सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा करून त्यांचे टप्प्याटप्प्याने निराकरण करण्याची ग्वाही या वेळी देण्यात आली.