विठ्ठल : इतिहास, मूर्तीशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र

श्रीविठ्ठल

१. ६ व्या शतकापासून विठ्ठलाचे अस्तित्व

‘श्रीविठ्ठल महाराज ६ व्या शतकापासून पंढरीत आहेत. मूर्तीची ठेवण आणि अलंकार यांतून त्या काळाची कल्पना येते, उदा. मूर्तीच्या कानातील ‘मकरकुंडले’ ही त्या काळातील शिल्पांत आढळतात. दोन्ही हात कटीस्थानी असल्याच्या विष्णुमूर्ती पाचव्या शतकातील विदिशाजवळील (मध्यप्रदेशातील) उदयगिरी लेणीत आहेत. ही मूर्ती विष्णूची असून तिच्या हातात शंख आहे. कुशाणकाळात (भारताच्या इतिहासातील कुशाण राजवंशाच्या राज्याचा कालखंड), म्हणजे इसवी सनाच्या पहिल्या ते तिसर्‍या शतकात अशा मूर्ती पहायला मिळत.

संत निवृत्तीनाथ आणि संत नामदेव यांनी या मूर्तीचे वर्णन ‘चोविसा मूर्तीहूनी वेगळा हा पंचविसावा’, असे केले आहे. मूर्तीच्या हाती असलेला मुकुट शिवपिंडीच्या आकाराचा आहे. हे लक्षात न घेता ‘ती शिवपिंडच आहे’, अशा गैरसजुमतीतून ‘शिवाकार मुकुट कस्तुरी भाळी’ असे मूर्तीचे वर्णन १८ व्या शतकात केले गेले. तिला ‘हरिहर’ मानले गेले आहे.

डॉ. गो.ब. देगलूरकर

२. उभी ध्यानस्थ योगीराज मूर्ती 

विठ्ठलाची उभी मूर्ती ध्यानस्थ स्वरूपात आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांनी विठ्ठलाचे वर्णन करतांना ‘ऐसा हा योगीराजू तो विठ्ठल मझ उजू’, असे म्हटले आहे. याचा अर्थ ‘विठ्ठल एक महान ‘योगीराज’ आहे; म्हणूनच तो मला प्रिय आहे’, असा आहे.

३. हंपी ते पंढरपूर असा मूर्तीचा प्रवास 

विजयनगर साम्राज्याचे राजा कृष्णदेवराय यांनी पंढरपूरची विठ्ठलमूर्ती हंपी (कर्नाटक) येथे नेली होती. तेथे विठ्ठलाची मंदिरे आहेत. पुढे पैठणच्या संत एकनाथ महाराजांचे आजोबा, म्हणजेच संत भानुदास यांनी ती मूर्ती परत पंढरपूरला आणली.

४. इतर राज्यांतील मंदिरे 

विठ्ठलाची मंदिरे केवळ महाराष्ट्रातच नाही, तर कर्नाटक आणि गोवा या राज्यांमध्येही आहेत.

५. वालुकाश्म मूर्ती 

पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ती ही काळ्या पाषाणाची वाटत असली, तरी ती प्रत्यक्षात वालुकाश्मची आहे. याउलट रुक्मिणीची मूर्ती काळ्या पाषाणात घडवलेली आहे. यामुळेच रुक्मिणीची मूर्ती अत्यंत चमकदार आणि गुळगुळीत दिसते, तर विठ्ठलाची मूर्ती वालुकाश्ममुळे थोडी खडबडीत जाणवते.

६. विष्णूचे अपभ्रष्ट रूप

विष्णूचे अपभ्रष्ट रूप ‘विठ्ठू’ होते. त्याला ऐतिहासिक पुरावा आहे. चेन्नईमध्ये व्यंगीचे राज्य होते. तिथे पुलकेशन हा बदामीच्या चालुक्याचा राजा होता. त्याने त्याचा भाऊ विष्णुवर्धन याला राज्य दिले. त्याला ‘कुब्ज विष्णुवर्धन’ म्हटले जायचे. त्या ‘विष्णुवर्धना’विषयीच्या शिलालेखांमध्ये काही वेळा ‘विट्टू’, ‘विठू’ असे भ्रष्ट रूप आलेले आहे. थोडक्यात विष्णूचे ‘विठ्ठू’ झाले आणि त्याला पुढे ‘ल’ लागला. ‘विष्णु हा विठ्ठलरूपात आलेला आहे’, हे यातून स्पष्ट होते. विष्णूची मूर्ती पंढरपूर येथे स्थापन झाली आणि तिचे ‘पांडुरंग’ अन् ‘विठ्ठल’ असे नामकरण झाले.’

– डॉ. गो.ब. देगलूरकर, ज्येष्ठ मूर्तीअभ्यासक, पुणे.

(साभार : विविध संकेतस्थळे)