ठाणे रेल्वेस्थानकातील उपाहारगृहांत कीड लागलेला भाजीपाला आणि काळवंडलेले तेल यांचा वापर

ठाणे, २४ जुलै (वार्ता.) – ठाणे रेल्वेस्थानकातील अधिकृत उपाहारगृहांमध्ये मुदत संपलेली शीतपेये आणि खाद्यपदार्थ, कीड लागलेला अन् सडका भाजीपाला, तसेच वारंवार वापरून काळवंडलेले तेल अन्नपदार्थ बनवण्यासाठी वापरले जात असल्याचे आढळले. (प्रवाशांच्या आरोग्याशी खेळणार्‍या उपाहारगृह चालकांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला, तरच अशा दायित्वशून्यतेला आळा बसेल. – संपादक)

१. फलाट क्रमांक २ वरील ऑरिजिन उपाहारगृहाविषयी प्रवाशांकडून सातत्याने तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यानंतर मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य संजीव कुलकर्णी आणि शिवसेना ठाणे शहर विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे यांनी उपाहारगृहाची पहाणी केली. त्या वेळी उपाहारगृह आणि स्वयंपाकघर परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळून आली. पंखे बंद असल्याने कोंदट वातावरण, दुर्गंधी आणि अस्वच्छता दिसून आली.

२. या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, उपाहारगृहामध्ये अन्नसुरक्षा नियमांची काटेकोर कार्यवाही करावी, प्रवाशांना स्वच्छ आणि दर्जेदार अन्न उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना त्वरित राबवाव्यात, तसेच केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल तातडीने सादर करावा, अशा सूचना शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे प्रबंधकांकडे निवेदनाद्वारे केल्या आहेत.