राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द

फोंडा, २४ जुलै (वार्ता.) – गोव्यातील कवी, लेखक आदी ३३६ साहित्यिकांनी राष्ट्रपतींना पाठवण्यासाठी सिद्ध केलेले एक निवेदन सुप्रसिद्ध लेखिका डॉ. अनुजा जोशी यांच्या हस्ते ‘मराठी राजभाषा निर्धार समिती गोवा’चे राज्य निमंत्रक प्राचार्य सुभाष भास्कर वेलिंगकर यांच्याकडे २३ जुलै या दिवशी फोंडा येथील एका कार्यक्रमात सोपवण्यात आले. हे निवेदन मराठी राजभाषा निर्धार समितीकडून राष्ट्रपतींना पाठवण्यात येणार असून त्याची प्रत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनाही समिती देणार आहे. साहित्यिकांच्या स्वाक्षर्‍यांचे निवेदन देतांना डॉ. अनुजा जोशी यांच्यासह ज्येष्ठ लेखिका लक्ष्मी जोग, ज्येष्ठ लेखक श्री. गो.रा. ढवळीकर, डॉ. (प्रा.) अनिता तिळवे, सौ. दीपा मिरिंगकर, डॉ. बिभीषण सातपुते, श्री. जयवंत आडपैकर, डॉ. दत्ताराम देसाई, उर्मिला देसाई, डॉ. नूतन देव, माधुरी उसगावकर, मुग्धा बोरकर, असे साहित्यिक उपस्थित होते.

या निवेदनात राष्ट्रपती महोदया द्रौपदी मुर्मू यांनी या विषयात विशेष लक्ष घालून मराठी राजभाषेची हक्काची मागणी मान्य करण्याचे निर्देश गोवा शासनाला द्यावेत, असे विनंतीपर आवाहन करण्यात आले आहे.

राजभाषेच्या प्रश्‍नावरून समाजात निर्माण झालेल्या दुफळीमुळे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडले आहे. कोकणीबरोबर मराठीलाही राजभाषेचा दर्जा दिल्यास ही दुफळी कायमची मिटून समाजामध्ये सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण होईल, असे साहित्यिकांच्या निवेदनात म्हटलेले आहे.

साहित्यिकांप्रमाणेच गोव्यातील संगीतकार, नाट्यकलाकार, भजनी मंडळे, निवेदक, वारकरी मंडळे, कीर्तनकार अशा विविध क्षेत्रांतील मराठीप्रेमींना एकत्र आणून त्यांचीही स्वतंत्र निवेदने राष्ट्रपतींना जावीत, असे प्रयत्न मराठी राजभाषा निर्धार समितीच्या वतीने चालू झालेले असून ऑगस्टमध्ये ही सर्व निवेदने राष्ट्रपतींकडे पोचतील.