विठ्ठल म्हणजे विविध पंथ, परंपरा आणि लोकश्रद्धांचा संगम; म्हणूनच त्याला सर्वसमावेशक भक्तीचे प्रतीक मानले जाते.
आषाढी एकादशी ! ‘विठ्ठल, विठ्ठल’ या संकीर्तनात अवघा महाराष्ट्र दुमदुमून जातो. ‘विठ्ठल’ ही देवता कशी निर्माण झाली ? तिचा विकास कसा झाला ? याची अधिकृत माहिती बहुतेकांना नसते. विविध पंथांचा समन्वय विठ्ठलात दिसतो. त्यामुळे रा.चिं. ढेरे यांनी विठ्ठलाला ‘महासमन्वय’ म्हटले आहे. विठ्ठलाविषयी अनेक संशोधकांनी संशोधन केलेले आहे. या लेखातून विठ्ठलाची व्युत्पत्ती आणि विविध पंथांसमवेत असलेला विठ्ठलाचा समन्वय यांविषयीचे विश्लेषण दिले आहे.
भक्ती, ज्ञान, करुणा आणि विविध धार्मिक परंपरांचा सुंदर संगम, म्हणजे श्री विठ्ठल ! म्हणूनच आजही आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो वारकरी ‘विठ्ठल, विठ्ठल’ या नामस्मरणात तल्लीन होऊन पंढरीची वाट धरतात.
१. ‘विठ्ठल’ नावाची व्युत्पत्ती
‘विठ्ठल’ या नावाची सर्वमान्य व्युत्पत्ती उपलब्ध नाही.
अ. इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांनी ‘विठ्ठल’ हा शब्द ‘विष्ठल’, म्हणजे ‘दूर रानावनात असलेली जागा’ या शब्दापासून निर्माण झाला आहे’, असे म्हटले आहे. या व्युत्पत्तीनुसार विठ्ठलदेव हा दूर रानावनात असणारा देव ठरतो.
आ. डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्या मते ‘विष्णु’ या शब्दाचे कानडी अपभ्रंश रूप ‘विट्टी’ असे होते. त्यावरून ‘विठ्ठल’ हे रूप सिद्ध झाले.
इ. ‘शब्दमणिदर्पणा’च्या अपभ्रंश प्रकरणातील सूत्राचा आधार घेऊन राजपुरोहित यांनी विष्णूचे ‘विट्टू’ हे रूप कसे होते, हे दाखवले. त्यांच्या दृष्टीने या रूपालाच प्रेमाने ‘ल’ हा प्रत्यय लावला की, ‘विठ्ठल’ असे रूप सिद्ध होते.
२. ‘विठ्ठल’ नावाचा तात्त्विक अर्थ
अ. संस्कृतच्या दृष्टीने पाहिल्यास ‘विदा (ज्ञानेन), ठीन् (अज्ञजनान्), लाति (गृह्णाति) म्हणजे ‘अज्ञ जनांना ज्ञानाने स्वीकारणारा, तो विठ्ठल !’, अशी विठ्ठलनामाची निरुक्तीही पोथीत आहे.
आ. ‘विदि (ज्ञाने) स्थलः (स्थिरः)’, म्हणजे ‘जो ज्ञानाच्या ठिकाणी स्थिर आहे, तो विठ्ठल’, अशी आणखी एक व्युत्पत्ती वि.कृ. श्रोत्रिय यांनी दिली आहे.
३. ग्रामीण परंपरेतील विठ्ठलाची नामरूपे
‘इटु’, ‘इठु’, ‘इटुबा’, ‘इठुबा’ ही ग्रामीण मराठीतील विठ्ठलाची नामोच्चारणे आहेत. विठ्ठलाचे रूप कमरेवर हात ठेवलेले आहे. विठ्ठलाचे अभ्यासक श्री. विश्वनाथ खैरे यांनी ‘इटु’ हा शब्द तमिळ भाषेतील असून त्याचा अर्थ ‘कमरेवर हात ठेवलेला’ असे म्हटले आहे. ‘विटेवर जो उभा, तो विठ्ठल’, अशीही व्युत्पत्ती सांगितली जाते.
४. ‘वैष्णव’ दैवत म्हणून विठ्ठलाला स्थान
अ. विठ्ठल हे वैष्णव दैवत मानले जाते. विठ्ठल हे उपास्यदैवत असलेला वारकरी संप्रदाय भागवत धर्मातच अंतर्भूत होतो. विठ्ठलाभोवती वैदिकतेचे वलयही आहे.
आ. वारकरी संप्रदायाचे थोर प्रचारक कीर्तनकार शं.वा. उपाख्य सोनोपंत दांडेकर म्हणतात, ‘‘हा पंथ वैदिक आहे. ‘किंबहुना सनातन वैदिक धर्माची भक्तीस प्राधान्य देणारी ही एक शाखा आहे’, असे म्हटले तरी चालेल. पंथाचे तत्त्वज्ञान वैदिक आहे. पंथाला ‘भागवत धर्म’ असेही म्हणतात; कारण याचे उपास्यदैवत श्रीकृष्णाचे बालस्वरूप मानले जाते.’’
५. पुराणांत विठ्ठलाचा उल्लेख नाही
विठोबाचा निर्देश श्रुित, स्मृति आणि पुराणे यांत नाही. विष्णु सहस्रनामांतही विठ्ठलाचे नाव नाही. विष्णूचे २४ अवतार किंवा पुराणांनी सांगितलेले अवतार यांमध्येही विठ्ठलाचा उल्लेख नाही.
६. लोकदेवता ते वैष्णव दैवत
११ व्या – १२ व्या शतकापासून विठ्ठलाला मोठी वैष्णव प्रतिष्ठा प्राप्त झालेली दिसते. ‘ही प्रतिष्ठा, म्हणजे एका विकसनप्रक्रियेचा परिपाक असून विठ्ठलाचे मूळ रूप कोणत्या तरी लोकदेवतेचे असले पाहिजे’, असे अभ्यासकांना वाटते.
७. विठ्ठल आणि संस्कृत
बहुतांशी लोकदेवतांना शास्त्रीय साहित्यात स्थान मिळालेले नाही; परंतु पंढरपूरची स्थळपुराणे म्हणून प्रसिद्ध असलेल्या ३ संस्कृत ‘पांडुरंगमाहात्म्य’ ग्रंथांची रचना ही विठ्ठलाच्या प्रक्रियेचाच भाग आहे’, असे रा.चिं. ढेरे म्हणतात.
८. वेद आणि विठ्ठल
विठ्ठल ही वैदिक देवता असल्याचे दर्शवण्यासाठी ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलातील ‘द्वे विरूपे चरतः’ या सूक्ताचा अर्थ विठ्ठलाशी संबंधित आहे’, असे धर्मपंडित काशिनाथ उपाध्याय उपाख्य बाबा पाध्ये यांनी ‘विठ्ठलऋङ्मंत्रसारभाष्यम्’ या त्यांच्या ग्रंथात म्हटले आहे.
९. विविध वाङ्मये आणि विठ्ठल
अ. विठ्ठलशास्त्री धारूरकर यांनी ‘पंढरीतत्त्वविवेक’ या ग्रंथात ऋग्वेदाच्या ९५ व्या सूक्तातील ५ ऋचांचा विठ्ठलपर अर्थ दिला आहे.
आ. श्रीगोपाळाचार्य यांनी ‘श्रीमद्विठ्ठलभूषण’ पोथी लिहिली. त्यात संस्कृत ग्रंथांतील विठ्ठलविषयक संदर्भ संग्रहित केले. ऋग्वेदातील ‘द्वे विरूपे’ हे सूक्त या पोथीतही विठ्ठलाशी संबंधित असल्याचे दाखवण्यात आले आहे.
१०. विठ्ठल आणि शैव परंपरा
अ. ‘विठ्ठलाचे वैष्णवीकरण होण्यापूर्वी पंढरपूरचा विठ्ठल काही काळ शिवरूप झाला होता’, असे संशोधक डॉ. माणिकराव धनपलवार यांनी मांडले. पंढरपूर हे मूळ ‘पुंडलिकपूर’ असून तिरूवारूर आणि चिदंबरम् या दक्षिणेतील प्रसिद्ध शिवक्षेत्रांची पर्यायी नावेही ‘पंडरीकपूर’ अशी होती, हे त्यांनी पुराव्यांसह निदर्शनास आणले होते.
आ. ‘पंढरपूर हे पुंडरीकेश्वरमुळे पुंडरीकपूर झाले. पंढरीचा तोच मूळ अधिष्ठाता देव होता. वैष्णवीकरणाच्या प्रक्रियेत तो विठ्ठल परिवारात समाविष्ट झाला; मात्र पंढरपूरचा विठ्ठल शिवरूप झाला नव्हता’, असे डॉ. ढेरे यांचे मत आहे. उन्नयन प्रक्रियेत (उन्नयन प्रक्रिया म्हणजे लोकदेवतेचे व्यापक धार्मिक दैवतामध्ये रूपांतर होणे) प्रथम शैव आणि नंतर वैष्णव रूप धारण करणे आवश्यक असते, असे नाही.
११. विठ्ठलाशी साम्य
अ. विठ्ठल आणि तिरूमलईचा व्यंकटेश : पंढरपूरचा विठोबा आणि तिरूमलई (आंध्र प्रदेश) येथील व्यंकटेश या दोन देवतांमधील साम्य लक्षणीय आहे. विठ्ठलाप्रमाणेच व्यंकटेश म्हणजे हाती शस्त्र नसलेली आणि मौनी (शांत) देवता आहे. त्याचा डावा हात कमरेवर असून उजवा हात भक्तांना वरदान देणारा आहे.
आ. विठ्ठल आणि व्यंकटेश यांच्या आख्यायिका : रुसलेल्या रुक्मिणीची समजूत काढण्यासाठी विठ्ठल पंढरपूरला आला, अशी कथा आहे. त्याचप्रमाणे रुसलेल्या लक्ष्मीच्या शोधार्थ व्यंकटेश तिरूमलई येथे आला. तेथे त्याने पद्मतीर्थ निर्माण केले आणि त्यातून ‘पद्मावती’ प्रकट झाली, अशी आख्यायिका आहे.
विठ्ठल आणि व्यंकटेश यांना कांबळे (घोंगडी) प्रिय आहे. दोन्ही देवांच्या समारंभांत चिंचेच्या वृक्षाला विशेष महत्त्व आहे. व्यंकटेश व्यंकटाचलावर चिंचेच्या झाडाखालच्या वारुळातून प्रकट झाला, अशी कथा सांगितली जाते, तर पंढरपूरचे डिंडीरवनही चिंचेच्या झाडांचे वन होते.
इ. विठ्ठल-वीरप्पा आणि व्यंकटेश : ‘व्यंकटेश आणि विठोबा यांच्यातील साम्य लक्षात घेता हे दोन्ही देव एकाच लोकदैवताच्या, म्हणजे विठ्ठल-वीरप्पा या जोडदेवाच्या दोन वेगवेगळ्या; पण परस्परांशी साम्य राखणार्या उन्नत रूपांपैकी असावेत’, असे डॉ. रा. चिं. ढेरे यांना वाटते.
विठ्ठल-वीरप्पा या जोडदेवाचाही चिंचेच्या वृक्षाशी संबंध आहे. धनगर समाजाच्या श्रद्धेनुसार हा जोडदेव प्रथम पट्टणकोडोली येथे आला, तेव्हा तो चिंचेच्या झाडाखाली येऊन थांबला.
१२. धनगर परंपरेतील विठ्ठल
धनगर समाजातील एका कथेनुसार विठ्ठलाची पत्नी त्याच्यावर रुसून वनात गेली आणि चिंचेच्या बुंध्याजवळ तिचे निधन झाले.
व्यंकटेशाची उपासना श्रीनिवास किंवा विष्णु म्हणून केली जाते; मात्र अनुमाने ७५० वर्षांपूर्वी व्यंकटेशाची पूजा वीरभद्र म्हणून केली जात होती, असा वीरशैव पंथियांचा दावा आहे. ‘वीरप्पाचेच वीरभद्रात रूपांतर झाले’, असा संशोधक ग्युथर सोनथायमर यांचा निष्कर्ष आहे.
१३. वीरशैव पंथाचा प्रभाव
‘आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र या भागांत वीरशैव पंथामध्ये वीरभद्राची उपासना केली जाते. वीरशैव पंथाचा प्रभाव वाढल्यानंतर दक्षिण भारतातील गोपजन वीरशैव बनले. त्यांचे आराध्य दैवत असलेल्या वीरप्पाला नव्या श्रद्धाविश्वात प्रतिष्ठा मिळावी, यासाठी त्याचे ‘वीरभद्रीकरण’ करण्यात आले’, असे डॉ. रा. चिं. ढेरे यांचे म्हणणे आहे.
१४. विठ्ठल : विविध परंपरांचा समन्वय
भक्तांची करुणामय विठुमाऊली असलेल्या विठ्ठलामध्ये विविध परंपरांचा समन्वय आढळतो. श्री विठ्ठल हे एका पंथाचे किंवा एका संप्रदायाचे दैवत नसून विविध श्रद्धांचा संगम असलेले व्यापक स्वरूपाचे दैवत आहे. विठ्ठलाची व्यापकता पहाता रा.चिं. ढेरे यांनी म्हणूनच विठ्ठलाला ‘महासमन्वय’ म्हटले आहे, ते आध्यात्मिक आणि तात्त्विक दृष्ट्या यथार्थ वाटते.
– वसुमती करंदीकर (साभार : दैनिक ‘मुंबई तरुण भारत’)


२५ जुलै : देवशयनी एकादशी
पंढरीचा महिमा !
पालखीमार्गातील काही गावांचा आध्यात्मिक अर्थ !
विठ्ठल : इतिहास, मूर्तीशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र
‘भेटीलागे जीवा, लागलीसे आस ।’
ईश्वरी नियोजनाचे अनुपमेय दर्शन देणारी पंढरीची वारी