मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण

पत्नीसह ३ जणांना अटक आणि डॉक्टरची सुटका

AI निर्मित चित्र

मडगाव, २४ जुलै (वार्ता.) – मडगाव परिसरातील एका नामवंत डॉक्टरचे दिवसाढवळ्या अपहरण झाल्याची धक्कादायक घटना २४ जुलै या दिवशी घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर डॉक्टरांच्या पत्नीने आणि नातेवाइकांनी २४ जुलैला सायंकाळी मडगाव पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक अरुण गावस देसाई यांची भेट घेऊन तक्रार केली.

त्यानंतर मडगाव पोलिसांनी त्वरित कारवाई करून कारवार येथे ३ जणांना अटक केली आणि डॉक्टरांची सुटका केली. यामध्ये तक्रारदार पत्नीचाही समावेश आहे.

यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार २४ जुलै या दिवशी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास २ पुरुष आणि १ महिला यांनी संबंधित डॉक्टरना ते रहात असलेल्या इमारतीतून बलपूर्वक बाहेर काढले. या घटनेचे ‘सीसीटीव्ही’वरील चित्रीकरण सामाजिक माध्यमांत प्रसारित झाले आहे. या व्हिडिओमध्ये अपहरणकर्ते डॉक्टरना ओढत नेत असतांना आणि डॉक्टर घाबरलेल्या अवस्थेत साहाय्यासाठी आरडाओरड करत असतांना दिसत आहेत. डॉक्टरांची पत्नी आणि तिचे २ साथीदार यांनी डॉक्टरांचे अपहरण केले, अशी माहिती दक्षिण गोवा पोलीस अधीक्षकांनी दिली. या सर्वांवर पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून या प्रकरणी अधिक अन्वेषण चालू आहे.