भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्‍या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक

अटक करण्यात आलेले खलिस्तानी फुटीरतावादी

बहराईच (उत्तरप्रदेश) – येथील भारत-नेपाळ सीमेवर सशस्त्र सीमा दल आणि पोलीस यांनी खलिस्तानी फुटीरतावादी संघटना ‘वारिस पंजाब दे’शी संबंधित पसार असणारा बिक्रमजीत सिंह आणि ‘व्हिसा’ नसतांना भारतात प्रवेश करणारा अमेरिकी शीख नागरिक मनबीर सिंह ढिल्लाँ यांना अटक करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणात साहाय्य करणार्‍या ३ स्थानिक लोकांसह एकूण ५ जणांना अटक झाली आहे. बिक्रमजीत सिंह पंजाबच्या रूपनगरचा रहिवासी आहे. तो फेब्रुवारी २०२३ मध्ये पंजाबमधील अजनाला पोलीस ठाण्यात झालेल्या हिंसाचार आणि कलम ३०७ च्या प्रकरणात दीर्घकाळापासून हवा असलेला आरोपी होता.

मनबीर सिंह ढिल्लाँ हा मूळचा पंजाबमधील मोगा येथील रहिवासी आणि अमेरिकी नागरिक आहे. त्याच्याकडे भारताचा वैध व्हिसा नव्हता. बिक्रमजीत त्याला अवैध मार्गाने सीमा पार करून आणत होता. मनबीरसमवेत त्याची पत्नी रायलीन अलेक्झांडर ढिल्लाँ आणि ८ महिन्यांची मुलगी देखील होती. त्यांची कागदपत्रे योग्य असल्याने त्यांना नियमानुसार भारतात प्रवेश देण्यात आला. या अवैध घुसखोरीत साहाय्य करणारा स्थानिक तस्कर सुरेश कुमार पाठक, दिलीप उपाध्याय आणि वाहनचालक राहुल कुमार यांना अटक करण्यात आली.