आतंकवादाविषयी शून्य सहनशीलतेचे धोरण आवश्यक !

मनीला (फिलीपिन्स) येथील ‘आसियान’ देशांच्या बैठकीत परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांचे आवाहन

(‘आसियान’ म्हणजे दक्षिण-पूर्व आशियातील देशांची संघटना. यात ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलीपिन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम या देशांचा समावेश आहे.)

मनीला (फिलीपिन्स) – आतंकवादाविषयी शून्य सहनशीलतेचे धोरण असले पाहिजे. आतंकवादी कृत्यांचे परिणाम भोगावेच लागतील, यात शंका नाही. आतंकवादाला खतपाणी घालणार्‍या आर्थिक साहाय्य रोखण्याला आपण प्राधान्य दिले पाहिजे. यात कोणताही निष्काळजीपणा करू नये, असे आवाहन भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी येथे आयोजित ३३ व्या ‘आसियान रीजनल फोरम’मध्ये मंत्रीस्तरीय बैठकीला संबोधित करतांना केले. यासह आंतरराष्ट्रीय नौका वाहतूक मार्ग सुरक्षित आणि उघडे रहातील, याची निश्चिती करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

आंतरराष्ट्रीय जलमार्गांद्वारे होणारा व्यापार सुरक्षित रहायला हवा !

हॉर्मुझच्या सामुद्रधुनीजवळील संघर्षग्रस्त भागांत व्यावसायिक नौकांवर होणार्‍या आक्रमणांवर डॉ. जयशंकर म्हणाले की, सागरी वाहतूक आणि नागरी पायाभूत सुविधा यांवरील आक्रमणे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाहीत. आंतरराष्ट्रीय जलमार्गांद्वारे होणारा व्यापार सुरक्षित आणि कोणत्याही अडथळ्यांविना चालू राहिला पाहिजे. या आक्रमणांमध्ये भारतीय खलाशांचाही मृत्यू झाला आहे.

संपादकीय भूमिका

आतंकवादाच्या विरोधात अमेरिका आणि इस्रायल यांच्याप्रमाणे भारताने निर्णायक कृती करणे आवश्यक आहे !