‘चरणसेवा’ उपक्रमातून वारकरी सेवेची संतपरंपरा आणि आरोग्याचा मिलाप !

मुख्यमंत्री साहाय्य निधी आणि धर्मादाय रुग्णालय साहाय्य कक्षाचा स्तुत्य उपक्रम; १२ जिल्ह्यांत सेवा विस्तार !

मुंबई – ‘घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरणसेवा साधावया’ या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील सेवाभावातून प्रेरणा घेऊन आषाढी वारीतील वारकर्‍यांसाठी ‘चरणसेवा’ हा अभिनव लोकाभिमुख आरोग्य उपक्रम राबवण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री साहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय साहाय्य कक्षाच्या वतीने हा उपक्रम साकार झाला. श्रद्धेला आरोग्याची साथ आणि सेवेला संत परंपरेची जोड देणारा हा उपक्रम व्यापक ‘लोकचळवळ’ बनला आहे.

उपक्रमाची मुख्य वैशिष्ट्ये !

१. वारकर्‍यांच्या थकलेल्या पायांना औषधी आयुर्वेदिक तेलाने मालिश करणे, फिजिओथेरपी (भौतिकोपचार) देणे आणि आरोग्य पडताळणी करणे या सेवेला ‘चरणसेवा’ असे नाव देऊन श्रद्धेचा सन्मान करण्यात आला आहे.

२. शासन यंत्रणा, वैद्यकीय महाविद्यालये, आरोग्य संस्था, दानशूर व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने औषधे, वैद्यकीय साहित्य अन् अल्पाहाराचे वाटप करण्यात आले.

३. ८ आरोग्य जनजागृती रथांच्या माध्यमातून स्वच्छता, शुद्ध पाणी, पावसाळी आजारांपासून बचाव, रक्तदान आणि अवयवदान यांविषयी व्यापक प्रबोधन करण्यात आले.

सेवा विस्तार (वर्ष २०२५ ते २०२६) !

वर्ष २०२५ मधे ७ जिल्ह्यांतील ३३७ सेवाकेंद्रांवर ९ सहस्र ४७५ आरोग्यदूतांनी १ लाख ७५ सहस्र वारकर्‍यांना आरोग्यसेवा दिली, तर १० लाखांहून अधिक नागरिकांपर्यंत आरोग्याचा संदेश पोचवला.

वर्ष २०२६ मधे उपक्रमाचा विस्तार १२ जिल्ह्यांमध्ये (सातारा, पुणे, सोलापूर, नाशिक, बुलढाणा, अकोला, जालना, बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, अहिल्यानगर) करण्यात आला. १९० मुक्कामस्थळे आणि अनुमाने ४०० सेवा केंद्रांवर १२ सहस्रांहून अधिक आधुनिक वैद्य अन् स्वयंसेवक यांनी सेवा दिली.

धार्मिक यात्रांसाठी हा उपक्रम दिशादर्शक !

‘मुख्यमंत्री साहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक म्हणाले, ‘‘चरणसेवा हा केवळ एक आरोग्य उपक्रम नसून संतपरंपरेतील सेवाभाव आणि आधुनिक सार्वजनिक आरोग्य व्यवस्था यांचा सुंदर संगम आहे. भविष्यात देशातील इतर मोठ्या धार्मिक यात्रांसाठीही हा उपक्रम वस्तूपाठ ठरेल.’’