Pakistan Gurdwara Demolished : गुरुद्वाराचा पाडलेला भाग पुन्हा बांधून द्या ! – भारताची मागणी

पाकिस्तानात १२५ वर्षे जुन्या ऐतिहासिक गुरुद्वारावर बुलडोझर चालवण्याचा भारताकडून निषेध

फारुखाबाद (पाकिस्तान) – येथील १२५ वर्षे जुन्या ‘गुरुद्वारा श्री गुरु सिंह सभा साहिब’वर बुलडोझर चालवल्याच्या प्रकरणी भारत सरकारने पाकचा निषेध केला आहे. ‘या गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करून कडक शिक्षा दिली जावी आणि गुरुद्वाराचा पाडलेला भाग लवकरात लवकर पूर्ववत् बांधून देण्यात यावा. तसेच पाकिस्तानातील अल्पसंख्यांक समुदायाचे रक्षण करणे हे तेथील सरकारचे दायित्व आहे, असे भारताने ठणकावून सांगितले.

हा धार्मिक अल्पसंख्यांकांवर पद्धतशीर अन्याय ! – भारत

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटले की, १२५ वर्षे जुना पवित्र गुरुद्वारा पाडल्याची बातमी अत्यंत क्लेषदायक आहे. शीख धर्मियांच्या श्रद्धेच्या स्थानावर झालेले हे आक्रमण अत्यंत निषेधार्ह आहे. अशा घटना पाकिस्तानात नवीन नाहीत. तिथे अल्पसंख्यांक आणि त्यांच्या प्रार्थनास्थळांना पद्धतशीरपणे लक्ष्य केले जात आहे, ही अत्यंत चिंतेची गोष्ट आहे.

पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांच्याकडून नोंद

लाहोरपासून साधारण ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या या भागात गुरुद्वारावर बुलडोझर चालवण्यात येत असल्याचे समल्यावर शीख समुदायाने मोठ्या प्रमाणावर निषेध आंदोलने चालू केली. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी या प्रकरणाची नोंद घेतली. पंजाब प्रांताचे अल्पसंख्यांक मंत्री रमेश सिंह अरोरा यांनी तातडीने फारुखाबाद येथील गुरुद्वाराला भेट दिली आणि येथील परिस्थितीची पहाणी केली. त्यांनी स्थानिक शीख बांधवांशी चर्चा करून गुरुद्वाराच्या तात्काळ पुनर्बाधणीचे आश्वासन दिले आहे.

स्थानिक मुसलमान व्यापार्‍यांचा पुनर्बांधणीला विरोध

या गुरुद्वाराच्या पुनर्बांधणीला स्थानिक मुसलमान व्यापार्‍यांनी विरोध दर्शवला आहे. त्यांच्यामते हा गुरुद्वारा गेल्या ८० वर्षांपासून ओसाड आणि पडीक अवस्थेत होता. या काळात तिथे अनेक कुटुंबे स्थायिक झाली असून अनेक दुकाने थाटली गेली आहेत. आता जर तिथे पुन्हा गुरुद्वारा उभारला गेला, तर अनेक कुटुंबे बेघर होतील. त्यामुळे सरकारने आधी या लोकांच्या पुनर्वसनाची व्यवस्था करावी, अशी मागणी स्थानिक व्यापार्‍यांनी केली आहे.

संपादकीय भूमिका

भारताच्या अशा मागण्यांना पाक कधीही भीक घालणार नाही. त्याला समजेल अशा भाषेतच भारताने सांगणे आवश्यक !