दैनिक ‘सनातन प्रभात’मधील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची चौकट वाचतांना श्रीराम आणि हनुमान यांच्यामधील अद्वैताच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !

‘१५.३.२०२६ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची पुढील चौकट प्रकाशित झाली होती.


‘देवघरामध्ये श्रीरामासह हनुमानाचीही पूजा करावी !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘श्रीराम आणि हनुमान, हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याप्रमाणे आहेत. त्यामुळे श्रीरामाच्या उपासनेमध्ये हनुमानाचेही स्थान आहे. श्रीरामरक्षेतही हनुमानाचा उल्लेख आलेलाच आहे. यासाठी देवघरामध्ये श्रीरामाचे चित्र अथवा प्रतिमा असल्यास सोबत हनुमानाचेही चित्र अथवा प्रतिमा ठेवून त्याचीही नियमित पूजा करावी.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२३.१.२०२६)

 

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची चौकट वाचल्यानंतर आज्ञाचक्रावर संवेदना जाणवणे आणि आपोआप ‘श्रीराम जय राम जय जय राम ।  श्री हनुमते नमः ।’ असा नामजप चालू होणे अन् त्यातून पुष्कळ आनंद मिळणे

‘मी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची ‘देवघरामध्ये श्रीरामासह हनुमानाचीही पूजा करावी !’, ही चौकट वाचत असतांना माझ्या आज्ञाचक्रावर चांगल्या संवेदना जाणवत होत्या. (एरव्हीही मी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची चौकट, लेख किंवा सूचना वाचत असतांना मला अशी अनुभूती येते.) काही क्षणांनंतर माझ्या लक्षात आले, ‘माझा आपोआप ‘श्रीराम जय राम जय जय राम । श्री हनुमते नमः ।’ हा नामजप चालू झाला आहे.’ माझ्याकडून हा नामजप आपोआप होत असतांना मला त्यातून पुष्कळ आनंद मिळत होता. मला उत्साह आणि हलकेपणा जाणवत होता. त्या वेळी मी हा नामजप न थांबवता तो जेवढा वेळ होत होता, तेवढा वेळ होऊ दिला. माझ्याकडून अनुमाने २० ते २२ मिनिटे हा नामजप झाला.

२. ‘श्रीराम जय राम जय जय राम । श्री हनुमते नमः ।’ हा नामजप झाल्यानंतर थकवा येऊन जडपणा जाणवणे

माझा ‘श्रीराम जय राम जय जय राम ।  श्री हनुमते नमः ।’ हा नामजप थांबल्यानंतर अनुमाने १० मिनिटांनी मला थकवा जाणवू लागला, तसेच मला शरीर, मन आणि बुद्धी यांतही जडपणा जाणवत होता. ‘माझा नामजप झाल्यानंतर मी इतर काही कृती न केल्याने माझ्यावर त्रासदायक शक्तीचे आवरण आले’, असे मला जाणवले.

३. थकवा असतांना आपोआप ‘श्री हनुमते नमः । श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप होणे आणि ३ ते ५ मिनिटांत थकवा न्यून होणे

मला थकवा आणि जडत्व जाणवत असतांना माझा आपोआप ‘श्री हनुमते नमः । श्रीराम जय राम जय जय राम ।’ असा एक-आड-एक नामजप होऊ लागला. माझा हा नामजप होऊ लागल्यावर ३ ते ५ मिनिटांत मला जाणवणारा थकवा आणि जडत्व न्यून झाले. मला हलकेपणा जाणवू लागला आणि उत्साही वाटू लागले. माझा अनुमाने १० ते १२ मिनिटे तो नामजप होत होता. त्यानंतर मी सामान्य स्थितीत आलो.

श्री. निषाद देशमुख

४. आपोआप नामजप चालू होण्याच्या संदर्भात सूक्ष्म ज्ञानातून लक्षात आलेली सूत्रे !

४ अ. श्रीराम धर्मसंस्थापनेशी निगडित प्रगट शक्ती, तर हनुमंत कार्यसापेक्ष प्रगट शक्ती असून दोन्हींच्या समन्वयाने अडथळ्यांविरहित कार्य होणे : स्थुलातील कार्य करण्यासाठी आध्यात्मिक प्रगट शक्तीची आवश्यकता असते. कार्यासाठी प्रगट शक्ती अल्प झाली, तर कार्य पूर्णत्वाला जात नाही किंवा कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. कार्याला पूर्णत्वाकडे नेणारी प्रगट शक्ती नष्ट करायला मोठ्या वाईट शक्तीही कार्यात विविध अडथळे निर्माण करतात. यामागे त्यांचा उद्देश ‘कार्यातील अडथळे दूर करण्यास प्रगट शक्तीचा व्यय करवून कार्य पूर्णत्वाला जाऊ न देणे’, असा असतो. अशा वेळी कार्यसापेक्ष अडथळे दूर करण्यासाठी वेगळ्या प्रगट शक्तीची आवश्यकता असते.

प्रत्येक अवताराचे कार्य ठरलेले असते, त्या कार्यानुसार त्या अवतारात प्रगट शक्ती कार्यरत असते. त्रेतायुगात श्रीराम अवताराचा उद्देश ‘रावणाचा वध करून रामराज्याची स्थापना करणे’, हा होता. या कार्यात अहिरावणासारख्या मोठ्या वाईट शक्तींनी अडथळे आणल्यावर त्यांच्या विनाशासाठी हनुमंताची कार्यसापेक्ष प्रगट शक्ती कार्यरत झाली. थोडक्यात श्रीराम धर्मसंस्थापनेशी निगडित प्रगट शक्ती, तर हनुमंत कार्यसापेक्ष प्रगट शक्ती आहे. त्यामुळे दोन्ही शक्तींच्या समन्वयाने अडथळ्यांविरहित कार्य पूर्ण झाले.

वरील उदाहरणांचा अभ्यास केल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितल्यानुसार ‘श्रीराम आणि हनुमान, हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याप्रमाणे आहेत’, हे सिद्ध होते.

४ आ. श्रीराम आणि हनुमान यांच्यातील अद्वैताची अनुभूती देण्यासाठी देवाने साधकाकडून ‘श्रीराम जय राम जय जय राम ।  श्री हनुमते नमः ।’ हा नामजप करून घेणे : श्रीराम आणि हनुमान हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एकाविना दुसर्‍याला पूर्णत्व नाही. या अद्वैताची अनुभूती देवाने मला ‘श्रीराम जय राम जय जय राम ।  श्री हनुमते नमः ।’ हा नामजप चालू करून दिली. ‘श्रीराम जय राम जय जय राम ।  श्री हनुमते नमः ।’ या क्रमात नामजप केल्यामुळे उपासकाला कार्यात अडथळे आले, तरी ते दूर करण्यासाठी आवश्यक प्रगट शक्ती ग्रहण होते. त्यामुळे त्याला स्थुलातील कार्यासाठी सलग शक्तीचा पुरवठा होत रहातो. त्यामुळे काही काळ हा नामजप केल्यावर आनंद, उत्साह आणि हलकेपणा जाणवतो.

४ इ. वाईट शक्तींचा त्रास असणार्‍या व्यक्तींसाठी किंवा कार्यातील संकटे अल्प करण्यासाठी ‘श्री हनुमते नमः । श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप पूरक असणे : मी ‘श्रीराम जय राम जय जय राम । श्री हनुमते नमः ।’ या क्रमात नामजप केल्यावर मला मिळत असलेली शक्ती अडवण्यासाठी वाईट शक्तींनी माझ्यावर आक्रमण केले. यामुळे मला नामजपानंतर थकवा, जडत्व आणि स्वतःवर त्रासदायक शक्तीचे आवरण आल्याचे जाणवले. स्थुलातील त्रास दूर करण्यासाठी प्रगट शक्ती अधिक उपयोगी असते, तर त्रासाचे मूळ नष्ट करण्यासाठी अप्रगट शक्ती अधिक परिणामकारक असते.

‘श्री हनुमते नमः । श्रीराम जय राम जय जय राम ।’ या क्रमात नामजप केल्याने नामजपातून प्रथम मिळालेल्या प्रगट शक्तीमुळे त्रास दूर झाले आणि त्यानंतर मिळणार्‍या प्रगट शक्तीमुळे कार्यासाठी बळ मिळाले. श्री हनुमानाच्या नामजपातील प्रगट शक्तीमुळे मला त्रासामुळे जाणवणारी स्थुलातील लक्षणे लगेच नष्ट झाली आणि त्यानंतर श्रीरामाच्या नामजपातील प्रगट शक्तीमुळे मला असलेले वाईट शक्तींचे त्रास काही प्रमाणात अल्प झाले. त्याचप्रमाणे माझ्या सात्त्विकतेत वाढ होऊन माझ्याभोवती संरक्षककवच निर्माण होण्यास साहाय्य झाले. त्यामुळे मला पुन्हा त्रास झाला नाही.

यातून लक्षात येते, ‘श्रीराम आणि हनुमान यांची उपासना करतांना वाईट शक्तींचा त्रास असलेल्या जिवांसाठी किंवा समष्टी कार्यातील अडथळे अल्प करण्यासाठी ‘श्री हनुमते नमः । श्रीराम जय राम जय जय राम ।’ या क्रमात नामजप करणे अधिक पूरक ठरते.’

५. कृतज्ञता

विविध संत सांगतात, ‘गुरूंच्या एका वचनात शिष्याचे जीवन पालटण्याएवढे गूढ ज्ञान आणि अफाट सामर्थ्य असते.’ ‘श्रीराम आणि हनुमान, हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याप्रमाणे आहेत’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या वाक्यातील अध्यात्माचे तत्त्व मला प्रत्यक्ष अनुभूतीच्या माध्यमातून अनुभवता आले. याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ता साधक, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : १५.३.२०२६ आणि वेळ : सकाळी ९.५५ ते १०.३४ (३९ मिनिटे))

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.