मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !

भारतीय संस्कृतीमध्ये मंदिर, म्हणजे केवळ पूजा करण्याचे स्थान नाही. मंदिर हे समाजजीवन, अर्थव्यवस्था, शिक्षण, संस्कार, पर्यावरण संरक्षण, सेवाभाव आणि राष्ट्रनिर्मिती यांचे केंद्र राहिले आहे. प्राचीन भारतात अनेक नगरांची उभारणी मंदिरांच्या भोवती झाली. मंदिर म्हणजे श्रद्धा, संस्कार आणि समाजव्यवस्था यांचा प्राणबिंदू होय. आज आधुनिक विकासाच्या युगात मंदिरांचे महत्त्व केवळ धार्मिक दृष्टीकोनातून पाहिले जाते; परंतु जर आपण इतिहास, अर्थशास्त्र आणि सामाजिक व्यवस्था यांच्या दृष्टीने पाहिले, तर मंदिर हे मोठे आर्थिक अन् सांस्कृतिक ‘इंजिन’ असल्याचे स्पष्ट होते.

१. मंदिर आणि स्थानिक अर्थव्यवस्था

एक मोठे मंदिर उभे राहिले की, त्याच्या आजूबाजूला अनेक प्रकारचे रोजगार निर्माण होतात, उदाहरणार्थ फुलविक्रेते, पूजासाहित्य विक्रेते, प्रसाद निर्माते, दुग्धव्यवसाय, फळ आणि भाजी विक्रेते, वाहतूक सेवा, भोजनालये अन् निवासव्यवस्था, हस्तकला उत्पादक, धार्मिक पुस्तके आणि वस्तू विक्रेते, मार्गदर्शक अन् पर्यटन सेवा.

एका मंदिरामुळे शेकडो कुटुंबांना रोजगार मिळू शकतो. यात्रास्थळांमध्ये तर सहस्रो लोकांची उपजीविका मंदिरांवर आधारित असते. मंदिराभोवती निर्माण होणारी ही अर्थव्यवस्था स्थानिक आणि स्वदेशी अर्थचक्र निर्माण करते. पैसा स्थानिक समाजात फिरतो आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते.

२. मंदिर परिसरातून महिला सक्षमीकरण

श्री. गिरीश जयंतीलाल शहा

भारतीय परंपरेमध्ये महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे. मंदिरांच्या माध्यमातून महिलांसाठी विविध उपक्रम राबवता येऊ शकतात, उदाहरणार्थ प्रसाद निर्मिती केंद्र, पारंपरिक खाद्यपदार्थ उद्योग; हातमाग, शिवणकाम, भरतकाम यांचे प्रशिक्षण; उदबत्ती, गोमय उत्पादने, दीप, रांगोळी साहित्य यांची निर्मिती; नैसर्गिक रंग आणि पूजा साहित्य सिद्ध करणे, लघुउद्योग समूह. यामुळे महिलांना घराजवळ रोजगार उपलब्ध होईल आणि आर्थिक स्वावलंबन वाढेल.

३. मंदिर आणि गोसंवर्धन

भारतीय मंदिर संस्कृतीमध्ये गोसेवेचे अत्यंत महत्त्व आहे. अनेक प्राचीन मंदिरांशी गोशाळा जोडलेल्या असत. मंदिर परिसरात पुढील उपक्रम विकसित करता येतील, उदाहरणार्थ –

गोशाळा आणि पांजरपोळ (दूध न देणारी गुरे सांभाळण्यासाठीचा गोठा) उभारणी, गोबर आधारित खतनिर्मिती, गोमूत्र आधारित जैविक उत्पादने, नैसर्गिक शेती प्रशिक्षण, शेतकरी मार्गदर्शन केंद्र, ग्रामीण युवकांसाठी रोजगार.

गोबर, जैविक खत आणि नैसर्गिक शेती यांच्या माध्यमातून रासायनिक खतांवरील अवलंबित्व न्यून करता येईल. यामुळे पर्यावरण, शेतकरी दोघांनाही लाभ होईल.

४. मंदिर परिसरात संस्कार आणि शिक्षण केंद्र

पूर्वी गुरुकुल व्यवस्था मंदिरांशी जोडलेली होती. आज पुन्हा मंदिरांभोवती मूल्याधारित शिक्षणाची उभारणी करण्याची आवश्यकता आहे. मंदिरांमध्ये संस्कारवर्ग,  योग आणि ध्यान केंद्र; वेद, उपनिषद अन् गीता यांचे अध्ययन, भारतीय इतिहास शिक्षण, राष्ट्रभक्ती प्रशिक्षण, बालसंस्कार शिबिरे; कला, संगीत आणि नृत्य यांचे प्रशिक्षण हे उपक्रम चालवता येऊ शकतात. आजच्या पिढीला आधुनिक शिक्षणासह नैतिक मूल्ये शिकवणे अत्यंत आवश्यक झाले आहे.

५. मंदिर पर्यटन आणि ग्रामीण विकास

अनेक गावे मंदिरांमुळे प्रसिद्ध झाली आहेत. जर योग्य नियोजन केले, तर मंदिर पर्यटन ग्रामीण विकासाचे मोठे साधन बनू शकते. यामध्ये स्वच्छता मोहिमा, ग्रामीण ‘होमस्टे’ (स्थानिक व्यक्तीच्या घरी रहाण्याची सोय), स्थानिक खाद्यसंस्कृती, पारंपरिक कलाप्रदर्शन, कृषी पर्यटन, गो पर्यटन आणि आध्यात्मिक पर्यटन यांचे आयोजन होऊ शकते. यामुळे गावातील युवकांना रोजगार मिळेल आणि शहरांकडे होणारे स्थलांतर न्यून होईल.

६. मंदिर परिसरात पर्यावरण संवर्धन

भारतीय संस्कृतीने वृक्ष, नद्या, पर्वत आणि पशूपक्षी यांना पूजनीय मानले आहे. प्रत्येक मंदिर पर्यावरण चळवळीचे केंद्र बनू शकते, उदाहरणार्थ वड, पिंपळ, नीम, औदुंबर, आंबा यांसारख्या देशी वृक्षांचे रोपण; जलसंधारण, पावसाच्या पाण्याची साठवण; तळी आणि विहिरी यांचे पुनरुज्जीवन, प्लास्टिकमुक्त परिसर, जैवविविधता उद्याने आदी उपक्रम राबवता येऊ शकतात. ‘एक मंदिर – एक जलसाठा – एक वृक्षवन’ हा उपक्रम देशभर राबवता येईल.

७. मंदिर आणि आरोग्य सेवा

पूर्वी धर्मशाळा, अन्नछत्रे, औषध केंद्रे मंदिरांशी जोडलेली होती. आज मंदिरांमधून सामाजिक आरोग्यव्यवस्थाही उभारता येऊ शकते, उदाहरणार्थ विनामूल्य आरोग्य शिबिरे, आयुर्वेद केंद्र, योग चिकित्सा, रक्तदान शिबिरे, व्यसनमुक्ती अभियान आणि वृद्ध सेवा कार्यक्रम आयोजित करता येऊ शकतात. धर्म आणि सेवा यांचे हे सुंदर एकत्रीकरण समाजाला बळकटी देईल.

८. मंदिर आणि युवाशक्ती

आज युवकांमध्ये ऊर्जा आहे; पण दिशादर्शनाची आवश्यकता आहे. मंदिर परिसर युवकांसाठी राष्ट्रनिर्मितीचे प्रशिक्षण केंद्र बनू शकतो. युवकांसाठी पुढील उपक्रम आयोजित करता येतील, उदाहरणार्थ – स्वयंसेवक प्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन इ. सेवा अभियान, पर्यावरण मोहीम, ग्रामविकास कार्यक्रम, सांस्कृतिक कागदपत्रांची नोंदणी वा त्यांच्या धारिका करणे, वारसा संरक्षण.

यामुळे युवक भक्त होण्यासह कर्ते आणि राष्ट्रनिर्माते बनतील.

९. मंदिर आणि पारंपरिक कौशल्य जतन

भारतीय मंदिरे ही वास्तूकला, शिल्पकला, चित्रकला, धातूकाम आणि हस्तकला यांचे विद्यापिठे होती. आज मंदिरांच्या माध्यमातून शिल्पकला, दगडी नक्षीकाम, लाकडी काम, धातूच्या मूर्तींची निर्मिती, पारंपरिक वाद्यनिर्मिती, वस्त्रकला आणि हस्तकला उद्योग अशा कौशल्यांना प्रोत्साहन देता येईल. यामुळे हरवत चाललेली भारतीय कौशल्ये पुन्हा जिवंत होतील.

१०. मंदिराभोवती आत्मनिर्भर गाव संकल्पना

प्रत्येक मोठ्या मंदिराने त्यांच्या परिसरातील ५ ते १० गावे दत्तक घेतली, तर मोठा पालट घडू शकतो. याअंतर्गत जलसंधारण, चराऊ भूमी विकास, गोसंवर्धन, जैविक शेती, महिला बचत गट, कौशल्य प्रशिक्षण, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आणि वृक्षलागवड आदी उपक्रम राबवता येतील. मंदिर हे केवळ घंटा वाजवणे आणि आरती यांच्यापुरते मर्यादित न रहाता ते समाज परिवर्तनाचे केंद्र बनू शकते.

११. निष्कर्ष

भारतीय मंदिर संस्कृती ही जगातील सर्वांत व्यापक सामाजिक व्यवस्थांपैकी एक आहे. मंदिर म्हणजे केवळ श्रद्धास्थान नाही; ते अर्थव्यवस्था, सेवा, शिक्षण, पर्यावरण, संस्कार आणि राष्ट्रशक्ती यांचे केंद्र आहे. आज आवश्यकता आहे, ती मंदिरांचे पुनर्मूल्यांकन करण्याची ! प्रत्येक मंदिराने पूजा ते प्रगती, भक्ती ते शक्ती आणि संस्कार ते स्वावलंबन यांच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. जर देशातील लाखो मंदिरे समाजविकासाच्या या अभियानात सहभागी झाली, तर भारतात आत्मनिर्भरता, सांस्कृतिक पुनरुत्थान आणि ग्रामविकास यांची नवी क्रांती घडू शकते.

मंदिरांचे दरवाजे केवळ दर्शनासाठी नव्हे, तर समाजउन्नती, राष्ट्रसेवा आणि मानवकल्याण यांसाठीही खुली झाली पाहिजेत. मंदिर हे राष्ट्राचे आध्यात्मिक हृदय आहे आणि जेव्हा हे हृदय समाजसेवेने धडधडते, तेव्हा राष्ट्र समृद्ध होते !

लेखक : श्री. गिरीश जयंतीलाल शहा, व्यवस्थापकीय विश्वस्त (मॅनेजिंग ट्रस्टी) समस्त महाजन. (१८.५.२०२६)