स्तनदुखी आणि स्तनातील गाठी : कारणे अन् आयुर्वेदाचा दृष्टीकोन

स्त्रीरोग आणि आयुर्वेद (लेखांक १७)

स्त्रियांच्या आरोग्यात स्तनांचे (Breast) आरोग्य अत्यंत महत्त्वाचे आहे. ‘हार्मोनल’ (संप्रेरक) पालट, स्तनपान, जीवनशैलीतील पालट किंवा संसर्ग यांमुळे अनेक स्त्रियांना स्तनदुखी (Mastalgia) किंवा स्तनातील गाठी जाणवतात. बहुतांश वेळा या गाठी निरुपद्रवी (benign) असतात; परंतु योग्य वेळी पडताळणी आणि उपचार न केल्यास काही प्रकरणांत गंभीर स्वरूप धारण करू शकतात. आयुर्वेद या समस्यांकडे स्थानिक विकार म्हणून न पहाता दोष-धातू-स्रोतस या संकल्पनांच्या आधारे समग्र पद्धतीने विचार करतो.

लेखांक १६ साठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1043806.html

१. स्तनदुखी आणि गाठी म्हणजे काय ?

अ. स्तनदुखी  (Mastalgia) : मासिक पाळीपूर्व / त्या कालावधीत होणारी वेदना (cyclical) किंवा इतर कारणांनी होणारी वेदना (non-cyclical).

आ. स्तनातील गाठी : स्तनातील ऊतींमध्ये (tissue) झालेली गाठ/घनता–उदा. ‘फायब्रोएडेनोमा’ (fibroadenoma) ‘सिस्ट’ (cysts – गळू) इत्यादी (बहुतेक सौम्य benign).

आयुर्वेदात स्तनांशी संबंधित विकारांचा संबंध रक्त, रस धातू, तसेच कफ (गाठी / संचय) आणि पित्त (दाह / जळजळ) यांच्याशी जोडला जातो.

२. प्रमुख लक्षणे

स्तनात वेदना किंवा जडपणा, गाठ किंवा कडकपणा जाणवणे; सूज, लालसरपणा किंवा उष्णता, स्पर्शाने वेदना वाढणे, स्तनांग्रातून स्राव (कधी कधी), पाळीपूर्व वेदना वाढणे

३. खालील लक्षणे आढळल्यास त्वरित पडताळणी आवश्यक !  

गाठ सतत वाढत जाणे, स्तनावरील त्वचेवर पालट (खडबडीत / ओढलेली त्वचा), रक्तमिश्रित स्राव, काखेत (axilla) गाठ

४. आयुर्वेदाची कारणमीमांसा

वैद्या (सौ.) सारिका नीलेश लोंढे

अ. कफदोष वाढ : ऊतींमध्ये संचय, गाठी तयार होणे

आ. पित्तदोष वाढ : दाह, जळजळ, सूज

इ. वातदोष : वेदना, चुभणे

ई. मंद अग्नी आणि आम : चुकीचे पोषण, अवरोध

उ. रक्तदुष्टी : सूज आणि वेदना वाढणे

ऊ. ‘हार्मोनल’ असंतुलन (आधुनिक दृष्टी) : दोष असंतुलन (आयुर्वेद)

५. आयुर्वेदाच्या चिकित्सेत विचार करतांना

स्त्रीची प्रकृती (वात-पित्त-कफ), वेदना पाळीशी संबंधित आहे का ?, गाठीचे स्वरूप (कठीण / मऊ, हलणारी / स्थिर), स्तनपान चालू आहे का ? (lactational changes), पचनशक्ती (अग्नी) आणि आम स्थिती; वजन, ताण, हार्मोनल लक्षणे आदींचा विचार करावा लागतो.

६. मुख्य उद्देश

कफ-पित्त शमन + रक्तशुद्धी + आम पाचन + स्रोतस शुद्धी

७. आयुर्वेदानुसार उपचारपद्धत

अ. औषधी उपचार (वैद्यकीय सल्ल्यानुसार)

१. कांचनार गुग्गुळ : गाठी न्यून करण्यास साहाय्य

२. त्रिफळा : स्रोतस शुद्धी, पचन सुधारणा

३. मंजिष्ठा : रक्तशुद्धी, दाह न्यून

४. हरिद्रा (हळद) : दाहशामक, ‘प्रतिऑक्सिडंट’

५. गुडुची : रोगप्रतिकारशक्ती वाढवते

आ. बाह्य उपचार

१. लेप (उदाहरणार्थ हळद + त्रिफळा चूर्ण) : सूज / वेदना न्यून

२. सौम्य अभ्यंग : वेदना न्यून करण्यास साहाय्य

३. उष्ण/शीत शेक (लक्षणानुसार)

इ. पंचकर्म (योग्य निवडीनुसार)

१. विरेचन : पित्तशमनासाठी

२. बस्ती : वात संतुलनासाठी

८. आयुर्वेदाचे घरगुती उपाय (Safe & Practical)

हळदीसह कोमट दूध (दाह न्यून करण्यासाठी), गरम पाण्याचा सौम्य शेक (वेदना असल्यास), आरामदायी आणि योग्य फिटिंगचा ‘ब्रा’ वापरणे, ताण न्यून करण्यासाठी योग / प्राणायाम, वजन नियंत्रण अन् नियमित व्यायाम करावा, तसेच गाठीवर जोराने मालिश करणे टाळावे.

९. आहार मार्गदर्शन

अ. काय घ्यावे ? : हिरव्या भाज्या, फळे, हळद, लसूण, आल्याचा वापर, कोमट पाणी

आ. काय टाळावे ? : अधिक तेलकट, तळलेले पदार्थ, जंक फूड (पिझ्झा, बर्गर) अणि साखर, अतीथंड पदार्थ

१०. जीवनशैलीविषयी मार्गदर्शन

अ. नियमित self-breast examination (स्तनांची स्वयंपरीक्षा) (मासातून एकदा)

आ. पाळीनंतर ५ ते ७ दिवसांनी पडताळणी करणे योग्य

इ. पुरेशी झोप आणि ताण नियंत्रण

ई. कॅफीनचे प्रमाण मर्यादित ठेवणे (काहींमध्ये वेदना वाढवते)

११. निष्कर्ष

स्तनदुखी आणि स्तनातील गाठी या समस्या सर्वसाधारण असल्या, तरी त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. आयुर्वेद या समस्यांकडे समग्र दृष्टीने पाहून दोष संतुलन, रक्तशुद्धी आणि जीवनशैली सुधारण्यावर भर देतो. योग्य वेळी पडताळणी, वैद्यकीय सल्ला, संतुलित आहार आणि घरगुती उपाय यांच्या साहाय्याने बहुतेक स्त्रियांना आराम मिळू शकतो अन् गंभीर समस्या टाळता येऊ शकतात.

– वैद्या (सौ.) सारिका नीलेश लोंढे, निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल, भोसरी, पुणे.

लेखांक १८ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1049086.html

🪷‘स्त्री रोग आणि आयुर्वेद’ या मालिकेतील सर्व लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा🪷