स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची आज आवश्यकता !

२८ मे या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची दिनांकानुसार जयंती झाली. त्या निमित्ताने...

भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या ८० वर्षांनंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची काय आवश्यकता आहे, असा प्रश्न कुणाच्याही मनात निर्माण होईल. त्याला उत्तर असे, ‘शरीररूपी सावरकर जेवढे महत्त्वाचे होते, त्यापेक्षाही विचाररूपी सावरकर हे कालजयी आहेत आणि त्यांचे विचार हे प्रत्येक भारतियासाठी अमर आहेत.’ आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘ऐतिहासिक घटनांचे अचूक ज्ञान, हिंदुपदपादशाही, १८५७ चे स्वातंत्र्यसमर, हिंदु समाजातील वैगुण्ये आणि विज्ञाननिष्ठ सावरकर’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1045042.html

स्वातंत्र्यवीर सावरकर

६. सावरकर यांचा बुद्धीप्रामाण्यवाद

बुद्धीप्रामाण्यावर भर देऊन सावरकर यांनी सामाजिक क्रांती केली. सावरकर यांच्या मते हिंदु राष्ट्राच्या अधोगतीला कारणीभूत होणार्‍या दुष्ट राष्ट्रीय रूढींसही हे श्रुतिस्मृतिपुराणोक्तच अमर करून ठेवत आले आहेत. कर्तृत्वाचे हातपाय जखडून टाकणार्‍या या बेड्या तोडल्याच पाहिजेत आणि ते सुदैवाने आपल्या इच्छेवर अवलंबून आहे; कारण या बेड्या मानसिक आहेत. हिंदु समाजातील विविध चालींचा प्रदीर्घ अभ्यास केल्यानंतर सावरकर अंतर्मुख होतात आणि भारतातील विविध प्रकारच्या ७ बंदीकडे लक्ष वेधतात. (या ७ बंदीविषयीचे विवरण २९ मे या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात करण्यात आले आहे.)

सावरकर आग्रहाने सांगतात, ‘भारतियांनी विज्ञानयुगाचे पान उलटले पाहिजे. आज काय योग्य ते सांगण्याचा अधिकार प्रत्यक्षनिष्ठ प्रयोगक्षम विज्ञानाचा ! यापुढे कोणतीही गोष्ट चांगली कि वाईट ?, सुधारणा इष्ट कि अनिष्ट ? या प्रश्नांचे उत्तर ती आज उपयुक्त कि अनुपयुक्त आहे ? या एकाच प्रत्यक्ष कसोटीवर पारखून दिले पाहिजे. तिला शास्त्राधार आहे का ? हा प्रश्न आता केव्हाही विचारला जाऊ नये.

कोणती गोष्ट राष्ट्राच्या उद्धरणार्थ आज आवश्यक आहे ते प्रयोगाने प्रत्यक्षपणे सिद्ध करून देता येते. कोणताही ग्रंथ अपरिवर्तनीय आणि त्रिकालाबाधित आम्ही मानत नाही, पुरातन ग्रंथ आम्ही अत्यंत कृतज्ञ आदराने आणि ममत्वाने सन्मानतो; पण ऐतिहासिक ग्रंथ म्हणून. अनुलंघ्य धर्मग्रंथ म्हणून नव्हे. त्यातील सारे ज्ञान, अज्ञान आजच्या विज्ञानाच्या कसोटीस आम्ही लावणार आणि त्यानंतर आज राष्ट्रदारणास उद्धारणास जे अवश्य वाटेल ते बेधडक आचरणार. आम्ही अद्ययावत् बनणार.’

श्री. प्रवीण दीक्षित

७. स्पर्शबंदी (अस्पृश्यता)

आम्ही शाळांतून पूर्वास्पृश्य मुलांना सरमिसळ बसवण्याची चळवळ रत्नागिरी जिल्हाभर चालवली, तेव्हा गावोगाव स्पृश्य जनता चवताळून उठली. जो तो आम्हांस म्हणाला, ‘अहो, तुम्ही आम्हा स्पृश्यांच्या धर्मभावना का दुखवता ?’ तेव्हा आम्ही त्यांना विचारावे, ‘आम्ही तरी काय करावे ? तुम्हांस जशा भावना आहेत, तशाच अस्पृश्यांना नाहीत का ? तुमची भावना त्यांना कुत्र्याहून दूर सारावे ही. ती न दुखवावी, तर आमच्या मानवी धर्मबंधूंना कुत्र्याहून अस्पृश्य मानण्यात नि ज्या शाळेत कुत्री बसतात, त्यातून त्यांना हुसकून देण्यात त्यांच्या भावना दुखतात ? अशा परिस्थितीत ज्यांची भावना अन्याय्य, लोकहितविघातक, आततायी, त्यांचीच भावना दुखवणे प्राप्त. चोराची भावना दुखवू नये म्हणून सावास जागवू नये कि काय ?’ तोच न्याय बुद्धीभेद करू नका, भावना दुखवू नका, ही ओरड करणार्‍या सर्वांच्या प्रकरणी लागू आहे !

खरोखरच चातुर्वर्ण्याचा आणि त्यासच जर सनातन धर्म म्हणावयाचा असेल, तर सनातन धर्माचा जर कुणी कट्टर शत्रू असेल, तर तो जातीभेदाचे निर्मूलन करू निघालेला सुधारक नसून जातीभेदासही सनातन म्हणून उचलून धरणारा ‘सनातन धर्माभिमानीच’ होय.

८.  सिंधूबंदी (समुद्रप्रवासावर बंदी)

मलबारातील मोपल्यांचे आणि मध्यप्रांतातील ‘हलबीचे’ उदाहरण वानगीसाठी विवंचून पहा ! ‘समुद्र यातुः स्वीकारः कलौ पंच विवर्जयेत्’, म्हणजेच ‘समुद्रगमन करणार्‍यास जातीबहिष्कृत करावे’, हा सिंधूबंदीचा करंटा धर्मनियम जेव्हा शास्त्रांनी घालून दिला, तेव्हापासून हिंदु राष्ट्राचा सारा परदेशी वाणिज्य व्यापार आम्ही आपण होऊन परक्यांच्या हाती सोपवून दिला ! अर्थात् मलबारातील हिंदु राजेही समुद्र उल्लंघणे महापाप समजू लागले; परंतु अरब लोक मलबाराशी जो सामुद्रिक व्यापार करत त्याद्वारे अलोट संपत्ती मिळते तीही आपल्या मिळावी, आपल्याच सत्तेखालच्या सेवकांनी आपल्या मोठमोठ्या वाणिकनौका घेऊन नि जगातील द्रव्य आणून आपल्या कोशात त्याची भर घालावी, अशीही लालसा त्या मलबारी हिंदु राजांना झाली. तेव्हा समुद्रगमनाचे पाप तर हिंदूंच्या हातून होऊ नये आणि समुद्रगमनानेच मिळणारी जागतिक वाणिज्यसंपदा तर संपादिता यावी, या दोन्ही परस्परविरुद्ध हेतूंना साधणारी कोणती फक्कड युक्ती त्या हिंदु राजांनी काढली म्हणता ? तर प्रत्येक हिंदु कुटुंबातील एकेक मुलाने मुळातच हिंदूचे मुसलमान व्हावे ही ! तशी राजाज्ञा सुटली आणि या ‘धार्मिक’ भावनेपायी सहस्रावधी कुटुंबातील एकेक मुलगा मुसलमानास दिला !! स्वयंपाक करावयास सरपण हवे म्हणून हातपायच कापून चुलीत कोंबण्यात आले ! ही ऐतिहासिक घटना आहे – सिंधूबंदीचा ‘धर्म’ रक्षावा म्हणून मुसलमान झाले – त्यांचेच वंशज हे मोपले मुसलमान ! आज तेच हिंदु  समाजावर अनन्वित बलात्कार करून सहस्रो हिंदूंना तलवारीच्या धाकाने बाटवून गोताचेच काळ झाले आहेत !

९. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार अजरामरच !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार हे अजरामर आहेत आणि त्यातून चिरंतन प्रेरणा मिळत असते. सावरकर यांनी हे विचार मोठ्या प्रमाणात वर्ष १९३५ ते वर्ष १९५० या काळात लिहिलेले असले, तरीही ते जणू काही आजच लिहिलेले आहेत इतके ताजेतवाने आहेत आणि त्यातून त्यांनी काढलेली अनुमाने ही पूर्णपणे कालाच्या मर्यादांवर विजय मिळवून चिरंतन झाली आहेत. हे विचार जेवढे आपण वाचतो, विचार करतो, तेवढे ते आपल्याला पटत जातात आणि अभ्यास करणारा तेव्हाच सावरकरमय होऊन जातो. विशेष म्हणजे लोकांनी स्वतःच हे विचार स्वीकारल्यामुळे त्यांचा कुणीही प्रचार न करताच ते विचार पुन्हा पुन्हा वाचले जातात आणि त्यामुळेच लोकांना स्फूर्ती प्राप्त होऊन ते अमर झालेले आहेत.

(समाप्त)

– श्री. प्रवीण दीक्षित, निवृत्त पोलीस महासंचालक, मुंबई. (२५.५.२०२६)