चैतन्यमय सोहळ्यासाठी प.पू. प्रसाद महाराज अमळनेरकर यांचे कोथरूड नगरीमध्ये आगमन

पुणे, २७ मे (वार्ता.) – भगवान दत्तात्रेयांची अमोघ कृपा, पितृदोषांतून मुक्ती आणि नवविधा भक्तीचे परम पावन प्रतीक मानला जाणारा ‘नऊ कुंडीय दत्तयाग’ हा आध्यात्मिक विश्वातील अत्यंत दुर्मिळ अन् कल्याणकारी सोहळा मानला जातो. नवनाथांचे सामर्थ्य आणि नवग्रहांची अनुकूलता मिळवून देणार्या या महायज्ञामुळे परिसरातील नकारात्मक ऊर्जेचा नाश होऊन सुख-समृद्धीचा उदय होतो, अशी अढळ श्रद्धा आहे. हिंदु धर्माचा प्रसार होण्यासह जनकल्याणार्थ उद्देशाने यागाचे आयोजन करण्यात आले आहे.
अमळनेरकर महाराज सेवा संघ, पुणे यांनी आयोजित केलेल्या या दत्तयाग कार्यक्रमामुळे या अलौकिक आणि मंगलमयी भक्तीचा अनुभव २८ मेपासून ३ दिवस लाभणार आहे. कोथरूड, पुणे येथे होत असलेल्या दत्तयागाच्या निमित्ताने शिष्य, भक्त, भाविक अशा सर्वांनाच यामध्ये सहभागी होता येणार आहे. पुरुषोत्तम मासाचे औचित्य साधून कोथरूड येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘अमळनेरकर महाराज सेवा संघा’च्या वतीने आयोजित कार्यक्रमाची सिद्धता शिष्य वर्गाकडून गेल्या काही दिवसांपासून चालू होती. ती पूर्ण होऊन आजपासून प्रत्यक्ष याग चालू होत आहे. यागाची सिद्धता पूर्ण झाल्यावर वातावरणात चैतन्य निर्माण झाल्याचे शिष्य आणि भक्त यांनी अनुभवले.

दत्तयागासाठी प.पू. प्रसाद महाराजांचे २७ मे या दिवशी पुणे येथे आगमन झाले. आगमनाच्या वेळी फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. या वेळी ५ सुवासिनींनी त्यांचे औक्षण केले. कार्यक्रमानिमित्त प.पू. प्रसाद महाराज यांचा ३ दिवस पुणे येथे मुक्काम असणार आहे. त्यांच्यासमवेत पांडुरंगाच्या पूजेमधील मूर्ती असणार आहे.
|
मंत्रोच्चाराने यागाला होणार आरंभ
या दत्तयागासाठी विविध राज्यांतून प्रकांड पंडित आणि वेदज्ञ ब्राह्मण आले असून ते यागाचे पौरोहित्य करणार आहेत. अमळनेर संस्थानचे मुख्य पुरोहित श्री. केशव पुराणिक यांसह श्री. पुष्कर जोशी, श्री. सारंग पाठक, श्री. प्रशांत जोशी, श्री. अभय जोशी, श्री. वासुदेव एडकी असे २५ पुरोहित पौरोहित्य करणार आहेत. सोहळ्याचा आरंभ शास्त्रोक्त पद्धतीने यज्ञ संकल्प, तसेच आवश्यक धार्मिक विधी, प्रायश्चित्त अशा विधींनी होणार आहे. यासाठीची सर्व सिद्धता पूर्ण करण्यात आली असून प्रत्येक दिवशी ३६ यजमान यज्ञासाठी बसणार आहेत.
धार्मिक विधी, मार्गदर्शन आणि सामूहिक हरिपाठ
पहाटेच्या सत्रात स्नान-संध्या आणि भावपूर्ण तुळशी अर्चन झाल्यानंतर, मुख्य यज्ञकुंडात समिधा अर्पण करून यज्ञाचा मुख्य विधी चालू होईल. दुपारच्या सत्रात प.पू. प्रसाद महाराज यांचे आशीर्वचनपर मार्गदर्शन होणार आहे. सायंकाळी सुश्राव्य प्रवचन आणि सामूहिक हरिपाठ होईल. दोन्ही वेळेच्या कार्यक्रमांच्या समाप्तीनंतर महाप्रसादाचा लाभही भक्तांना होणार आहे, अशी माहिती ‘अमळनेरकर महाराज सेवा संघ, पुणे’ येथील ज्येष्ठत्व असणारे श्री. अतुल पुजारी यांनी दिली.
‘प्रति पंढरपूर’ म्हणून ओळखले जाणारे श्री संत सखाराम महाराज संस्थान !
अमळनेर (जिल्हा जळगाव) येथील ‘श्री संत सखाराम महाराज संस्थान’ हे वारकरी संप्रदायाचे एक पवित्र तीर्थक्षेत्र असून ते ‘प्रति पंढरपूर’ म्हणून ओळखले जाते. बोर नदीच्या काठी वसलेले हे स्थान, संत सखाराम महाराज यांच्या समाधी आणि त्यांच्या प्रगल्भ भक्तीपरंपरा यांच्यासाठी (विशेषतः वैशाख शुक्ल एकादशी यात्रा) प्रसिद्ध आहे. भाविकांची श्रद्धा आहे की, वैशाख शुक्ल एकादशीला प्रत्यक्ष पंढरपूरचे पांडुरंग महाराज भेटीसाठी येथे येतात; म्हणून याला ‘प्रति पंढरपूर’ म्हणतात. संत सखाराम महाराज, बाळकृष्ण महाराज आणि प्रल्हाद महाराज यांच्या समाधी बोर नदीच्या पात्रात आहेत. प.पू. सखाराम महाराजांनी कान्हादेशात वारकरी संप्रदायाचा प्रसार केला. ही परंपरा प्रपंच आणि परमार्थ यांचा समतोल शिकवते. वैशाख महिन्यात येथे मोठी यात्रा भरते.
विज्ञान आणि अध्यात्म यांचा सुवर्णसंगम असलेले प.पू. प्रसाद महाराज !
श्री. श्रेयस विजय कुलकर्णी आणि सौ. भाग्यश्री भागवत यांनी प.पू. प्रसाद महाराजांचे अलौकिक व्यक्तीमत्त्व अन् त्यांची शिकवण यांचा घेतलेला वेध !
१. विज्ञान आणि अध्यात्माची उत्कृष्ट जोड !
अध्यात्माला धरून विज्ञानात कसे जावे ? हे महाराज अचूक सांगतात. एकविसाव्या शतकातील आधुनिक तरुणांना नेमके काय हवे आहे ? हे ओळखून ते त्यांना त्यांच्याच भाषेत मार्गदर्शन करतात. महाराज स्वतः कठोर नियम पाळतात, तरीही त्यांचे विचार कालबाह्य नसून पूर्णपणे वैज्ञानिक आणि काळाशी सुसंगत आहेत.
२. गृहस्थाश्रमात सहज साधना !
सहज सोपी साधना सांगणे आणि ती स्वतःच्या आचरणात आणणे, हे महाराजांचे मुख्य वैशिष्ट्य आहे. आपण ज्या आश्रमात आहोत, त्या आश्रमातील नियम पाळणे आणि त्यानुसार प्रामाणिकपणे वागणे म्हणजेच खरे अध्यात्म, हा मोलाचा मंत्र त्यांनी आम्हाला दिला. गृहस्थाश्रमात राहूनही अध्यात्म कसे जगावे ? याचा वस्तूपाठ त्यांनी घालून दिला आहे.
३. ज्ञानेश्वरी जगणे !
आयुष्यातील संकटांना धैर्याने सामोरे जाण्याची अभूतपूर्व शक्ती महाराजांच्या सान्निध्यातून मिळते. त्यांच्या चरणांशी बसले की, मनाला अलौकिक शांतता लाभते. केवळ ग्रंथ किंवा पोथ्या यांचे पाठांतर आणि पारायण करून चालत नाही, तर ते तत्त्वज्ञान स्वतःच्या दैनंदिन आयुष्यात आचरणात आणणे आवश्यक आहे, हे महाराजांनी स्वतःच्या कृतीतून दाखवून दिले आहे. ते प्रतिदिन ज्ञानेश्वरीच्या ५ ओव्या वाचल्याविना अन्नाचा एक कणही पोटात घेत नाहीत. यालाच खर्या अर्थाने ‘ज्ञानेश्वरी जगणे’, असे म्हणतात.
४. पंढरपूरची प्रदक्षिणा आणि गुरुकृपेची ‘भागीरथी’ !
महाराजांची साधना आणि त्यांच्याकडून मिळणारा अनुग्रह हा भक्तांसाठी जीवनकल्याणाचा मार्ग ठरतो. पंढरपूरमध्ये असतांना महाराज पहाटे ३.३० वाजता नगर प्रदक्षिणेसाठी निघतात. तिथल्या सत्पुरुषांच्या समाधींचे आणि चंद्रभागेचे दर्शन घेऊन परतल्यावर महाराजांचे स्नान, संध्या आणि आन्हिक विधी पार पडतात. देवाच्या मूर्तीला पंचामृताचा अभिषेक, पोशाख आणि अलंकार चढवून झाल्यावर महाराज मनोभावे फुले वहातात. महाराजांच्या आचमनासाठी तिथे पंचनद्यांचे स्रोत आहेत. पूजेनंतर महाराज जेव्हा देवाचा आशीर्वादाचे तीर्थ भक्तांवर शिंपडतात, ती आमच्यासाठी ‘भागीरथी’ (गंगा) ठरते. आम्हाला आयुष्यात इतर काहीही मिळाले नाही, तरी चालेल; पण ती पवित्र भागीरथी लाभावी याच अट्टहासाने आम्ही विशेषकरून पुण्याहून पंढरपूरला धाव घेतो. गुरूंच्या खडतर साधनेतून त्या भागीरथीच्या रूपाने आम्हांला त्यांच्या आशीर्वादाचा पवित्र कण मिळतो. महाराजांच्या पंचपात्रातील तीर्थ जेव्हा ते स्वतःच्या हाताने आम्हाला देतात, तो आमच्यासाठी त्यांच्या साधना आणि कृपा यांचा सर्वोच्च महाप्रसाद असतो.
मुख्य आरोपींवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करणार !
श्री महालक्ष्मीदेवी विकास आराखडा : प्राथमिक सर्व्हेक्षण पूर्ण !
केतन अग्रवाल हत्या प्रकरणात अधिवक्ता उज्ज्वल निकम यांची नियुक्ती !
घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार अटक !
ठाणे जिल्ह्यात पाणीटंचाई; शासन दीर्घकालीन उपाययोजना करणार ! – मेघना साकोरे-बोर्डीकर, राज्यमंत्री
आद्यगोरक्षक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिकृतीचे पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या हस्ते अनावरण !