‘हिंदु आणि राष्ट्र हितैषी’ सदर !
![]()
१.‘हिंद रक्षक’ संघटनेची स्थापना
‘हिंदु धर्मावरील आघात दूर करण्यासाठी वर्ष १९९८ मध्ये माझे वडील (दिवंगत) लक्ष्मणसिंह गौड यांनी त्यांच्या काही युवा सहकार्यांच्या साहाय्याने ‘हिंद रक्षक’ संघटनेची स्थापना केली. त्यांनी ‘राष्ट्र, धर्म आणि संस्कृती यांचा पहारेकरी !’, अशी या संघटनेची घोषणा बनवली. ‘युवकांना राष्ट्र, धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणार्थ पहारेकर्याच्या रूपात सिद्ध करणे’, हा या संघटनेचा मूळ उद्देश आहे. या संघटनेच्या माध्यमातून वर्षभर विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवले जातात, तसेच हिंदु धर्मावरील आघातांच्या विरोधात मोहीम राबवली जाते.
२. रंगपंचमीच्या दिवशी ‘राधा-कृष्ण फाग यात्रे’चे भव्य आयोजन

इंदूर (मध्यप्रदेश) येथे रंगपंचमीला अत्यंत बिभत्स स्वरूप आले होते. चिखलाने होळी खेळणे, एकमेकांचे कपडे फाडणे, महिलांकडे पाहून अत्यंत अश्लील हातवारे करणे, वयस्करांचे धोतर ओढणे, अशी हुल्लडबाजी या वेळी केली जात असे. त्यामुळे या पवित्र सणालाही महिला आणि वयस्कर मंडळी घराबाहेर पडण्यास घाबरत होती. वर्ष १९९१ मध्ये (दिवंगत) लक्ष्मणसिंह गौड यांनी हे विकृत स्वरूप बंद करून या उत्सवाला मूळ स्वरूप देण्याचे ठरवले. त्यांनी त्यांच्या मित्रांसमोर एक संकल्पना मांडली, ‘या उत्सवात भगवान श्रीकृष्णाचा एक रथ असेल. त्यामध्ये श्रीकृष्णाची मूर्ती विराजमान असेल. या रथाला हिंदु महिला ओढत चालतील. यात मुलांपासून वडीलधारी मंडळींपर्यंत सर्वजण सहकुटुंब सहभागी असतील. सर्व वयोगटातील महिला, पुरुष आणि युवा यांनी निर्भय होऊन पारंपरिक धार्मिक स्वरूपात हा उत्सव साजरा करावा.’
या कल्पनेविषयी त्यांचे काही सहकारी साशंक होते. त्यांना हे अशक्यप्राय वाटत होते; पण माझे वडील तो उत्सव करण्यावर सहकुटंब करण्यास ठाम होते. त्यामुळे सर्वांनी त्यांच्यासह येण्याचे मान्य केले. त्यानुसार रंगपंचमीच्या दिवशी श्रीकृष्णाची ‘रथयात्रा’ काढण्याचे निश्चित झाले. त्या वेळी मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार होते. त्यांनी या रथयात्रेला अनुमती नाकारली. ही रथयात्रा काढण्यासाठी पुष्कळ संघर्ष झाला. अनेक कार्यकर्त्यांना कारागृहात डांबण्यात आले. लोकांवर लाठीमार करण्यात आला आणि भगवान श्रीकृष्णाचा रथ मूर्तीसह जप्त करण्यात आला. सरकारची दडपशाही लोकांना आवडली नाही. संपूर्ण हिंदु समाज रस्त्यावर उतरला. शेवटी सरकारने गुडघे टेकले आणि रंगपंचमीला निघणार असणारी ‘राधा-कृष्ण फाग यात्रा’ रंगपंचमीनंतर ५ दिवसांनी मोठी वाजतगाजत निघाली. वर्ष १९९१ पासून चालू झालेल्या या यात्रेमागे एवढा खडतर संघर्ष आहे. या यात्रेत अनुमाने २५ सहस्रांहून अधिक महिला आणि दीड लाखांहून अधिक बांधव सहकुटुंब सहभागी होतात. संपूर्ण माळवा भागात साधारणतः ५० हून अधिक ‘राधा-कृष्ण फाग यात्रा’ निघतात. आज साधारण २ सहस्रांहून अधिक ठिकाणी ‘फाग उत्सव’ (फाल्गुन उत्सव) साजरे होत आहेत.
३. गरीब निर्धन मुलांसाठी ‘पुण्योदय प्रकल्प’
‘हिंद रक्षक संघटना’ ११ जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीत ‘पुण्योदय प्रकल्प’ राबवते. या माध्यमातून आम्ही सरकारी शाळांमध्ये शिकणार्या गरीब निर्धन मुलांना पाठ्यपुस्तक उपलब्ध करून देतो. अनुमाने ६० सहस्र गरीब विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी ३ लाख पाठ्यपुस्तक वितरीत करतो. या कार्यासाठी समाजातून चांगला प्रतिसाद मिळतो. मुलांना याचे महत्त्व समजावे आणि त्यांचा स्वाभिमानही जिवंत रहावा, यासाठी आम्ही या पाठ्यपुस्तकांचे १ रुपया सांकेतिक शुल्क घेतो. देशात अनेक थोर पुरुष होऊन गेले. त्यांची ओळख मुलांना व्हावी, यासाठी त्या पाठ्यपुस्तकाच्या मुखपृष्ठावर महापुरुषांची चित्रे आणि संक्षिप्तपणे चरित्र छापलेले असते. त्या माध्यमातून मुलांपर्यंत थोर पुरुषांची माहिती मुलांपर्यंत पोचवतो.
४. हिंद रक्षक गरबा महोत्सव
सध्या नवरात्रोत्सवात पुष्कळ विकृती शिरली आहे. गरब्यात ‘डिस्को दांडिया’वर नृत्य होत आहेत आणि देवीच्या उत्सवाच्या नावावर अयोग्य गोष्टी घडत आहेत. हे लक्ष्मणसिंह गौड यांना पहावले नाही. त्यांनी वर्ष १९९९ पासून ‘हिंद रक्षक गरबा महोत्सव’ आरंभ केला. हा गरबा संपूर्ण पारंपरिक वेशात खेळला जातो. हा कार्यक्रम धार्मिक आणि पारंपरिक गरबा गीतांवर होतो. यात अनुमाने २० ते २५ सहस्र हिंदु सहकुटुंब सहभागी होतात.
५. हिंदूंचे धर्मांतर थांबवण्यात यश
प.पू. स्वामी प्रणवानंद हे वनवासी क्षेत्रात दीर्घकाळापासून कार्य करत आहेत. झाबुआ हा मध्यप्रदेशातील एक आदिवासीबहुल जिल्हा आहे. तेथे ख्रिस्त्यांकडून अत्यंत जोरात धर्मांतर चालू होते. तेथे पाण्याचे दुर्भिक्ष असल्यामुळे तो भाग मागासलेला होता. त्याचा अपलाभ ख्रिस्ती प्रचारकांनी घेतला. तेथे त्यांनी तांदुळ, मद्य, औषधे, वैद्यकीय औषधोपचार इत्यादी गोष्टींचे प्रलोभन दाखवून हिंदूंचे धर्मांतर केले. काही ठिकाणी संपूर्ण गावांचे धर्मांतर केले. याविरोधात ‘हिंद रक्षक संघटना’ आणि ‘शिवगंगा’ यांनी संयुक्तपणे धर्मांतर थांबवण्यासाठी कार्य केले. वर्ष २००४ आणि वर्ष २००६ मध्ये ‘हिंद रक्षक’ संघटनेने प.पू. अवधेशानंद महाराज यांच्या उपस्थितीत इंदूरमध्ये २ वेळा कथा प्रवचने आयोजित केली. पहिल्या कथेच्या वेळी १३१ शिवलिंग आणि दुसर्या कथेच्या वेळी १ सहस्र १०० शिवलिंग स्थापन केली. अशा प्रकारे १ सहस्र २३२ गावांमध्ये शिवालये स्थापन करण्यात आली. या माध्यमातून तेथील धर्मांतर थांबवण्यात पूर्ण यशस्वी झालो.
६. पाण्याचे दुर्भिक्ष दूर करण्यासाठी जलाशय निर्मिती
साधारणपणे ५०० हून अधिक गावांमध्ये मोठमोठे जलाशय, तर काही ठिकाणी तलाव बांधले. त्यामुळे गावांमध्ये पाणी पोचले. परिणामी गावांमधून होणारे स्थलांतर थांबले. आता गावातील लोक शेतीसह पशूपालन करू लागले आहेत. काही गावांमध्ये शिव, हनुमान किंवा श्रीराम यांविषयी माहितीच नव्हती. तेथे ‘शिवगंगा’ आणि ‘हिंद रक्षक’ या संघटनांनी कावड यात्रा काढणे चालू केले. गणेशोत्सव आणि कथावाचन यांचे आयोजन करण्यात आले. वर्ष २००८ मध्ये ‘हिंद रक्षक’ संघटनेने १ सहस्र १०० कुंडी सहस्र ज्योती चंडी महायज्ञाचे आयोजन केले. त्या यज्ञाच्या माध्यमातून आम्ही हिंदु समाजातील विविध जातींच्या १ सहस्रांहून अधिक लोकांना सहभागी करून घेतले. अशा प्रकारे सर्व समाजातील लोक जातीभेद विसरून त्या यज्ञाला बसले.
– श्री. एकलव्यसिंह गौड, संयोजक, ‘हिंद रक्षक’ संघटना.
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
‘सनातन क्रांती’ची नांदी !
छत्रपती संभाजी महाराजांचे ईश्वरनिष्ठ मन !
हिंदु धर्मरक्षणार्थ बलीदान देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज !
मनुष्याचे शरीर, मन, चित्त आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
चित्रपटसृष्टीतील वलयांकित जगाच्या मोहाला न भुलता आयुष्यभर अविरतपणे नाट्यसेवा करणारे प्रामाणिक नाट्यकर्मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार !