१२ ज्योतिर्लिंगांपैकी प्रथम असलेल्या मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दिव्य अंश सनातन संस्थेला अर्पण !

तंजावर येथील वेदप्रचाररत्न वेदकुलपती जी.के. सीतारामन्गुरुजी यांनी मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या दिव्य अंशांपैकी ४ दिव्य अंश सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी केले अर्पण !

सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या ४ दिव्य अंशांचे रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात आगमन !

रामनाथी (गोवा) – ४ मे २०२६ या पवित्र दिनी सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या ४ दिव्य अंशांचे रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात आगमन झाले. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी आणलेल्या ४ शिवलिंगांचे साधकांनी केलेल्या भोलेनाथाच्या जयघोषात आणि वेदमंत्रोच्चारात भावपूर्ण आगमन झाले.

सनातनच्या आश्रमात आणलेल्या सोमनाथ शिवलिंगांसह श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी शिवलिंगांचे पूजन आणि औक्षण केले. यानंतर श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे ४ दिव्य अंश श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याकडे सुपुर्द केले. ज्योतिर्लिंगांचे पूजन झाल्यानंतर त्यामध्ये जडत्व, म्हणजेच चैतन्य आल्याचे श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना जाणवले, तर त्या वेळी उन्हाळा असूनही वातावरणात प्रत्यक्षात थंडावा जाणवत होता. यानंतर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांच्या निवासाच्या खोलीतच सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या ४ दिव्य अंशांचे दर्शन घेतले.

२ एप्रिल २०२६ या दिवसाचे एक वेगळे महत्त्व !

मूर्तीभंजक महंमद गझनी हा सोमनाथ ज्योतिर्लिंग तोडून अनेक दिवस प्रवास करत गझनीला पोचला तो दिवस म्हणजे १ एप्रिल १०२६. बरोबर १००० वर्षांनी, म्हणजे २ एप्रिल २०२६ या दिवशी सनातन संस्थेला सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दिव्य अंश लाभले. शिवशंकरानेच हा दिवस निवडला होता, यात संशय नाही !

– श्री. विनायक शानभाग

सनातनच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाणारा एक अद्वितीय क्षण !

श्री. विनायक शानभाग

भगवान सोमनाथ महादेवाच्या उदयाची कथा

‘दक्ष प्रजापतीला अश्विनीसह २७ कन्या होत्या. त्यांचा विवाह अत्री आणि अनसूया यांचा पुत्र सोम (चंद्र) याच्याशी झाला. त्या २७ कन्यांपैकी रोहिणी सर्वांत सुंदर होती. सोमचा तिच्यावर विशेष जीव होता. त्याचा हेवा वाटून इतर सवतींनी (सपत्नींनी) सोमविषयी त्यांचे वडील दक्ष यांच्याकडे तक्रार केली. दक्षाने सोमला समजावण्याचा प्रयत्न केला; पण त्याचा लाभ झाला नाही. वारंवार तक्रारी ऐकून संतप्त झालेल्या दक्षाने सोमला क्षयरोगाचा शाप दिला. परिणामी सोमची प्रकृती खालावू लागली. संपूर्ण निसर्गात त्याचे दुष्परिणाम दिसू लागले. त्यामुळे सर्व देवांनी सोमला शापातून मुक्त करण्याची विनंती केली. दक्षाने त्यांची विनंती नाकारून सुचवले, ‘प्रभास येथे सरस्वतीनदीचा समुद्राशी संगम झाला आहे. तेथे जाऊन सोमने भगवान शिवाची आराधना आणि तप:श्चर्या करावी.’ त्याप्रमाणे सोमने प्रभास येथे बराच काळ शिवाची आराधना केली. त्यामुळे भगवान शिव प्रसन्न झाले. त्यांनी सोमला एक वरदान दिले, ‘शुक्ल पक्षात सोमची वृद्धी होईल आणि तो प्रकाशमान राहील.’ अशा प्रकारे प्रभास येथे सोमला त्याचे तेज (भास) परत मिळाले. त्यामुळे ते ठिकाण ‘प्रभास’ म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी सोम याने एक मंदिर बांधून ज्योतिर्मय लिंगाची स्थापना केली.

स्कंद पुराणातील प्रभास खंडातील माहितीनुसार सोम याला स्पर्शलिंग समुद्रातून प्राप्त झाले होते. स्पर्शलिंगाचे वर्णन खालीलप्रमाणे आहे.’

सूर्यबिम्बसमप्राख्यं सर्पमेखलमण्डितम् ।
कुक्कुटाण्डसमानं तद् भूमिमध्ये व्यवस्थितम् ।। – स्कन्दपुराण, प्रभासखण्ड, अध्याय २१, श्लोक ८२

अर्थ : हे लिंग सर्व बाजूंनी सर्पांनी वेढलेले आणि सूर्यबिंबाप्रमाणे अत्यंत तेजस्वी होते. ते कोंबडीच्या अंड्याच्या आकाराचे होते आणि भूमीच्या मध्यभागी स्थित होते.’ (साभार : ‘प्रभासतीर्थ दर्शन सोमनाथ’ या ग्रंथातून)

हनुमान जयंतीच्या पावन दिनी सीतारामन् यांनी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे ४ दिव्य अंश कायमस्वरूपी देणे

सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे ४ दिव्य अंश पूजेनंतर श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडे सुपुर्द करतांना वेदकुलपती सीतारामन्

हनुमान जयंतीच्या पावन दिनी (२ एप्रिल २०२६ या दिवशी) तमिळनाडूतील तंजावर येथे श्री. सीतारामन्गुरुजी यांच्याकडे श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे ४ दिव्य अंश घेण्यासाठी पोचल्या. गुरुजींनी त्यांच्या घरी वेदमंत्रोच्चाराने देवघरात पूजा करून श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना ज्योतिर्लिंग दिले. या वेळी त्यांचा मुलगा वेदमूर्ती नरसिंहन् सीतारामन् हेही उपस्थित होते. – श्री. विनायक शानभाग

१. महंमद गझनीने तुकडे केलेल्या सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे अंश श्रद्धावान पुजार्‍यांनी १ सहस्र वर्षांपर्यंत जपणे

भारतातील पवित्र अशा १२ ज्योतिर्लिंगांमधील गुजरात येथील सोमनाथ ज्योतिर्लिंग हे पहिले शिवलिंग मानले जाते. चंद्राने स्थापित केलेल्या या दैवी शिवलिंगाचे वैशिष्ट्य, म्हणजे ते भूमीपासून काही उंचीवर अधांतरी होते. त्याच्यात प्रचंड सकारात्मक आध्यात्मिक ऊर्जा असून त्याचा लाभ शिवभक्तांना होत असे. वर्ष १०२६ मध्ये क्रूर आक्रमणकर्ता महंमद गझनी याने या सोमनाथ मंदिरावर आक्रमण केले. त्याने मंदिर उद्ध्वस्त करून त्यातील या शिवलिंगाचे तुकडे केले. काही श्रद्धावान पुजार्‍यांनी त्या भग्नावस्थेतील शिवलिंगाच्या अवशेषांतील काही अंश अत्यंत गुप्ततेने सुरक्षित ठेवले. ते शिवलिंगाच्या भग्नावस्थेतील या अंशांना तुकड्यांच्या स्वरूपात पाहू शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी त्या अंशांना साधारणतः शिवपिंडीसारखे दिसणारे लंबगोल आकार दिले. याच श्रद्धावान पुजार्‍यांनी १ सहस्र वर्षांपर्यंत समस्त भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या या शिवलिंगाचे दिव्य अंश एका गुप्त स्थानी सुरक्षित ठेवले. त्यांनी प्रसंगी स्वतःच्या प्राणांची आहुती देऊनही त्यांचे रक्षण केले. पुढे त्यांच्या प्रत्येक पिढीने ते जतन केले आणि हे रहस्यही कायम जपले.

२. कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती यांनी १०० वर्षे ज्योतिर्लिंगाचे दिव्य अंश जपून ठेवण्यास सांगणे

वर्ष १९२४ मध्ये कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती यांनी सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या दिव्य अंशांचे जतन करणार्‍या पुजार्‍यांना ‘हे दिव्य अंश १०० वर्षे बाहेर (समाजात) आणू नका आणि कुणालाही याविषयी सांगू नका’, असे सांगितले होते. त्यानंतरचे कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांनी ‘पवित्र ज्योतिर्लिंगाच्या या साकारलेल्या दैवी अंशांविषयी अयोध्येचे श्रीराममंदिर साकार झाल्यावर विचार करूया’, असे सांगितले.

तंजावरहून कांचीपूरम्ला शिवलिंग नेतांना घडलेल्या काही महत्त्वाच्या घडामोडी

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

१. २ एप्रिल २०२६, म्हणजे हनुमान जयंती या दिवशी पौर्णिमा होती. चारचाकी वाहनांतून सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दिव्य अंश नेतांना ‘पौर्णिमेचा चंद्र हळूवारपणे गाडीत डोकावून पहात आहे’, असे दृश्य दिसत होते.

२. शिवलिंग नेत असलेल्या गाडीला मोठा अपघात होता होता सर्व जण वाचले. आमच्या आतापर्यंतच्या दौर्‍याच्या कालावधीत या आधी असे कधीच झाले नव्हते. श्रीगुरूंनी आणि सोमनाथाने आमचे रक्षण केले.

३. कांचीपूरम् हे भूकैलास आहे. सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे अंश १ मास भूकैलासात राहिले जणू काही शिव त्याच्या स्वस्थानाला आला होता.

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, कांचीपूरम्, तमिळनाडू.

३. जगद्गुरु शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती यांनी शिवलिंगाचे अंश श्री श्री रविशंकर यांच्याकडे देण्यास सांगणे आणि अयोध्येत श्रीराममंदिर उभारल्यानंतर ते दर्शनासाठी उपलब्ध होणे

आताचे जगद्गुरु शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती यांनी ‘शिवलिंगाचे हे अंश गुरुदेव श्री श्री रविशंकर (‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ या संस्थेचे संस्थापक) यांच्याकडे द्या’, असे सांगितले. त्याप्रमाणे श्रद्धावान पुजार्‍यांच्या कुटुंबातील अग्निहोत्री श्री. सीतारामन्गुरुजी यांनी या ज्योतिर्लिंगापैकी काही दैवी अंश गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्याकडे दिले. जगद्गुरु शंकराचार्य श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती यांच्या संकल्पानुसार बरोबर १०० वर्षांनी त्यांनी सांगितल्यानुसार घडले. ज्योतिर्लिंगांच्या या अंशांमध्ये पुष्कळ ऊर्जा असून त्यामुळे सभोवताली सर्वत्र चुंबकीय क्षेत्र निर्माण झाले आहे. श्री श्री रविशंकर यांनी ज्योतिर्लिंगाच्या या दिव्य अंशांचे आध्यात्मिक महत्त्व आणि सामर्थ्य ओळखले. त्यांनी वर्ष २०२५ मध्ये महाशिवरात्रीला या दिव्य अंशांना अभिषेक करून भक्तांच्या दर्शनासाठी उपलब्ध करून ते दिले.

– श्री. विनायक शानभाग, कांचीपूरम्, चेन्नई. (१२.५.२०२६)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.