‘साधना म्हणजे आपले प्रत्येक कृतीतून दिसून येणारे सुसंस्कारित आचरण ! त्याला ‘साधनेचे संस्कार करणे’, असे म्हणतात. मानवावरील सुसंस्कार हा साधनेचा पाया आहे. तो नसेल, तर आपण ईश्वरापर्यंत जाऊ शकत नाही. आई-वडिलांनी आपल्या मुलावर सुसंस्कार केले असतील, तर त्या मुलाला साधना करणे सहज शक्य होते आणि तो ईश्वरप्राप्तीच्या दिशेने जलद गतीने जाऊ शकतो.
सुसंस्कारांमध्येच धर्माचरण, सात्त्विकता, इतरांचा विचार करणे, इतरांचा आदर करणे आणि इतरांचे आज्ञापालन करणे, तसेच धर्माभिमानही आहे. सुसंस्कारित व्यक्तीमध्ये स्वभावदोष आणि अहं हे दोन्ही अल्प असतात; म्हणून अशी व्यक्ती ईश्वराची उपासना सहजतेने करू शकते. सुसंस्कारित व्यक्ती केवळ स्वतःचा विचार न करता समाजाचाही विचार करते आणि पुढे देशाचाही विचार करते. त्यामुळे अशी व्यक्ती व्यष्टी साधना आणि समष्टी साधना, म्हणजे समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करू शकते. एका सुसंस्कारित व्यक्तीमुळे अनेक सुसंस्कारित व्यक्ती घडतात, त्या व्यक्तींमुळे समाज सुसंस्कारित होतो आणि पुढे देशही सुसंस्कारित होतो. असे होणे, हीच हिंदु राष्ट्राची, म्हणजे रामराज्याची संकल्पना आहे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना केवळ साधना शिकवली नाही, तर त्यांना सुसंस्कारित केले.
पूर्वार्ध

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची संस्कार आणि साधना शिकवणारी पहिली शाळा म्हणजे मुंबईतील त्यांचे घर !
वर्ष १९९१ पासून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मुंबईतील घरी साधक सेवा करण्यासाठी येऊ लागले. घरी येत असलेल्या साधकांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी आई-वडील जसे स्वतःच्या मुलांना वळण लावतील, तसे वळण लावले. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

१ अ. सेवेसाठी आलेल्या साधकाचे आदरातिथ्य करणे : सेवेसाठी येणारे साधक सायंकाळी नोकरी करून दमून-भागून येत असत. त्यामुळे त्यांना प्रथम बसायला सांगून पाणी देणे, त्यांची विचारपूस करणे, त्यांना खायला-प्यायला देणे अशा प्रकारे त्यांचे आदरातिथ्य स्वतः सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले करत. सेवा करून साधक परत जात असतांना त्यांना जिन्यापर्यंत सोडायला जाणे आणि स्मित हास्याने त्यांना निरोप देणे, असेही ते करत. त्यामुळे त्यांची साधकांशी आपोआपच जवळीक होत असे. आपल्या आचरणातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना घडवले.
१ आ. प्रत्येक साधकाला त्याच्या साधनेला पूरक अशी सेवा देणे आणि ती सेवा तो सेवेसाठी येण्याआधीच सिद्ध ठेवणे : सेवेसाठी आलेल्या साधकाच्या दृष्टीने योग्य अशी, म्हणजे त्याच्या साधनेला पूरक अशी सेवा ते साधकाला देत. ती सेवा साधक घरी यायच्या आधीच सिद्ध ठेवत. त्यामुळे साधकांचे १ मिनिटही वाया जात नसे. ‘दुसर्याचा वेळ बहुमूल्य आहे आणि तो वाया घालवू नये’, ही शिकवण सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना दिली.
१ इ. साधकांच्या सेवेतील सात्त्विकता, गुणवत्ता, फलनिष्पत्ती इत्यादी गोष्टींकडे लक्ष देणे : प्रत्येक साधक करत असलेल्या सेवेकडे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे बारकाईने लक्ष असे. ‘साधक सेवा सात्त्विकतेने करत आहे ना ? कुठल्याही अडचणीमुळे त्याचा वेळ वाया जात नाही ना ? पूर्ण गुणवत्तेने आणि फलनिष्पत्तीने सेवा होत आहे ना ?’ इत्यादी गोष्टींकडे त्यांचे लक्ष असे. साधकांचे काही चुकत असल्यास सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले वेळच्या वेळी त्यांना त्याविषयी सांगत.
१ ई. सेवेतील सात्त्विकता आणि भाव यांचे महत्त्व साधकांच्या लक्षात आणून देणे अन् त्याविषयी सूक्ष्मातील प्रयोगही करून घेणे : सेवा भावपूर्ण करण्याचे महत्त्वही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना सांगत. ‘साधकाने केलेल्या सेवेकडे पाहून सूक्ष्मातून काय जाणवते ?’, याचा प्रयोगही ते सर्वांकडून करून घेत. यामुळे साधकांमध्ये सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता निर्माण झाली आणि सेवेतील सात्त्विकता अन् भाव यांचे महत्त्वही साधकांच्या लक्षात येऊ लागले. तशी सेवा करणार्या साधकाचे ते कौतुक करून त्याला प्रोत्साहन देत.
१ उ. कर्तेपणामुळे, म्हणजे अहंमुळे सेवेवर होणार्या परिणामाची जाणीव करून देणे : ‘सेवेमध्ये कर्तेपणा, म्हणजे अहं असेल, तर सेवेवर कसा अयोग्य परिणाम होतो’, हेही ते दाखवून देत. तसेच अहं असलेल्या साधकाला त्याची जाणीव करून देत. त्यामुळे त्या साधकाला स्वतःतील अहं न्यून करण्यासाठी प्रयत्न करता येत असत. पुनःपुन्हा सांगूनही साधक तसेच वागत असेल, तर त्याला प्रायश्चित्तही घ्यायला सांगत.
१ ऊ. समष्टी साधनेसाठी आवश्यक असलेला सांघिक भाव आणि एकमेकांविषयी आपुलकी साधकांमध्ये निर्माण करणे : ‘साधकाला दुसरा साधक करत असलेली सेवाही ‘आपली सेवा’ वाटली पाहिजे आणि दुसर्या साधकाला साहाय्य करण्याची वृत्ती जोपासली पाहिजे’, ही शिकवणही ते साधकांना देत. यामुळे सांघिक भाव आणि एकमेकांविषयी आपुलकी साधकांमध्ये निर्माण होत असे. समष्टी साधना करतांना हा गुण महत्त्वाचा असतो.
१ ए. इतरांचा विचार करण्याची वृत्ती निर्माण करणे : सुटीच्या दिवशी दिवसभरासाठी आलेले साधक दुपारी विश्रांती घेत. ‘एखादा साधक झोपला असेल, तर त्या खोलीत आवाज करू नये, तसेच आवश्यक नसल्यास त्या साधकाला मुद्दाम उठवू नये’, असे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना सांगत. यावरून इतरांचा विचार करण्याची वृत्ती ते साधकांमध्ये निर्माण करत.
१ ऐ. कागद, वीज, पाणी, पैसा इत्यादींचा योग्य आणि काटकसरीने वापर करण्याची सवय लावणे : तेव्हा संगणक एक – दोनच होते. त्यामुळे लिखाण कागदावर करावे लागे. त्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले पाठकोरे कागद वापरत. तसेच दुकानाची बिले, पत्रके इत्यादींची पाठकोरी बाजू ते लिखाणासाठी वापरत. यावरून त्यांनी साधकांमध्ये ‘काटकसर करणे’, हा गुण रुजवला. तसेच ‘जेवण वाढून घेतांना आधी शिळे अन्न संपवावे आणि त्यानंतर ताजे अन्न घ्यावे’, असे ते सांगत. यावरून ‘अन्न वाया घालवू नये’, ही शिकवणही त्यांनी साधकांना दिली. कागद, वीज, पाणी, पैसा इत्यादींचा योग्य वापर करण्याची सवय त्यांनी साधकांना लावली.
१ ओ. साधकांचा बारकाईने विचार करणे : साधकांची आवड-नावड जाणून ते साधकांना खाऊ देत. ज्यांना गोड आवडते, त्यांना गोड आणि ज्यांना तिखट आवडते, त्यांना तिखट पदार्थ देत. दिवाळीला ते साधकांना कपडे शिवायला कापड आणि शिलाईसाठी पैसेही देत. अशा प्रकारे ते साधकांचा बारकाईने विचार करत.
असे अनेक संस्कार त्यांनी साधकांवर केले. हे संस्कार साधकांमध्ये रुजण्यासाठी त्यांनी सातत्याने आणि चिकाटीने प्रयत्न केले.
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ फोंडा, गोवा. (११.५.२०२६)
सुसंस्कारित व्यक्तीच इतरांना सुसंस्कारित करू शकते !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे वडील श्री. बाळाजी वासुदेव आठवले आणि आई सौ. नलिनी बाळाजी आठवले हे दोघेही पुढे संतपदाला पोचले. यावरून ‘शुद्धबिजा पोटी । फळे रसाळ गोमटी’ (तुकारामगाथा, अभंग ३७, ओवी १) या संतवचनाची प्रचीती येते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांचे ४ भाऊ यांच्यावर त्यांच्या आईवडिलांनी लहानपणापासूनच सात्त्विकता आणि साधना यांचे संस्कार केले; म्हणून ते सर्व जण साधनारत झाले. अशा सात्त्विक आई-वडिलांकडून त्यांचे गुण आपोआपच त्यांच्या मुलांमध्ये येतात. कुटुंबातील सर्व जण सात्त्विक असल्यामुळे एकमेक एकमेकांचे गुण घ्यायला शिकतात. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर सात्त्विकता, साधना आणि आदर्श व्यक्तीमत्त्व यांचे संस्कार झाल्यामुळे त्यांनी तसेच संस्कार त्यांच्या संपर्कात आलेल्या साधकांवर प्रत्यक्ष केले आणि तशी शिकवणही दिली.
२. वर्ष २००० ते २००४ या कालावधीत फोंडा, गोवा येथील ‘सुखसागर’ सेवाकेंद्रात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना मुख्यत्वे आचारधर्म शिकवणे

२ अ. ‘सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आचारधर्मात सांगितलेल्या कृती कशा करायच्या आणि त्यांमागील शास्त्र काय ?’, हे शिकवणे अन् ती माहिती ग्रंथांद्वारे समाजापर्यंत पोचवणे : गोव्यातील फोंडा येथील ‘सुखसागर’ या सेवाकेंद्रात ४० ते ५० साधक पूर्ण वेळ राहून साधना करत. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सेवाकेंद्रातील साधकांना हिंदु धर्मातील आचारधर्माचे पालन करणे शिकवले. ‘सकाळी उठल्यावर दात कोणत्या बोटाने घासावेत ? केर कसा काढावा ? कपडे कसे वाळत घालावे ? स्त्री आणि पुरुष यांची केशरचना कशी हवी ? कपडे सात्त्विकतेच्या दृष्टीने कसे हवेत ? ताटात पदार्थ कसे वाढावेत ? येथपासून ते रात्री झोपतांना डोके कोणत्या दिशेला हवे ?’ येथपर्यंत सर्व गोष्टी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितल्या. अशा प्रकारे कृती करण्यामागील हिंदु धर्मातील शास्त्र काय ? याचे ज्ञान मिळवण्यासाठी त्यांनी सूक्ष्मातील ज्ञान प्राप्त करणार्या साधकांना विविध प्रश्न दिले. यातून मिळालेली उत्तरे त्यांनी पडताळली. या ज्ञानावर आधारित ग्रंथ त्यांनी साधक आणि समाज यांच्यासाठी प्रकाशित केले.
२ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सेवाकेंद्रातील साधकांचा प्रत्येक आठवड्यात एक सत्संग घेऊन साधकांना चुका सुधारण्यासाठी मार्गदर्शन करणे, तसेच चांगली कृती करणार्यांचे कौतुकही करणे : आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सेवाकेंद्रातील साधकांचा सत्संग घेत. त्यामध्ये आठवडाभरात साधक स्वतःकडून झालेल्या चुका किंवा अन्य साधकांच्या चुका सांगत. तसेच साधक अन्य साधकांच्या काही चांगल्या गोष्टी लक्षात आल्यास त्याही सांगत. चुका पुन्हा होऊ नयेत, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले मार्गदर्शन करत, तसेच चांगल्या कृती करणार्यांचे कौतुकही करत. त्यामुळे सर्व साधकांना स्वतःतील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यामध्ये, तसेच गुणवृद्धी करण्यामध्ये साहाय्य होत असे.
२ इ. ‘हिंदु संस्कृती आणि सात्त्विकता यांचा निकष लावून सर्व गोष्टी कशा कराव्यात ?’, याची शिकवण सर्वांना देणे : आचारधर्मासमवेतच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी वेशभूषा, केशभूषा, अलंकार, भोजन इत्यादी विषयांवरही ग्रंथांची निर्मिती केली. त्यामुळे हिंदु संस्कृती आणि सात्त्विकता यांचा निकष लावून सर्व गोष्टी कशा कराव्यात ? याची शिकवण सर्वांना मिळाली.
२ ई. ‘हिंदु संस्कृतीच्या पालनाविषयी समाजात जागरूकता कशी असायला हवी आणि त्याविषयी समाजाचे प्रबोधन कसे करायचे ?’, हेही शिकवणे : अन्य वर्तमानपत्रांत उद्घाटनाच्या वेळी मेणबत्तीने दीपप्रज्वलन करून किंवा फीत कापून उद्घाटन केल्याचे, व्यासपिठावर बूट घालून एखादी व्यक्ती असल्याचे किंवा औक्षण न करता केक कापून वाढदिवस साजरा केल्याचे छायाचित्र छापून आल्यास त्याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये दृष्टीकोन छापायला ते साधकांना सांगत. यामुळे साधकांना ‘हिंदु संस्कृतीच्या पालनाविषयी जागरूकता कशी असायला हवी आणि त्याविषयी समाजाचे प्रबोधन कसे करायचे ?’, हे समजले. तसेच हिंदु सण साजरे करतांना समाजाकडून चुकीचे वर्तन होत असल्यास त्याविषयीही दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध करून समाजाला जाणीव करून द्यायला शिकवले. कुणी देवतांचे विडंबन करत असल्यास त्याविरुद्ध वैध मार्गाने आंदोलन करायलाही त्यांनी साधकांना शिकवले.
अशा प्रकारे ‘समाजात अध्यात्मप्रसार करतांना स्वतः आदर्श आणि धर्माभिमानी कसे बनायला हवे ?’, हे आणि स्वतः साधना करत असल्यावरच आपण दुसर्याला साधना करण्याविषयी सांगू शकतो, यांविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना शिकवले. ‘आधी स्वतः केले आणि मग दुसर्याला सांगितले’, ही वृत्ती त्यांनी साधकांमध्ये रुजवली.
या लेखाचा उर्वरित भाग येथे वाचा –> https://sanatanprabhat.org/marathi/1043168.html
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ (रसायनशास्त्रामधील पीएच्.डी., मुंबई विद्यापीठ), फोंडा, गोवा. (११.५.२०२६)
यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !