सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांमध्ये साधनेसह सुसंस्कार रुजवल्याने साधकांची जलद आध्यात्मिक उन्नती होणे

‘साधना म्हणजे आपले प्रत्येक कृतीतून दिसून येणारे सुसंस्कारित आचरण ! त्याला ‘साधनेचे संस्कार करणे’, असे म्हणतात. मानवावरील सुसंस्कार हा साधनेचा पाया आहे. तो नसेल, तर आपण ईश्वरापर्यंत जाऊ शकत नाही. आईवडिलांनी आपल्या मुलावर सुसंस्कार केले असतील, तर त्या मुलाला साधना करणे सहज शक्य होते आणि तो ईश्वरप्राप्तीच्या दिशेने जलद गतीने जाऊ शकतो. सुसंस्कारांमध्येच धर्माचरण, सात्त्विकता, इतरांचा विचार करणे, इतरांचा आदर करणे आणि इतरांचे आज्ञापालन करणे, तसेच धर्माभिमानही आहे. सुसंस्कारित व्यक्तीमध्ये स्वभावदोष आणि अहं हे दोन्ही अल्प असतात; म्हणून अशी व्यक्ती ईश्वराची उपासना सहजतेने करू शकते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सुसंस्कारित व्यक्ती केवळ स्वतःचा विचार न करता समाजाचाही विचार करते आणि पुढे देशाचाही विचार करते. त्यामुळे अशी व्यक्ती व्यष्टी साधना आणि समष्टी साधना, म्हणजे समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करू शकते. एका सुसंस्कारित व्यक्तीमुळे अनेक सुसंस्कारित व्यक्ती घडतात, त्या व्यक्तींमुळे समाज सुसंस्कारित होतो आणि पुढे देशही सुसंस्कारित होतो. असे होणे, हीच हिंदु राष्ट्राची, म्हणजे रामराज्याची संकल्पना आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना केवळ साधना शिकवली नाही, तर त्यांना सुसंस्कारित केले. या लेखातील काही सूत्रे आपण १७ मे या दिवशीच्या भागात पाहिली. येथे उर्वरित सूत्रे पाहूया.

या लेखाचा पूर्वार्ध येथे वाचा –> https://sanatanprabhat.org/marathi/1040824.html

४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना घडवण्याचे अथक प्रयत्न केल्याने साधकांची आध्यात्मिक उन्नती होत असणे

(सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना घडवण्याचे १० ते १५ वर्षे अथक प्रयत्न केल्यानेच वर्ष २००८ पासून साधकांची आध्यात्मिक पातळी वाढून प्रगती होतांना दिसू लागली. तोपर्यंत ४ साधक संतपदाला (७० टक्के आध्यात्मिक पातळीला) पोचले होते आणि त्या वर्षी ५० साधकांनी ६० टक्के आणि त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी गाठली. ६० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी गाठणे म्हणजे जन्म-मृत्यूच्या चक्रांतून मुक्त होणे. वर्ष २००८ नंतर प्रतिवर्षी संतपदी विराजमान होणार्‍या, तसेच ६० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी गाठणार्‍या साधकांची संख्या वाढतच गेली. अशा प्रकारे १ मे २०२६ पर्यंत १३८ साधकांनी संतपद गाठले आहे, तर १,०४९ साधकांनी ६० ते ६९ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे.

५. एक सुसंस्कारित व्यक्ती अनेक जणांना आपल्याप्रमाणे घडवू शकते, त्याप्रमाणे दायित्व सांभाळणारे संत आणि उन्नती केलेले साधक अन्य साधकांना घडवत असणे अन् त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना त्यामध्ये आता लक्ष घालावे लागत नसणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या समवेत  सनातन संस्थेचे उत्तर भारत धर्मप्रसारक आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे,  सनातनच्या मुंबई प्रभाग आणि गुजरात राज्य धर्मप्रसारक सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर,  सनातनच्या महाराष्ट्र राज्य धर्मप्रसारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि  विदर्भ अन् उत्तर महाराष्ट्र धर्मप्रसारक सद्गुरु नंदकुमार जाधव (५.७.२०१६)

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधना, सुसंस्कार आणि व्यापक समष्टी विचार या तिन्ही दृष्टींनी घडवलेले संत आणि ६० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी गाठलेले साधक मुख्य दायित्व घेऊन भारतभर व्यापक अध्यात्मप्रसार करत आहेत, तसेच सनातन संस्थेच्या विविध आश्रमांचेही दायित्व सांभाळत आहेत. विदेशातही अशाच गुणवत्तेचे संत आणि साधक अध्यात्मप्रसाराचे दायित्व सांभाळत आहेत. आधी सांगितल्याप्रमाणे एक सुसंस्कारित व्यक्ती अनेक जणांना आपल्याप्रमाणे घडवू शकते, त्याप्रमाणे हे दायित्व सांभाळणारे संत आणि साधक अन्य साधकांना घडवत आहेत. ते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांच्यात रुजवलेले संस्कार आणि आदर्श अन्य साधकांमध्येही रुजवत आहेत. ‘एका आदर्श व्यक्तीमुळे अनेक आदर्श व्यक्ती घडणे आणि त्या अनेक आदर्श व्यक्तींमुळे आणखी अनेक आदर्श व्यक्ती घडणे’, अशी ही साखळी प्रक्रिया सतत चालूच आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधना, सुसंस्कार आणि व्यापक समष्टी विचार यांचा पाया आधीच्या साधकांमध्ये चांगल्या प्रकारे भक्कम केल्यामुळे त्यांना आता पुन्हा त्यामध्ये लक्ष घालावे लागत नाही. सर्व साधक एकसारखे आदर्श कसे घडत आहेत, याविषयी समाजातील संत नेहमी देत असलेली प्रतिक्रिया बोलकी आहे. ते म्हणतात, ‘सनातनच्या कुठल्याही आश्रमात किंवा इतर कुठेही गेला, तरी तेथील प्रत्येक साधक आदर्श कसा वागतो किंवा एकसारखेच आदरातिथ्य कसे करतो ?’

६. अल्प प्राणशक्तीमुळे वर्ष २००६ नंतर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे आश्रमाबाहेर साधकांचे सत्संग घेण्यास जाणे बंद झाले असले, तरी उन्नती होणार्‍या भारतभरातील साधकांची संख्या अल्प झाली नसून उलट वाढतच असणे

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवातील उपस्थिती (मे २०२५)

वर्ष २००६ पर्यंत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले स्वतः महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक ही राज्ये, तसेच सनातनचे विविध आश्रम आणि सेवाकेंद्रे येथे जाऊन साधकांचे सत्संग घेत अन् त्यांना मार्गदर्शन करत. वर्ष २००६ नंतर त्यांच्यावर आलेला महामृत्यूयोग आणि वाढलेली वाईट शक्तींची आक्रमणे यांमुळे त्यांची प्राणशक्ती अल्प होऊ लागली अन् त्यांना चालणे – फिरणे कठीण होऊ लागले. त्यामुळे त्यांचे आश्रमाबाहेर जाणे बंद झाले, तसेच आश्रमातल्या आश्रमात साधकांचा सत्संग घेणेही अगदी अल्प झाले. असे असले, तरी उन्नती होणार्‍या भारतभरातील साधकांची संख्या अल्प झाली नाही, तर उलट वाढतच आहे. यावरून ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या केवळ अस्तित्वानेच साधकांची आध्यात्मिक उन्नती होत आहे’, हे लक्षात येते. त्यांनी साधकांमध्ये पेरलेल्या साधना, संस्कृती आणि समष्टी विचार यांच्या बिजाचा आता वटवृक्ष झाला आहे.

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ

७. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या केवळ अस्तित्वानेच साधकांची आध्यात्मिक उन्नती होत असल्याची काही उदाहरणे

देश-विदेशांतील हिंदुत्वनिष्ठांना एकत्र आणणारा वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव (जून २०२२)

अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना एखादी सेवा देतांना त्या सेवेत खोलात जायला आणि सेवेचे नियोजन करायला सांगत. त्या सेवेविषयी तयार असे काही देत नसत. त्यामुळे साधक स्वतः कष्ट करायला, तसेच सेवेतील बारकावे शोधायला शिकले आणि स्वतःच्या पायांवर उभे राहिले. थोडक्यात साधक स्वावलंबी झाले.

आ. सनातनच्या आश्रमांत अनेक सेवा आहेत. त्या प्रत्येक सेवेचे दायित्व उन्नती केलेले साधक लीलया सांभाळत आहेत. ते साधक विभागातील साधकांची पित्याप्रमाणे काळजी घेत आहेत.

इ. आश्रमांत विविध शिबिरे आयोजित केली जातात. ही शिबिरे साधक, तसेच समाजातील धर्माभिमानी, अधिवक्ते, उद्योजक इत्यादींसाठी असतात. या शिबिरांचे नियोजन उत्कृष्ट असते.

ई. अध्यात्मप्रसार करणारे साधक आपापल्या जिल्ह्यात सार्वजनिक हिंदु राष्ट्र-जागृती सभा, तसेच धर्माभिमान्यांसाठी हिंदु राष्ट्र अधिवेशने आयोजित करतात. त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो. साधक असे सार्वजनिक कार्यक्रम करायला सिद्ध झाले आहेत.

उ. धर्म आणि राष्ट्र यांच्या संदर्भातील ज्वलंत प्रश्नांविषयी साधक अन्य संघटनांना त्यांच्या समवेत घेऊन आंदोलने करतात. त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळतो.

ऊ. वर्ष २०१२ पासून आतापर्यंत १२ अखिल भारतीय हिंदु अधिवेशने झाली. त्यांना विविध संघटनांचे पदाधिकारी आले. त्यांमध्ये साधकांनी आपले कार्य आणि विचार मांडून सर्वांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले. त्यामुळे अनेक संघटना सनातन संस्थेशी घनिष्ट जोडल्या गेल्या आणि त्या नुसत्या जोडल्या गेल्या नाहीत, तर ‘सनातन संस्थाच रामराज्याच्या स्थापनेसाठी आपल्याला दिशादर्शन आणि नेतृत्व करू शकते’, असा विश्वास त्यांच्यात निर्माण झाला आहे.

ए. गेली १५ वर्षे प्रत्येक कुंभमेळ्यामध्ये अध्यात्मप्रसार करत असल्याने आता सनातन संस्थेला कुंभमेळ्यात शासनाच्या वतीने आरक्षित जागा मिळते, तसेच साधूंच्या आखाड्यांमध्ये सनातन संस्थेचे नाव झाले आहे.

वाराणसी, उत्तरप्रदेश येथील हलाल विरोधी आंदोलन (जानेवारी २०२५ )

ऐ. मे २०२३ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव गोव्यात मोठ्या स्वरूपात केवळ साधकांसाठी झाला. त्याला ५ सहस्र साधक आले होते. त्यानंतर वर्ष २०२५ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या वेळी गोव्यामध्ये फर्मागुडी येथे भव्य स्वरूपात ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ झाला. रामराज्याच्या स्थापनेसाठी सर्वांना जागृत करण्यासाठी हा महोत्सव होता. त्याला भारतभरातून, तसेच विदेशातूनही एकूण ३० सहस्र लोक आले होते. त्यानंतर डिसेंबर २०२५ मध्ये असाच कार्यक्रम भरत मंडपम, देहली येथे झाला. असे भव्य कार्यक्रम साधक आयोजित करू शकले, हे विशेष आहे.

ओ. नाडीपट्टीच्या माध्यमातून साधकांना मार्गदर्शन आणि आशीर्वाद मिळतो, तसेच आपत्काळात साधकांच्या रक्षणासाठी आध्यात्मिक उपायही सांगितले जातात.

औ. साधकांना देवतांच्या अनुभूती येतात. त्यांच्याकडील देवतांच्या चित्रांत चांगले पालट होतात. यावरून देवतांची साधकांवर कृपा असल्याचे लक्षात येते.

अं. सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे साधक क्षणोक्षणी गुरुकृपा अनुभवतात. अशी कृपा अनुभवणे, हे साधकांची आध्यात्मिक उन्नती होत असल्याचेच द्योतक आहे.

लिखाणाचा हा विषय सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीच दिला आणि त्यांनीच लिहून घेतले, या कृपेसाठी मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ (रसायनशास्त्रामधील पीएच्.डी., मुंबई विद्यापीठ), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (११.५.२०२६)   (समाप्त)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक