गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘स्वभावदोष-निर्मूलन आणि गुण-संवर्धन प्रक्रिया’ अन् कला !

‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य या कलांतून ईश्वरप्राप्तीसाठी साधना’, याचे प्रास्ताविक विवेचन !

४ सप्टेंबर २०२५ या दिवसापासून प्रत्येक गुरुवारी चालू झालेल्या लेखमालेत आपण ‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य’, या कलांची माहिती घेत आहोत. या कलांच्या सादरीकरणाचा उद्देश काळाच्या प्रभावामुळे पालटत असला, तरी ‘कलेकडे केवळ कला म्हणून न पहाता कलेतून आध्यात्मिक उन्नती कशी साधावी’, हे येथे पाहूया. 

(लेखांक १९)

‘आनंदप्राप्ती’ हे प्रत्येक मनुष्याच्या जीवनाचे ध्येय आहे. त्यासाठी मनुष्य प्रतिदिन झटत असतो; परंतु आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या चढ-उतारातून जात असतो. जीवनातील विविध परिस्थितींमध्ये व्यक्तीचे ‘निराशा, ताण घेणे, काळजी वाटणे, राग, अपेक्षा करणे’, यांसारखे स्वभावदोष उफाळून येतात. त्याचा व्यक्तीच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे व्यक्ती दुःखी होऊन आनंदापासून दूर जाते.

यावर उपाय म्हणून सध्या अनेक ठिकाणी ‘व्यक्तीमत्त्व विकास (पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट)’ अथवा ‘तणाव व्यवस्थापन (स्ट्रेस मॅनेजमेंट)’ शिकवले जाते. त्यामुळे व्यक्तीला तात्कालिक सुख मिळते अथवा कठीण प्रसंगांतून बाहेर पडता येते; परंतु जीवनात शाश्वत आनंद मिळवण्यासाठी ‘स्वभावदोष-निर्मूलन अन् गुण-संवर्धन प्रक्रिया’ अधिक लाभदायक ठरू शकते. या प्रक्रियेचे जनक आहेत, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले !

सदर लेखमालेतील ७ मे या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिये’च्या अंतर्गत ‘लिखाणाची पद्धत आणि स्वयंसूचना देण्याची पद्धत’ समजून घेतली. या भागात आपण ‘स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया राबवल्याने साधक-कलाकाराला होणारे लाभ आणि ‘स्वभावदोष-निर्मूलनाच्या समवेत गुण-संवर्धन प्रक्रिया कशी राबवावी ?’, हे जाणून घेणार आहोत.

(भाग ४)

या लेखाचा भाग ३  वाचण्यासाठी येथे  क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1037395.html

‘संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण ।।’ स्वभावदोष हे आपल्या अंतर्मनाशी संबंधित असतात आणि त्यामुळे ते व्यक्तीच्या जीवनातील आनंदात बाधा आणणारे ठरतात. जीवनात खर्‍या अर्थाने आनंदी रहाण्यासाठी ‘स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया’ साहाय्यक ठरते.

१. स्वभावदोष-निर्मूलन केल्याने साधक-कलाकाराला होणारे लाभ !

१ अ. कलेतून सकारात्मकता प्रक्षेपित होणे आणि मनाला स्थिरता आल्याने कलेचे प्रदर्शन आत्मविश्वासाने होऊ शकणे : साधक-कलाकार मनाने जेवढा स्थिर असेल, तेवढी त्याच्या कलेतून सकारात्मकता प्रक्षेपित होते, तसेच त्याच्या स्थिरतेमुळे तो कलेचे प्रदर्शनही आत्मविश्वासाने करू शकतो. स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेमुळे मन अस्थिर करणारे घटक न्यून होऊन ते क्षीण झाल्यावर मनाची स्थिरता कायम रहाण्यास साधक-कलाकाराला साहाय्य होते.

१ आ. कोणत्याही स्थितीत सहज रहाता येणे : या प्रक्रियेमुळे मनाला स्थिरता आल्याने साधक-कलाकार सुख किंवा प्रतिकूल परिस्थितीमधील दुःख, अशा कोणत्याही स्थितीमध्ये स्वतःला सहज ठेवू शकतो. त्याच्यावर परिस्थितीचा परिणाम अल्प होतो.

१ इ. मन शुद्ध झाल्याने सकारात्मक ऊर्जा देणारी कला सादर होऊ शकणे : या प्रक्रियेमुळे साधक-कलाकाराचे मन शुद्ध होते. त्यामुळे कलेच्या सादरीकरणातील विकार न्यून झाल्याने कलाकाराकडून अधिक सकारात्मक ऊर्जा देणारी परिणामकारक कला सादर होऊ शकते.

१ ई. मनातील प्रतिक्रिया न्यून होऊन निरपेक्ष प्रेम निर्माण होणे : स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेमुळे इतरांविषयी मनात असलेल्या दोषयुक्त प्रतिक्रिया किंवा राग न्यून होण्यास साहाय्य होते. त्यामुळे इतरांविषयी मनात निरपेक्ष प्रेम, म्हणजेच प्रीती निर्माण होऊन समष्टीशी सुसंवाद साधणे सोपे होते.

१ उ. अंतर्मनावरील संस्कार क्षीण होण्यास साहाय्य होणे : मनुष्याच्या अंतर्मनावर जे (चांगले आणि वाईट) संस्कार असतात, ते केवळ या जन्माचे नसून जन्मोजन्मीचे असतात. त्यामुळे चुकीचे संस्कार लगेच जाणार नसले, तरी या प्रक्रियेमुळे ते संस्कार क्षीण होण्यास निश्चितच साहाय्य होते.

१ ऊ. साधनेच्या प्रयत्नांतील सातत्य आणि अंतर्मुखता वाढून साधनेत शीघ्र प्रगती होणे : प्रक्रिया राबवल्याने साधक-कलाकाराच्या साधनेच्या प्रयत्नांतील सातत्य वाढते. तो अंतर्मुख होऊन स्वतःचे निरीक्षण करू लागतो. कलाकाराने असे प्रयत्न सातत्याने केल्यामुळे त्याची शीघ्र गतीने प्रगती होऊन त्याला साधनेतील पुढच्या टप्प्यांत जाणे सोपे होते.

१ ए. कलेतील ‘ईश्वरी तत्त्वा’ची अनुभूती घेता येणे : मनुष्याचे मन निर्मळ आणि दोषविरहित असल्यास त्याच्या ठिकाणी भगवंताचा वास असतो. मनात अनावश्यक विचार, प्रतिक्रिया, राग इत्यादी जितके अल्प, तितके मन आनंदी, उत्साही आणि सकारात्मक रहाते. मनाची ही सकारात्मकताच कलाकाराला कलेतील ‘ईश्वरी तत्त्वा’ची अनुभूती देऊ शकते.

२. प्रगतीची सूचना

कु. अपाला औंधकर

२ अ. प्रगतीची सूचना देण्यामागील उद्देश : काही काळ ‘स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया’ राबवल्यावर जे स्वभावदोष दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत, त्या स्वभावदोषांची तीव्रता न्यून झाली असल्याचे आपल्याला जाणवते. ‘पूर्वी काही प्रसंगांत दोष उफाळून येत होते; पण आता ही प्रक्रिया चालू केल्यामुळे दोषांवर मात करता यायला लागली आहे’, असे आपल्या लक्षात येते. आपल्याला ज्या दोषांच्या संदर्भात सकारात्मक परिणाम जाणवतात. त्या संदर्भात मनाला प्रगतीची सूचनाही देणे आवश्यक असते. आपण करत असलेल्या ‘स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिये’च्या सकारात्मक परिणामाची जाणीव मनाला करून दिल्यामुळे मन अधिक उत्साहाने पुढील प्रक्रिया करण्यासाठी प्रेरित होते.

२ अ १. प्रगतीच्या सूचनेचे उदाहरण : आता मला माझ्यातील ‘आळशीपणा’, या स्वभावदोषाची जाणीव व्हायला लागली आहे. पूर्वीपेक्षा ‘आळशीपणा’, या दोषावर मात करायलाही मला जमायला लागले आहे. त्यामुळे माझा प्रक्रिया राबवण्याचा उत्साह वाढला आहे. हे केवळ भगवंताच्या कृपेमुळेच शक्य झाले आहे.

३. गुण-संवर्धन प्रक्रिया

सुश्री (कु.) तेजल पात्रीकर

आपण ‘स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिये’ला ‘गुण-संवर्धन’, म्हणजेच आपल्यातील उपजत गुणांची वृद्धी करण्याच्या प्रक्रियेची जोड दिली, तर ही एक दुधारी प्रक्रिया होऊन ती जलद आध्यात्मिक प्रगती करून देणारी ठरते.

‘गुण-संवर्धन’, म्हणजे व्यक्तीमधील ‘प्रेमभाव, काटकसर, वेळेचे पालन करणे, नम्रता, शिकण्याची वृत्ती, अंतर्मुखता’, यांसारख्या गुणांची वृद्धी करणे. गुणांची वृद्धी झाल्यास स्वभावदोषांची तीव्रता आपोआप न्यून होऊ लागते.

३ अ. गुण-संवर्धन प्रक्रिया कशी राबवावी ? : स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेसाठी निवडलेल्या दोषांच्या विरुद्ध असलेला गुण किंवा आपल्या साधनेसाठी आवश्यक असलेला एखादा गुण या प्रक्रियेसाठी निवडावा, उदा. ‘आळशीपणा’ हा दोष प्रक्रियेसाठी निवडलेला असल्यास त्याच्या विरुद्धचा ‘तत्परता’ गुण हा गुण-संवर्धनासाठी निवडावा. तत्परतेसाठी प्रयत्नरत झाल्यामुळे  ‘आळशीपणा’, या दोषावर आपोआप मात करता येऊ शकते.

‘आपण आपल्या दैनंदिन जीवनात ‘तत्परता’, हा गुण कुठे कुठे वाढवू शकतो ?’, याचे चिंतन करून प्रसंग काढावेत आणि त्या प्रसंगांमध्ये तत्परता वाढवण्याची कृती करावी. असे केल्याने हा गुण वृद्धींगत होण्यास साहाय्य होते. याप्रमाणे निवडलेल्या इतर गुणांच्या संदर्भातही करावे.

३ आ. गुण-संवर्धन प्रक्रियेचे लाभ

३ आ १. स्वभावदोष न्यून होऊ लागल्याने आत्मविश्वास वाढणे : ‘गुण-संवर्धन प्रक्रिये’मुळे व्यक्ती स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया उत्साहाने राबवू लागते. त्यामुळे तिच्या व्यक्तीमत्त्वातील विविध स्वभावदोष सहजतेने न्यून होण्यास साहाय्य होते. स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेमध्ये मनाचा सहभाग वाढतो. स्वभावदोष न्यून होऊ लागल्याने व्यक्तीचा आत्मविश्वासही वाढतो.

३ आ २. गुण-संवर्धन प्रक्रियेमुळे साधक-कलाकाराच्या गुणांमध्ये वृद्धी होऊन त्याला स्वतःमध्ये सकारात्मक पालट जाणवू लागतात. त्यामुळे कला-साधनेतही त्याची प्रगती होऊ लागते.

३ आ ३. मन स्थिर रहाणे : या प्रक्रियेमुळे साधक-कलाकाराला प्रत्येक परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळणे सोपे जाते. त्यामुळे त्याला आपल्या मनाची स्थिरताही टिकवून ठेवता येते.

४. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया’ राबवणार्‍या साधकांचे केलेले सर्वेक्षण !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया’ राबवणार्‍या ५० साधकांचे सर्वेक्षण करण्यात आले. यांपैकी ९० टक्के साधक नोकरी करणारे होते. या साधकांना त्यांच्या आयुष्यातील सर्वाधिक ताण निर्माण करणारे ३ स्वभावदोष प्रक्रियेसाठी निवडण्यास सांगितले. त्यांनी ही प्रक्रिया २ वर्षे ५ मास राबवल्यावर त्यांचा आढावा घेण्यात आला. त्या वेळी ‘ही प्रक्रिया राबवल्यामुळे त्यांच्यातील स्वभावदोषांचे प्रमाण ५० ते ८० टक्क्यांपर्यंत न्यून करण्यात त्यांना यश मिळाले’, असे लक्षात आले.

५. सारांश

असे म्हटले जाते, ‘स्वभावाला औषध नाही’; पण सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संकल्पामुळे ‘स्वभावदोष-निर्मूलन अन् गुण-संवर्धन प्रक्रिया’ राबवल्यास आपण निश्चितच आपल्या मनातील अयोग्य संस्कार आणि दोष कायमस्वरूपी घालवू शकतो. स्वभावदोष-निर्मूूलन आणि गुण-संवर्धन प्रक्रिया राबवल्यामुळे मनाची प्रसन्नता शीघ्रतेने वाढते. मन सकारात्मक आणि प्रसन्न झाल्यास ईश्वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करणे सोपे होते. (समाप्त)

साधकांनो, मनाला निर्मळ बनवणारी आणि आनंद देणारी ही प्रक्रिया राबवून तणावमुक्त होऊया अन् साधनेतील खरा आनंद मिळवण्याकडे वाटचाल करूया !’

संग्राहक : कु. अपाला औंधकर (भरतनाट्यम् नृत्य विशारद, आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय १९ वर्षे), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा आणि सुश्री तेजल पात्रीकर (संगीत विशारद, आध्यात्मिक पातळी ६० टक्के), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३.५.२०२६)