गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘स्वभावदोष-निर्मूलन आणि गुण-संवर्धन प्रक्रिया’ अन् कला ! 

‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य या कलांतून ईश्वरप्राप्तीसाठी साधना’, याचे प्रास्ताविक विवेचन !

४ सप्टेंबर २०२५ या दिवसापासून प्रत्येक गुरुवारी चालू झालेल्या लेखमालेत आपण ‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य’, या कलांची माहिती घेत आहोत. या कलांच्या सादरीकरणाचा उद्देश काळाच्या प्रभावामुळे पालटत असला, तरी ‘कलेकडे केवळ कला म्हणून न पहाता कलेतून आध्यात्मिक उन्नती कशी साधावी’, हे येथे पाहूया.

(लेखांक १९)   

‘आनंदप्राप्ती’ हे प्रत्येक मनुष्याच्या जीवनाचे ध्येय आहे. त्यासाठी मनुष्य प्रतिदिन झटत असतो; परंतु आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या चढ-उतारातून जात असतो. जीवनातील विविध परिस्थितींमध्ये व्यक्तीचे ‘निराशा, ताण घेणे, काळजी वाटणे, राग, अपेक्षा करणे’, यांसारखे स्वभावदोष उफाळून येतात. त्याचा व्यक्तीच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे व्यक्ती दुःखी होऊन आनंदापासून दूर जाते.

यावर उपाय म्हणून सध्या अनेक ठिकाणी ‘व्यक्तीमत्त्व विकास (पर्सनॅलिटी डेव्हेलपमेंट)’ अथवा ‘तणाव व्यवस्थापन (स्ट्रेस मॅनेजमेंट)’ शिकवले जाते. त्यामुळे व्यक्तीला तात्कालिक सुख मिळते अथवा कठीण प्रसंगांतून बाहेर पडता येते; परंतु जीवनात शाश्वत आनंद मिळवण्यासाठी ‘स्वभावदोष-निर्मूलन अन् गुण-संवर्धन प्रक्रिया’ अधिक लाभदायक ठरू शकते. या प्रक्रियेचे जनक आहेत, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले !          

सदर लेखमालेतील ३० एप्रिल या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘स्वभाव’ आणि ‘स्वभावदोष’ म्हणजे काय ?’, स्वभावदोषांमुळे कलाकाराची होणारी हानी’ इत्यादी सूत्रे पाहिली. आजच्या लेखात आपण ‘स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया’ कशी राबवावी ?’, हे विस्तृतपणे जाणून घेणार आहोत.

(भाग ३) 

याआधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1035192.html

१. ‘स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया’ राबवण्याची पद्धत 

१ अ. स्वभावदोषांच्या अनुषंगाने लिखाणाची पद्धत : ‘दैनंदिन जीवनात प्रत्येक व्यक्ती विविध परिस्थितींमधून जात असते. तेव्हा त्या व्यक्तीचे विविध स्वभावदोष कार्यरत असतात. हे स्वभावदोष लक्षात घेऊन त्यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेसाठी करायच्या दैनंदिन कृती पुढीलप्रमाणे आहेत.

१. सर्वप्रथम आपल्याला ठाऊक असलेल्या स्वतःतील स्वभावदोषांची सूची (यादी) सिद्ध करावी.

२. दैनंदिन जीवनात या स्वभावदोषांचे आणि काही नवीन अन्य स्वभावदोषांचे प्रसंग लक्षात आल्यास घडलेले प्रसंग वहीमध्ये नोंद करावेत, उदा. कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळेवर पोचण्यात अडचणी आल्याने चिडचिड झाली.

३. ‘प्रसंगाच्या अनुषंगाने त्याला कोणता स्वभावदोष कारणीभूत आहे ?’, ते लिहावे, उदा. वरील प्रसंगामध्ये ‘परिस्थिती न स्वीकारणे’, हा प्रमुख स्वभावदोष लक्षात येतो.

कु. अपाला औंधकर

४. ‘हा स्वभावदोष किती कालावधीने लक्षात आला ?’, तो कालावधी लिहावा, उदा. वरील प्रसंगामध्ये परिस्थिती स्वीकारता न आल्याने अर्धा घंटा चिडचिड झाली असेल, तर ‘अर्धा घंटा’, हा त्याचा कालावधी लिहावा.

५. त्यानंतर या स्वभावदोषाविषयीची मनाला देण्यासाठी ‘स्वयंसूचना’ लिहावी, उदा. ‘जेव्हा ‘परिस्थिती न स्वीकारणे’, या स्वभावदोषामुळे कार्यक्रमाला वेळेत पोचतांना आलेल्या अडचणींचे विचार मनात येऊन माझी चिडचिड होत असेल, तेव्हा मला त्याची जाणीव होईल आणि ‘या चिडचिडीचा पुढे माझ्या कला सादरीकरणावर परिणाम होईल’, हे लक्षात घेऊन मी त्या वेळी स्थिर राहून परिस्थिती सकारात्मकतेने स्वीकारीन.’

(वरील टप्प्यांचे सविस्तर विश्लेषण सनातनची ग्रंथमलिका ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’ यामध्ये दिले आहे.)

१ आ. स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेच्या अंतर्गत ‘स्वयंसूचना देण्याची पद्धत !’ 

१ आ १. स्वयंसूचना म्हणजे काय ? : स्वयंसूचना म्हणजे स्वतःकडून होणार्‍या अयोग्य कृती, मनात येणारे अयोग्य विचार, भावना, प्रतिक्रिया यांच्या संदर्भात स्वतःच आपल्या अंतर्मनाला, म्हणजे चित्ताला सकारात्मक सूचना देणे. स्वयंसूचनेच्या माध्यमातून स्वतःतील नकारात्मक संस्कार घालवण्यासाठी योग्य आणि सकारात्मक सूचना दिली जाते. त्यामुळे कालांतराने आपल्यातील स्वभावदोष निष्प्रभ व्हायला लागतात.

१ आ २. स्वयंसूचनेचे महत्त्व : मनातील नकारात्मक विचारांवर मात करण्यासाठी केवळ चिंतन, तसेच केवळ सकारात्मक विचार करण्याचा निश्चय पुरेसा नसतो, तर त्यासाठी आध्यात्मिक ऊर्जेची आवश्यकता असते. या प्रक्रियेसाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा संकल्प कार्यरत आहे. त्यामुळे प्रक्रियेचा प्रत्येक टप्पा चैतन्यमय आहे. त्यामुळे आपण जेव्हा स्वयंसूचना देतो, तेव्हा ते केवळ शब्द रहात नाहीत, तर त्या माध्यमातून चैतन्यही आपल्या अंतर्मनात जाते आणि स्वभावदोष-निर्मूलनाला गती येते. स्वयंसूचना या थेट अंतर्मनाच्या पातळीवर कार्य करत असल्याने स्वयंसूचनांमुळे अंतर्मनातील स्वभावदोषांचे संस्कार क्षीण होऊ लागतात आणि पर्यायाने स्वभावदोषांमुळे निर्माण होणारा ताण हळूहळू न्यून होऊ लागतो. हे स्वयंसूचनांचे महत्त्व आहे.

१ आ ३. स्वयंसूचनांची सत्रे : आपल्या व्यक्तीमत्त्वामध्ये प्रकर्षाने लक्षात येणार्‍या आणि आपल्यासह समष्टीलाही हानीकारक अशा आपल्या स्वभावदोषांवर आपण सर्वप्रथम स्वयंसूचना बनवू शकतो, उदा. उतावीळपणा, धांदरटपणा, विसराळूपणा, वेळेचे पालन न करणे, इतरांचा विचार अल्प असणे इत्यादी.

‘आपल्यातील अशा स्वभावदोषांची मनाला जाणीव व्हावी आणि आपल्याकडून अयोग्य कृती अन् अयोग्य विचार टाळले जावेत’, यासाठी दिवसभरात न्यूनतम ५ ते ६ वेळा या स्वभावदोषांच्या संदर्भात पुढील पद्धतीने सत्र करावे.

अ. आरंभी ५ मिनिटे आपल्या उपास्य देवतेचा नामजप करावा. यामुळे मन एकाग्र व्हायला साहाय्य होते.

आ. त्यानंतर आपण निवडलेल्या स्वभावदोषावर बनवलेली सूचना ५ वेळा मनाला द्यावी.

सुश्री (कु.) तेजल पात्रीकर

उदा. 

स्वयंसूचना : ‘जेव्हा ‘वेळेचे पालन न करणे’, या स्वभावदोषामुळे मी कार्यक्रमस्थळी दिलेल्या वेळेपेक्षा उशिरा पोचत असेन, त्या वेळी मला त्याची जाणीव होईल आणि ‘कार्यक्रमाला आलेले सगळे माझी वाट बघत थांबले असल्याने माझ्यामुळे त्यांचा वेळ जाणार’, हे लक्षात घेऊन मी दिलेल्या वेळेच्या आधीच कार्यक्रमस्थळी पोचेन.’

इ. यानंतर शेवटी उपास्य देवतेच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी.

२. अंतर्मनातील अयोग्य संस्कार घालवणारी ‘स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया’ ! 

आजच्या वेगवान जीवनशैलीत प्रत्येक जण यशस्वी, आनंदी आणि संतुलित जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी अनेक जण व्यक्तीमत्त्व विकास (Personality development) आणि ताण-तणाव व्यवस्थापन (Stress Management) यांसारख्या अभ्यासक्रमांकडे वळतात. हे अभ्यासक्रम व्यक्तीला बाह्य जगात अधिक प्रभावीपणे वावरण्यास साहाय्य करतात. ‘लोकांना हाताळण्याची कौशल्ये (Soft skills – वैयक्तिक गुणधर्म, वर्तणूक आणि इतरांशी संवाद साधण्याची कौशल्ये)’, याअंतर्गत सभ्यतेचे शिष्टाचार शिकवले जातात; पण तेथे मूळ स्वभावदोषांवर प्रक्रिया केली जात नसल्याने ते पालट वरवरचे आणि तात्पुरते ठरतात.

ज्याप्रमाणे आपल्याला एखादी जखम झाली, तर ती मुळापासून बरी होण्यासाठी मलमपट्टी करण्यासह आधुनिक वैद्य आपल्याला औषधेही देतात, त्याचप्रमाणे बाह्यमनाला आपण कितीही समजावून सांगितले, तरी अंतर्मनातील अयोग्य संस्कार घालवण्यासाठी प्रयत्न केल्यानंतरच आपले व्यक्तीमत्त्व पूर्णतः पालटू शकते. हीच मुळापासून दोष घालवण्याची प्रक्रिया स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेने साध्य होते.

३. ‘खरा व्यक्तीमत्त्व विकास होऊन व्यक्तीचे (कलाकाराचे) साधकामध्ये (साधक-कलाकारामध्ये) रूपांतर होणे’, हे स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेद्वारे सहज शक्य असणे 

साधनेची जोड दिल्याने जसजशी मनुष्याची (कलाकाराची) बुद्धी सात्त्विक होत जाते, त्याच्या स्वभावदोषांचे प्रमाण उणावत जाते, तसतसा त्याच्या व्यक्तीमत्त्वाचा विकास आपोआप होत जातो; म्हणूनच ‘स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया’ ही केवळ व्यक्तीमत्त्व सुधारण्यासाठी नसून व्यक्तीच्या मूळ स्वभावात परिवर्तन घडवणारी प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया आपल्यातील ‘राग, चिडचिड, आळस, भीती, असुरक्षितता, अपेक्षा, नकारात्मक विचारसरणी’, यांसारख्या स्वभावदोषांची जाणीव करून देते आणि त्यांचे मूळ कारण शोधून ते हळूहळू दूर करण्यास साहाय्यही करते. त्यामुळे एका प्रसंगामधील मूळ दोषावर स्वयंसूचना सत्राद्वारे प्रयत्न केल्यावर त्याचा सकारात्मक परिणाम अन्य प्रसंगांतही आपल्याला दिसायला लागतो.

‘स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया’ ही व्यक्तीला केवळ ‘एक चांगले व्यक्तीमत्त्व’ घडवण्यासाठी नाही, तर ‘एक चांगला साधक’ घडवून पुढे ईश्वरप्राप्तीच्या दिशेने जलद मार्गक्रमण करण्यास  साहाय्यभूत ठरते.’

(क्रमशः)

संग्राहक : कु. अपाला औंधकर (भरतनाट्यम् नृत्य विशारद, आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय १९ वर्षे), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा आणि सुश्री तेजल पात्रीकर (संगीत विशारद, आध्यात्मिक पातळी ६० टक्के), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२६.४.२०२६)

या लेखाचा भाग ४  वाचण्यासाठी येथे  क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1039876.html