कुटुंबव्यवस्था, धर्मसंस्था आणि शिक्षणव्यवस्था यांना साम्यवादाचा धोका !

‘हिंदु आणि राष्ट्र हितैषी’ सदर !

१. साम्यवाद्यांची विभाजनकारी विचारसरणी

वर्ष १९४५ मध्ये गंगाधर अधिकारी या साम्यवाद्याने उघडपणे लिहिले होते, ‘भारत हा नैसर्गिक लोकशाही देश नसून त्याचे १४ भागांत तुकडे केले पाहिजे.’ त्यामुळे जेव्हा ‘जवाहरलाल नेहरू विद्यापिठा’मध्ये (‘जे.एन्.यू.’मध्ये) काही तरुण ‘भारत तेरे तुकडे होंगे’, अशा घोषणा देतात, तेव्हा ते अचानकपणे उठून बोलत नाहीत, तर ही त्यांची मूळ विचारसरणीच आहे. पाकिस्तान आणि भारत यांच्या फाळणीचा वैचारिक आधार हा साम्यवाद्यांनीच सिद्ध केला होता. त्यांचा खलिस्तानलाही पाठिंबा आहे. जेथे जेथे भारताचे तुकडे करण्याची गोष्ट येते, तेथे तेथे साम्यवादी त्यांच्या हमखास पाठीशी उभे रहातात. भारताचे अधिकाधिक तुकडे करण्यासाठी ते सदैव कार्यरत रहातात. त्यांचे मूळ लक्ष हिंदु धर्मावर आहे. हिंदु धर्माला अवमानित करण्यासाठी त्यांचे सर्व प्रयत्न चालू असतात. हा अत्यंत गंभीर विषय आहे. त्यामुळे येणार्‍या काळात आपल्याला साम्यवाद्यांपासून सावध रहाण्याची आवश्यकता आहे.

२. भारतीय समाजाचे तुकडे करणे, हेच साम्यवादाचे धोरण !

साम्यवाद हा एक मोठा विशाल वृक्ष आहे. भारतीय समाजाचे विविध तुकडे करणे, हे त्यांचे अंतस्थ धोरण आहे. एका भागाला ते ‘शोषक’ म्हणतात आणि दुसर्‍या भागाला ‘शोषित’ म्हणतात. शोषक आणि शोषित यांच्यामध्ये नेहमी संघर्ष भडकत राहिला पाहिजे, यासाठी ते प्रयत्नरत असतात. या संघर्षातून अराजक माजते आणि अराजकातून विध्वंस निर्माण होतो. ‘सहस्रो वर्षांपासून निर्माण झालेल्या मानवाच्या संस्कृतीला संपूर्णतः नष्ट करायचे आणि नंतर ‘क्लोन सिलेक्ट’च्या नावावर आपल्यावर एका नवीन मानवाची, नव्या संस्कृतीची अन् नव्या समाजाची निर्मिती करायची’, असे त्यांचे म्हणणे आहे. असे असले, तरी कोणत्याही नवीन गोष्टीची निर्मिती करण्याची क्षमता त्यांनी आजपर्यंत कधीच दाखवली नाही. त्यांना अनेक संधी मिळाल्या, तरीही कोणतीच नवीन गोष्ट ते निर्माण करू शकले नाहीत; उलट ते मानवाला माणुसकीशून्य बनवून पशूच्या पातळीवर घेऊन आले. नवीन मानव निर्माण करण्याची गोष्ट तर सोडूनच द्या, त्यांनी मानवाला नुसते दानव नव्हे, तर क्रूर पशू बनवले आहे. त्यामुळे त्यांच्यापासून सावधान रहाणे अत्यंत आवश्यक आहे.

३. हिंदु संस्कृती नष्ट करण्यासाठी कुटुंबव्यवस्था, धर्मसंस्था, शिक्षणव्यवस्था आणि राष्ट्रवाद यांच्यावर आक्रमण

दोन गटांमध्ये संघर्ष निर्माण करण्यासाठी साम्यवाद्यांचा मुख्य आधार आर्थिक होता. पूर्वी ‘श्रीमंत विरुद्ध गरीब’ किंवा ‘धनवान मालक विरुद्ध कामगार’ या आधारावर समाजात संघर्ष निर्माण झाला पाहिजे, अशी त्यांची इच्छा होती; परंतु त्यांचा उद्देश पूर्णपणे अयशस्वी झाला. सोव्हिएत युनियन (आताचा रशिया) कोसळला आणि संपूर्ण युरोपीय देशात साम्यवाद अयशस्वी झाला, तेव्हा त्यांना समजले की, आर्थिक आधारावर समाजाची विभागणी करण्याचे धोरण आता चालणार नाही. त्यानंतर त्यांनी धोरणात पालट केला आणि सांस्कृतिक आधारावर समाजाला विभाजित करणे चालू झाले. त्यांनी भारताची उच्च प्रतीची हिंदु संस्कृती नष्ट करायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी संस्कृतीला बळ पुरवणार्‍या कुटुंबव्यवस्था, धर्मसंस्था, राष्ट्रवाद आणि शिक्षणव्यवस्था यांना नष्ट करण्याचा प्रयत्न चालू केला.

श्री. अभिजित जोग

आपली कुटुंबव्यवस्था हे त्यांचे सर्वांत मोठे लक्ष्य आहे. सर्वप्रथम त्यांना भारताची एकत्र कुटुंबव्यवस्था नष्ट करायची आहे. एकत्र कुटुंबव्यवस्था संपली की, लोकांना वाटेल तसे आणि हवे तेव्हा ते दुसर्‍याशी संबंध ठेवू शकणार आहेत. त्यामुळे स्वैराचार निर्माण होईल. ‘हे आक्रमण बंदुकीच्या जोरावर किंवा रक्तरंजित क्रांतीने होणार नाही’, असे त्यांनी म्हटले आहे. ‘आम्ही सर्व संस्थांमध्ये साम्यवादी विचारसरणी घुसवणार. सर्व समाज आतून वाळवीसारखा पोखरणार की, एक दिवस ही सनातन वैदिक संस्कृती संपूर्णपणे कोसळणार’, हे त्यांनी १९२०-१९३० या दशकामध्येच लिहून ठेवले आहे. त्यानुसार ते भारतीय कुटुंब, शिक्षण आणि धर्मव्यवस्था नष्ट करत आहेत.

त्यांचे विचारवंत विलिमन झेंबर्ग यांनी वर्ष १९२०-१९३० मध्ये लिहून ठेवले आहे, ‘पाश्चात्त्य संस्कृतीचा दुर्गंध येईल, अशा प्रकारे योजना चालवू. (वुई विल मेक द वेस्टर्न्स सिव्हिलायझेशन स्टिंक.)’ साम्यवाद्यांनी बुद्धीपुरस्सर रचलेल्या कारस्थानानुसार आपण अमेरिका आणि पश्चिम युरोप येथे संपूर्ण कुटुंबव्यवस्था नष्ट झाल्याचे पहात आहोत. तेथील लोकांचा धर्मावरील विश्वास संपूर्णपणे उडाला आहे आणि त्यांचे राष्ट्रप्रेम नष्ट झाले आहे. हे काही आपोआप घडले नाही. याचे कारस्थान त्यांनी मागील १०० वर्षांपासून चालवले आहे. ते हे करणार आहेत, असे त्यांनी स्वतःच लिहून ठेवले होते. त्यांचे पुढील लक्ष्य ‘भारत’ आहे. त्यामुळे हे आक्रमण समजून घेणे आवश्यक आहे.

शक्तीशाली लोकशाहीप्रधान देशांना साम्यवादाचा धोका !

जेव्हा कोणताही लोकशाहीप्रधान देश शक्तीशाली बनतो, तेव्हा ते त्याच्यावर सर्वप्रथम आक्रमण करतात. त्यांना लोकशाही देश शक्तीशाली होऊ द्यायचा नाही. अमेरिका हा सर्वांत शक्तीशाली लोकशाही असलेला देश होता. त्यामुळे त्यांनी पहिले आक्रमण अमेरिकेवर केले. आता हळूहळू भारत शक्तीशाली बनत आहे. त्यामुळे त्यांनी आता संपूर्ण लक्ष भारतावर केंद्रित केले आहे. साम्यवाद्यांना भारतातील कुटुंबव्यवस्था, एकत्र कुटुंबपद्धत, धर्मव्यवस्था, भारतियांचे राष्ट्रप्रेम आणि शिक्षणव्यवस्था या सर्वांमध्ये खोलवर घुसून वाळवीसारखे हळूहळू पोखरायचे आहे. याविषयी त्यांनी उघडपणे त्यांच्या पुस्तकांत लिहिले आहे. ‘प्रथम बंदुकीच्या धाकावर होणारी आमची क्रांती असेल’, असे कार्ल मार्क्स बोलला होता; परंतु नंतर साम्यवाद्यांनी रणनीती पालटली. आता त्यांनी ‘भारत देश आम्ही वाळवीसारखा आतून पोखरणार’, असे म्हटले आहे. यासाठी ते अत्यंत आकर्षक मुखवट्याच्या आडून काम करत आहेत. ते आपल्या सर्व व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचे काम करत आहेत आणि आपल्याला ते साम्यवादी आहेत, हे कळतही नाही.

– श्री. अभिजित जोग

४. साम्यवाद्यांचा ‘सांस्कृतिक मार्क्सवाद’

पर्यावरणवादी, स्त्रीवादी, सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशकता यांसाठी लढणारे इत्यादी साम्यवाद्यांचे मुखवटे आहेत. लिंग परिवर्तन (ट्रान्सजेंडरिझम्) ही कल्पना साम्यवाद्यांची बुद्धीपुरस्सर खेळलेली चाल आहे. ते लहान मुलांना सांगतात, ‘लिंग परिवर्तन करण्यासाठी तुम्हाला तुमच्या पालकांची अनुमती घेण्याची मुळीच आवश्यकता नाही.’ याचा अर्थ हा आहे की, ते पालकांना ‘शोषक’ बनवतात आणि मुलांना ‘शोषित’ बनवतात. त्यांना प्रत्येकाच्या मानवी संबंधांना ‘शोषक’ आणि ‘शोषित’ यांमध्ये विभाजित करायचे आहे अन् त्या सर्वांमध्ये एक नवीन संघर्ष निर्माण करायचा आहे. आजपर्यंत साम्यवाद्यांनी अशा प्रकारे आपला सर्वनाश करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याहूनही भयावह प्रयत्न ते पुढे करणार आहेत; कारण मी सांगितलेला हा नवीन मार्क्सवाद आपल्या संस्कृतीवरील आघात आहे. त्यामुळे त्याला ‘सांस्कृतिक मार्क्सवाद’ असे म्हणतात. सध्या सर्वसाधारण भाषेत त्याला ‘वोकिझम’ (प्रस्थापित गोष्टींच्या विरोधात वागणे), असे म्हणतात. हे आमच्या संस्कृतीविरुद्ध पुकारलेले फार मोठे युद्ध आहे. सनातन वैदिक संस्कृती ही भारतीय सभ्यतेचा आधार आहे. जगातील इजिप्शियन, निसेपोटेनियम, मायन अशा प्राचीन संस्कृती नष्ट झाल्या आहेत; परंतु आपण आतापर्यंत टिकून राहिलो; कारण सनातन वैदिक संस्कृती अत्यंत शक्तीशाली आहे. असे असले, तरी साम्यवादी तिला काही दशकांमध्ये वाळवीसारखे घुसून पोखरणार आहेत. त्यामुळे कदाचित् आपणही टिकू शकणार नाही. हे लोक आकर्षक मुखवटा धारण करून काम करत आहेत. हे मुखवटे कोणते आहेत आणि त्यांचे खरे स्वरूप कोणते, हे आधी आपण समजून घेतले, तरच आपल्याला या लढाईत पूर्ण शक्तीनिशी उतरता येईल. शेवटी भारतीय संस्कृतीचाच विजय होणार आणि आपण यामध्ये विजयी होणार, याचा मला पूर्ण विश्वास आहे.’

– श्री. अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक, पुणे.

संपादकीय भूमिका

‘भारत देश आम्ही वाळवीसारखा आतून पोखरणार’, या साम्यवाद्यांच्या चेतावणीला सरकार अन् प्रशासन कसे रोखणार ?